23 October 2018

News Flash

‘कामा’ची गोष्ट : लैंगिक शिक्षण महत्त्वाचे!

वैयक्तिकरीत्याही पालक आणि शिक्षक या विषयाची उघड चर्चा युवकांशी टाळतात.

प्रतिनिधिक छायाचित्र

आपल्या समाजात काही विषय असे आहेत की ज्यांचा उच्चार करणे पुढारलेले लोकही टाळतात. या विषयांना टाळण्याचे दुष्परिणाम समाज सतत सोसत असतो, पण तरीही हे विषय तसेच दीर्घकाळ दुर्लक्षित ठेवले जातात. लैंगिक शिक्षण हा असाच एक विषय. हा विषय वादग्रस्त व नाजूक आहे अशी सबब दाखवत शिक्षणसंस्था, विद्यापीठ आणि अगदी सरकारही सतत टाळत आले आहेत. वैयक्तिकरीत्याही पालक आणि शिक्षक या विषयाची उघड चर्चा युवकांशी टाळतात.

पौगंडावस्थेतील मुलांमध्ये अल्पवयात केल्या जाणाऱ्या लैंगिक प्रयोगांचे वाढते प्रमाण, लग्नापूर्वी केल्या जाणाऱ्या गर्भपाताचे वाढते आकडे, गुप्तरोग दवाखान्यात जाण्याची युवकांची वाढती संख्या ही उघड लक्षणे नव्या पिढीचा एक पैलू समोर आणतात. लैंगिकता ही शरीरधर्मातील इतर अनेक क्रिया प्रक्रियांप्रमाणेच एक नैसर्गिक व गरजेची गोष्ट. पण संस्कारक्षम वयात कुठेतरी, कधीतरी आपण लैंगिकतेविषयी अशा काही गोष्टी पाहतो, ऐकतो, वाचतो आणि शिकतो की त्यातून लैंगिकता म्हणजे एक निषिद्ध, गैर आणि पतीत विषय आहे, असा समज करून घेतो. अनेकदा पालक, शिक्षक आणि तथाकथित धार्मिक व्यक्ती यांच्या शिकवणीतून युवकांच्या मानसिकता लैंगिकतेच्या विरोधात तयार होते. याची परिणिती लैंगिकतेचा कृत्रिम तिरस्कार करणाऱ्या दांभिक व्यक्तीच्या रूपात होते. व्यक्ती स्वतशीच झगडू लागते. त्यातून निसर्गत: उमलणाऱ्या कामऊर्जेबद्दल व्यक्तीच्या मनात शत्रूपणाची भावना निर्माण होते. हा आत्मघातकी घटनाक्रमच अनेक लैंगिक दुर्घटना, अनाचार व विकृतींच्या मुळाशी असतो.

लैंगिकता निसर्ग देतो पण तिचा तिरस्कार आणि अव्हेर करण्याचे प्रशिक्षण समाजाकडून दिले जाते. व्यक्ती स्वतच्याच निसर्गदत्त अशा प्रेरणांशी लढून जिंकणे शक्य नसते. अशावेळी मग त्यात विकृतीचा उगम होतो. चोरून अश्लिल मासिक वाचणे, अश्लिल चित्रपट पाहणे, विकृत लैंगिक संबंध ठेवणे, बलात्कार करणे ही अशा काही विकृतीची काही उदाहरणे.

लैंगिक शिक्षण म्हणजे नेमके काय हे समजून घेण्यातच अनेकजण गफलत करतात. शिक्षण म्हणजे जननेंद्रियाशी केंद्रित प्रजनन प्रक्रियेशी माहिती देणे एवढाच नसून त्यात अनेक गोष्टी अंतर्भूत आहेत. त्यामध्ये व्यक्तीचा लैंगिक विकास कसा घडतो व त्याच्या विविध अवस्था कोणत्या याची शास्त्रोक्त माहिती, लैंगिकतेच्या मानसिक आणि सामाजिक पैलूंची माहिती, स्त्री व पुरुष यांच्या लैंगिकतेमधील मूलभूत फरक, गर्भप्रतिबंधक उपायांची गरज आणि त्याच्या विविध पद्धतीचे संपूर्ण ज्ञान असणे, लैंगिक संबंध आणि वैवाहिक जीवन याबाबत जबाबदार पाश्र्वभूमी युवकांमध्ये निर्माण करणे, लैंगिक संबंधातून संसर्ग होऊ शकणाऱ्या आजारांविषयी जागरूकता अशा सर्व गोष्टी त्यात येतात.

अधिकृतरीत्या न मिळणारे ज्ञान चुकीच्या मार्गाने मिळवण्याची प्रवृत्ती होणे स्वाभाविक आहे. अवैध सूत्रांकडून चुकीची आणि घातक माहिती गोळा करण्यासाठी आपणच युवकांना प्रवृत्त करत असतो. याचे दुष्परिणाम जर टाळायचे असतील तर योग्य वयात योग्य असे लैंगिक शिक्षण देणे हाच एकमेव पर्याय आहे. नेमके हेच साधण्याचा प्रयत्न या पंधरवडय़ाच्या सदरामधून केला जाणार आहे.

-डॉ. राजन भोसले, लैंगिक विज्ञानतज्ज्ञ.

First Published on January 9, 2018 4:30 am

Web Title: important of sex education