08 August 2020

News Flash

राहा फिट : करा न्याहारी न्यारी!

न्याहारीतून पोषणमूल्ये मिळतात आणि जिभेची चवही सांभाळली जाते.

डॉ. कांचन पटवर्धन, आहारतज्ज्ञ

दिवसाची सुरुवात ही न्याहारीपासून होत असते. इंग्रजीत याला ब्रेक फास्ट असा शब्द आहे. रात्रीचे जेवण झाल्यानंतर पुढील १० ते १२ तास काहीही न खाता झालेला उपवास तोडण्यासाठी न्याहारी असते. त्यामुळे न्याहारीला महत्त्व आहे. उपमा, पोहे याव्यतिरिक्तही न्याहारीचे अनेक प्रकार आहे. या न्याहारीतून पोषणमूल्ये मिळतात आणि जिभेची चवही सांभाळली जाते.

भाकरीची दहीभेळ

ज्वारी किंवा बाजरीची भाकरी तव्यावर कुरकुरीत भाजून घ्यावी. या भाकरीचे छोटे तुकडे करावे. यामध्ये कांदा, टोमॅटो, दही, लाल तिखट घालावे. ही न्याहारी झटपट तर आहे. त्याशिवाय ज्वारीतील तंतूमय घटकामुळे पोट साफ राहते आणि रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ज्वारी फायदेशीर आहे. ही न्याहारी भाकरी पिझ्झासारखीही करता येऊ  शकते. भाकरीचे तुकडे न करता कुरकुरीत भाजलेल्या या भाकरीला प्रथम तूप लावा. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, टॉमेटो यावर पसरून घ्या. त्यानंतर दही आणि चाट मसाला, लाल तिखट घालून भाकरी पिझ्झा खाण्यास तयार. लहान मुलांना अशा पद्धतीत केलेली न्याहारी आवडते.

मुगाचे सलाद

प्रथिने आणि ‘ब’, ‘क’ जीवनसत्त्वांचे भरपूर प्रमाण असलेले मूग न्याहारीसाठी चांगला पर्याय आहे. रात्री मूग भिजत घालायचे. सकाळी त्यांना उकडून घ्यावे. यामध्ये कांदा, टोमॅटो, गाजर, बीट, काकडी हे पदार्थ बारीक चिरून घालावेत. मीठ, लिंबू, कोथिंबीर आणि गरज असल्यास चाट मसाला घालावा. हा प्रकार व्यायाम करणारे किंवा वजन कमी करणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतो.

नाचणीचे पॅनकेक

अख्खी नाचणी, मूग आणि चण्याची डाळ रात्री भिजत घालावी. सकाळी हे पदार्थ बारीक वाटून घ्यावेत. वाटताना या पिठात ओले खोबरे, खजूर घालावेत. वाटलेल्या पिठात तूप घालावे. हे पीठ छोटे डोसे किंवा पॅनकेकप्रमाणे तव्यावर कमी तेलात सोडावे. रक्तातील लोहाचे प्रमाण वाढविण्यासाठी नाचणी हा चांगला स्रोत आहे. अ‍ॅनिमिया असलेल्या महिलांसाठी ही न्याहारी फायद्याची ठरू शकते.

डाळींचे पॅटिस 

चणे, उडीद, हिरवे मूग, तूर या डाळी रात्रभर भिजत ठेवा. सकाळी या डाळी एकत्रितपणे वाटून घ्या. त्यामध्ये आवडीनुसार लसूण, आले, हिरवी मिरची घाला. एक छोटा बटाटा उकडून घ्या आणि सर्व पदार्थ हाताने एकत्र करा. त्याचे छोटे गोळे करा आणि तव्यावर कमी तेलात भाजा. पुदिना चटणी किंवा टोमॅटोच्या सॉससोबत खा. पोषणमूल्यांनी भरपूर असे हे कटलेट झटपट तयार होते.

रोजच्या धकाधकीच्या जीवनात न्याहारी करणे कमी होताना दिसत आहे. अनेकदा पुरेसा वेळ नसल्याने जे उपलब्ध असेल ते खाल्ले जाते. मात्र कमी वेळेत तयार होणाऱ्या या न्याहारींच्या प्रकारामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. दररोज एकच प्रकार न खाता रोजच्या न्याहारीत बदल करावेत. उकडलेले अंडे न्याहारीसाठी फायद्याचे ठरते. मात्र न्याहारी केल्याशिवाय घराबाहेर पडू नये. न्याहारी तयार करण्यास वेळ नसेल तर कुरमुरे, चिक्की, मुगडाळीचे किंवा बेसनाचे लाडू फायदेशीर ठरू शकतात.

दररोज न्याहारी तयार करण्यासाठी वेळ काढल्यास आरोग्य चांगले राहते आणि दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2017 12:28 am

Web Title: healthy breakfast breakfast food
Next Stories
1 पिंपळपान : उपळसरी
2 अनारोग्याची दुलई
3 मना पाहता! : डॉ. गूगल उवाच!
Just Now!
X