12 December 2017

News Flash

बाल आरोग्य : उष्माघात

८ वर्षांचा विवेक शाळेच्या बससाठी उभा असताना एकदम कोसळला.

डॉ. अमोल अन्नदाते | Updated: April 20, 2017 12:27 AM

लहान मुले व शाळकरी मुलांमध्ये उष्माघाताचे प्रमाण जास्त असते.

 

८ वर्षांचा विवेक शाळेच्या बससाठी उभा असताना एकदम कोसळला. घराजवळच असल्याने लगेच घरच्यांना कळवले आणि तोपर्यंत आजुबाजूच्या लोकांनी विवेकला माझ्याकडे आणले. आल्यावर विवेकचा ताप मोजला तेव्हा तो १०४ फॅरनहाइट होता आणि विवेक बेशुद्ध होता. एवढे असूनही त्याला घाम आला नव्हता. ही सगळी लक्षणे उष्माघाताची असल्याचे लगेच लक्षात आले आणि उपचारही सुरू झाले. तोपर्यंत विवेकचे आई-वडील आले होते. त्यांना निदान समजावून सांगितले. आइसपॅक म्हणजे बर्फाच्या मदतीने विवेकचे अंग थंड केले आणि त्याला सलाईन लावून त्याच्या शरीरातील घसरलेली पाण्याची पातळी वर आणली. त्यानंतर तो शुद्धीवर आला.

‘डॉक्टर उष्माघात कसा हो? शाळेत जाताना मी रोज त्याच्या खिशात कांदा ठेवते.’ आईचे हे उत्तर मी अनेक पालकांकडून ऐकल्याने मला आश्चर्य वाटले नाही. मी त्यांना समजावून सांगितले. अहो एवढय़ा मोठय़ा सूर्याचा सामना एवढा लहान कांदा कसा करू शकेल? विवेक आता जरा बरा झाल्याने, आई-वडिलांना मी गमतीने सांगितलेले उदाहरण कळले. कांदा ठेवणे वगैरे झाल्या घरगुती जुजबी गोष्टी. त्यांची परिणामकारकता अजून सिद्ध झालेली नाही. सध्या सगळीकडे तापमान खूप आहे आणि त्यातच लहान मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी असते. म्हणून लहान मुले व शाळकरी मुलांमध्ये उष्माघाताचे प्रमाण जास्त असते.

‘डॉक्टर नक्की उष्माघातच होता ना, दुसरे काही नसेल ना..’ आई-वडिलांची शंका रास्त होती. १०२ च्या पुढे वाढलेले तापमन, घाम न येणे व चक्कर येणे, शुद्ध हरपणे, बरळणे ही सगळी उष्माघाताचीच लक्षणे आहेत. विवेकला उलटय़ा झाल्या नसल्या तरी काही मुलांना उलटय़ाही होतात. उष्माघात ही ‘मेडिकल इमरजन्सी’ असते म्हणून बरे झाले. लोकांनी विवेकला थेट रुग्णालयात आणले. बऱ्याचदा लोक अशा रुग्णांवर जागेवरच किंवा घरी उपचार करत बसतात. फक्त थंड किंवा सध्या पाण्याने अंग पुसत रुग्णाला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन येणे हेच अशा वेळी सगळ्यात योग्य पाऊल ठरते. म्हणून आपण विवेकला इथे आणणाऱ्या लोकांचे आभार मानले पाहिजे.

‘पण हे असे परत होणार का विवेकला?’ अहो, विवेकला काय, तुम्ही-आम्हीही अशा कडक उन्हात उभे राहिलो तर आपल्यालाही असा त्रास होऊ  शकतो. पण तो टाळण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना योग्य सूचना देणे आवश्यक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अशा कडक उन्हात उभे न राहता सावलीत उभे राहायला हवे. उन्हाळ्यामध्ये प्रत्येक शाळेतील मुलाने एक सवय लावून घ्यावी. घरातून निघताना व शाळेत पोहोचल्यावर दोन्ही वेळा एक ते दीड ग्लास पाणी प्यायला हवे. थंड म्हणजे फ्रीजमधले एकदम थंड पाणी नव्हे, माठातले पाणी. तसेच अतिथंड पेय (कोिल्ड्रक) अशा वेळी टाळावे. बाहेर निघताना शक्यतो पूर्ण डोके, कान व चेहरा झाकला जाईल, असा मोठा पांढरा स्कार्फ किंवा रुमाल बांधावा. शक्यतो पांढऱ्या रंगाच्या रुमालाचाच वापर करावा, कारण तो सूर्यकिरणे परावर्तित करतो. लाल, काळे रंग सूर्याच्या उष्ण लहरी शोषूण घेतात. हलक्या रंगाचे सैल कपडे घालावे. या कडक उन्हाळ्याच्या काळात सुट्टय़ांमध्ये बऱ्याचदा मुले क्रिकेटसारखे मैदानी खेळ खेळतात. दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो हे खेळ खेळणे टाळावे. दिवसभर शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित  ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्यावे, टरबूज, खरबूज, मोसंबी, संत्रे यासारखी रसदार फळे खाणे यामुळेही उष्माघाताचा धोका कमी होतो.

‘डॉक्टर आम्ही सुट्टी घेतल्यानंतर आज काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे का हो?’ त्याच्या लघवीवर लक्ष ठेवा आणि ती पिवळ्या रंगाची नसून पांढरी आणि दर तीन तासाने होते आहे ना, यावर लक्ष ठेवा.

www.amolaannadate.com

First Published on April 20, 2017 12:27 am

Web Title: heat stroke issue