शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षांचा मोसम ऐन भरात आहे. आता अगदी मे महिन्यापर्यंत प्रत्येक घरात कुणी ना कुणी ‘परीक्षाग्रस्त’ सापडेलच. आताचे दिवस अर्थातच अभ्यासाच्या तयारीचे. वर्षभर अभ्यासाचे वावडे असले तरी आता पुस्तक-वह्य़ांच्या चळतींमध्ये हरवून गेलेली, रात्री जागून ‘जर्नल्स’ पूर्ण करणारी, सकाळी लवकर उठून काही न खातापिता आधी अभ्यासाला लागणारी मुलं-मुली घराघरांत दिसू लागली आहेत. अभ्यासाच्या या सगळ्या धबडग्यात एका गोष्टीकडे हमखास दुर्लक्ष होते. ते म्हणजे आरोग्य. यातही सर्वात पहिला फटका बसतो योग्य आहाराला.

hlt06परीक्षा जवळ जवळ येऊ लागल्या, ‘सबमिशन’ला सुरुवात झाली की विद्यार्थ्यांचे जागरण सुरू होते. झोप येऊ नये म्हणून कमी जेवणे, तासन्तास चालणाऱ्या अभ्यासाच्या मध्ये घेतलेल्या ‘ब्रेक’मध्ये ‘फास्ट फूड’चे सेवन वाढते. अनेकांना अजून बराच अभ्यास राहिलाय या भीतीमुळेही भूक लागत नाही. परीक्षांच्या दिवसांत आणि त्याआधीही उपयुक्त ठरू शकणाऱ्या या काही टिप्स.
* लेखी, तोंडी वा प्रयोगपरीक्षा काहीही असो. अनेक विद्यार्थी परीक्षेला जाण्यापूर्वी सकाळी काही खात नाहीत किंवा कशीतरी पटापट न्याहारी उरकतात. खरे तर या दिवसांत सकाळी सकस न्याहारीसाठी थोडा वेळ राखून ठेवणे गरजेचे. म्हणजे दिवसभर भूक-भूक होणार नाही आणि त्यामुळे लक्ष एकाग्र न होण्याची समस्या राहणार नाही.
* परीक्षेस जाण्यापूर्वी एखादे फळ जरूर खावे. त्याने ऊर्जा टिकून राहते.
* बरोबर पाण्याची बाटली हवी आणि अधूनमधून पाणी प्यायलाही हवे.
* परीक्षांच्या काळात जेवण कमी करणे योग्य नसले तरी सुस्ती येणारे आणि पचायला जड जेवण टाळावे.
* रोज तेच तेच खाण्याचा कंटाळा येणे साहजिक आहे. अशा वेळी आहार थोडा बदलून पाहावा. परंतु त्यात सर्व अन्नघटक मात्र योग्य प्रमाणात हवेत.
* आहारात पालेभाज्या, फळे, मोडाची कडधान्ये, यांचा समावेश जरूर असावा. पिवळ्या व केशरी रंगाची- ‘क’ जीवनसत्त्व असलेली फळे आणि फॉलिक अ‍ॅसिड हा घटक निसर्गत:च असलेल्या हिरव्या पालेभाज्या चांगल्या.
* तंतुमय पदार्थाचा समावेश आहारात असणे गरजेचे आहे. बद्धकोष्ठासारख्या समस्या टाळण्यासाठी त्याचा फायदा होईल. रोज सकाळी पोट व्यवस्थित साफ झाले तर अभ्यासात चांगले लक्ष लागेल.
* अभ्यास करताना कंटाळा आल्यावर अनेक विद्यार्थी तळलेले किंवा फास्ट फूड पदार्थ खाणे पसंत करतात. असे पदार्थ कधीतरी खाणे वेगळे, पण रोज ते खाणे नक्कीच टाळावे. उघडय़ावरचे पदार्थ शक्यतो टाळावेत. त्यातून दूषित पाण्यातून पसरणारे आजार होऊ शकतात.
* निदान परीक्षांपूर्वी व परीक्षांच्या काळात तरी बाहेरचे कुल्फी आणि आइस्क्रीम नकोच.
* चिकन, मटण, मासे यांचा अधूनमधून आहारात समावेश केला तरी चालू शकतो. परंतु या पदार्थामध्ये तेलाचे प्रमाण फार नको.
* अनेक पालक ‘बुद्धिवर्धक’ आहार कुठला, असा प्रश्न विचारतात. मुळात ‘बुद्धिवर्धक आहार’ अशी संकल्पना नाही. पण बदाम, अक्रोड या सुक्या मेव्याचे नियमित व योग्य प्रमाणात सेवन केल्यास ते स्मृतिवर्धक ठरू शकते.
* विशेषत: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रात्री जागण्यासाठी कॉफी पिण्याची सवय असते. पण कॉफीच्या अतिसेवनाने डोके दुखू शकते, छातीत धडधड वाढू शकते. कॉफीऐवजी लिंबू सरबत, कोकम सरबत अशी घरगुती पेये पिता येतील.
* सकाळी विद्यार्थ्यांनी किमान ५-६ तरी सूर्यनमस्कार घालावेत. तेवढय़ानेही ताजेतवाने वाटेल.
* या काळात शरीरात तणावाशी संबंधित संप्रेरकांचे स्रवण होत असते. त्यामुळे आहाराबरोबरच पुरेशी झोप, व्यायाम आणि ताणाचे व्यवस्थापनही गरजेचे.
डॉ. संजय जानवळे, बालरोगतज्ज्ञ – dr.sanjayjanwale@rediffmail.com