सुदृढ आरोग्य आणि उत्तर काम करण्यासाठी शरीराला पुरेशी झोप आवश्यक असते. बदललेल्या जीवनपद्धतीमुळे तरुणाईला अपुरी झोप ही भेडसावणारी समस्या आहे. सर्वसाधारणपणे रात्रीची ६ ते ८ तास झोप घेण्याचा सल्ला दिला जातो. मात्र कामाच्या व्यग्र वेळा, अतिरिक्त ताण, स्पर्धा आणि बदललेल्या जीवनपद्धतीमध्ये रात्रीच्या वेळी ६ ते ८ तास झोप घेणे शक्य होत नाही. अशा वेळी पावर नॅप किंवा काही मिनिटांची डुलकी मानसिक ताण कमी करण्यास मदत करते.

झोप कशी येते?

अनेकदा कामाच्या वेळांप्रमाणे आपल्या दैनंदिन जीवनात बदल होत असतो. अनेकदा झोपण्याची संधी मिळाल्यावर भरपूर झोप काढण्याची मानसिकता असते. मात्र असे न करता शरीराला आवश्यक तितकीच झोप घ्यावी. जास्त वेळ झोपल्यास कंटाळलेपणा किंवा आळस भरण्याची शक्यता असते. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी जास्त वेळ झोपण्याचे टाळावे.

चांगल्या झोपेसाठी व्यायाम, आहार आवश्यक

व्यायाम हा आपल्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा भाग आहे. दिवसभर कामाची ऊर्जा मिळण्यासाठी व्यायाम आवश्यक असतो. सकाळी किंवा वेळ मिळेल तसा दिवसातून किमान अर्धा तास व्यायाम करणे आवश्यक आहे. चालणे, धावणे, योगासने याचा दररोजच्या जीवनात अंतर्भाव आवश्यक आहे. व्यायामाला चौरस आहाराची जोड हवी. फास्टफूड खाण्यापेक्षा घरगुती जेवण चांगले. जर तेही शक्य नसेल तर फळे, सँडविज, सलाड यांचा आहारातील अंतर्भाव वाढवा. मिळेल तेव्हा खूप खाण्यापेक्षा थोडय़ा थोडय़ा अंतराने खा. चहा, कॉफी यांचे प्रमाण कमी करा. रात्रीचा आहार हलका असावा. जर रात्री उशिरा घरी जात असाल तर रात्री ८ च्या दरम्यान खाणे चांगले. रात्री घरी जाऊन दूध किंवा फळे खा. दिवसभराच्या तणावामुळे मानसिक शांती नसेल मिळत तर कमी प्रमाणात अल्कोहल घेण्यात हरकत नाही, त्याने तणाव कमी होऊन शांत झोप लागेल. मात्र त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

झोपण्यापूर्वीचे काही नियम

जेवल्यानंतर लगेचच झोपू नये. किमान २ ते ३ तासानंतरच झोपणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. चांगली झोप हवी असेल तर खोलीत पिवळा मंद प्रकाश असणे योग्य आहे. अनेकांना रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याची सवय असते. अशा वेळी टेबल लॅम्पचा वापर करा किंवा रात्री झोपण्यापूर्वी दिवा बंद करावा. रात्री झोपण्यापूर्वी मोबाइल आणि टीव्ही पाहणे टाळा. मोबाइल आणि टीव्ही पाहण्यात आपला बराच वेळ वाया जात असतो. त्या वेळात चांगली झोप होऊ  शकते. अनेकदा यातून आपले लक्ष विचलित होते आणि झोप उडून जाते. झोपताना दिवसभर घडलेल्या गोष्टींवर विचार न करता उद्या काय करता येईल असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवा.

झोपेच्या गोळ्या

निद्रानाशेपासून मुक्ती मिळवण्यासाठी सातत्याने झोपेच्या गोळ्यांचे अवलंब टाळावा. किंवा घ्यावयाच्या असल्यास आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. झोपेच्या गोळ्यांमधील घटक मज्जासंस्थेवर परिणाम करतात. या गोळ्यांचा अतिरेक झाल्यास यकृत, मूत्रपिंड यांवर दुष्परिणाम होतो. या परिणामाबरोबर झोपेच्या गोळ्यांची सवय लागते. अनेकांना या गोळ्यांशिवाय झोप येत नाही. त्यामुळे थेट गोळ्यांकडे न वळता व्यायाम, आहार यांमध्ये बदल करावा आणि चहा, कॉफी यांसारख्या कॅफीनयुक्त पदार्थ पिऊ नये.

पॉवर नॅप

एक छोटी डुलकी किंवा पावर नॅप मेंदू ताजा तरतरीत करणारी असते. मात्र ही डुलकी १५ ते २० मिनिटांची असावी. पॉवर नॅपमध्ये काही काळ विचार बंद करण्याची क्रिया घडत असते. रात्रीची झोप ही दीर्घ तासांची असते. त्यामुळे अनेकदा सकाळी आळसटल्यासारखे वाटते. मात्र पॉवर नॅपमुळे तरतरी येते. दिवसातील कामाच्या ताणामुळे थकवा आल्यास किंवा आळसटल्यासारखे वाटत असेल तर पॉवर नॅप घ्यायला हरकत नाही. यामुळ शरीर नैसर्गिकरीत्या जी झोपेची किंवा आरामाची मागणी करत असते ती पूर्ण होते.

अपुऱ्या झोपेचे दुष्परिणाम

दिवसभर आळस, निरुत्साह, चिडचिडेपणा येणे, नैराश्य, लक्ष केंद्रित न करता येणे, वाचलेले किंवा ऐकलेले लक्षात न राहणे, एका वेळी अनेक कामे न करता येणे. सातत्याने पुरेशी झोप होऊ  शकली नाही तर रक्तदाबातील चढउतार, चिडचिडेपणा आणि नैराश्य वाढणे, विस्मरणाचा अधिक परिणाम जाणवू लागणे, रोजच्या कामात लहान-लहान चुका होणे, पोटाचे विकार, मधुमेहींना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास अडचणी होणे, केस गळणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, चेहऱ्यावर थकवा जाणवणे आदी लक्षणे दिसतात. मात्र गरजेपेक्षा अतिझोप त्रासदायक ठरू शकते. अतिरिक्त झोपणाऱ्यांमध्ये लठ्ठपणा सरास दिसतो. स्नायू दुखणे, अंगदुखी, डोकेदुखी, नैराश्य, पोटाचे विकार, लक्ष केंद्रित न होणे आणि विस्मरण हे परिणामही जास्त झोपेमुळे दिसतात.

-डॉ. शशिकांत म्हसळ

(शब्दांकन- मीनल गांगुर्डे)