‘‘वातामा..। गुरुष्णास्निग्धमधुरा:.. बलप्रदा:।।’’ (च. सू. अ २७)

हिवाळ्यात बहुतेक जण आपल्या आहारात सुकामेवाचा वापर करतात. अक्रोड, सुके अंजीर, काजू, खारीक, जर्दाळू, पिस्ता, बदाम, बेदाणा आणि सुके खोबरे अशा भिन्न नऊ पौष्टिक पदार्थामध्ये बदामाला अग्रस्थान आहे. आपल्या सर्वाच्या वापरात असलेल्या बदामाला अमेरिकी बदाम असे म्हणतात. तो तुलनेने स्वस्त असतो, पण त्याची चव ‘मोमरा’ या उच्च दर्जाच्या बदामापेक्षा कमी गोड असते. मोमरा बदामाची चव अत्यंत मधुर, पण आकार नेहमीच्या बदामापेक्षा थोडा लहान असतो. याशिवाय कडू बदाम म्हणून एक वेगळी जात आहे. तो अजिबात खावयाचा नसतो, कारण त्यात एक जहाल विष असते आणि त्याची चव कडू असते.

अंगावर वारंवार येणाऱ्या खाजेकरिता कडू बदामाचा लेप लावतात. या दोन बदामाच्या जातींशिवाय रस्तोरस्ती आपणास शोभेचे बदामाचे वृक्ष पाहावयास मिळतात. त्याची रस्त्यावर पडलेली फळे ओलांडूनच आपल्याला जावे लागते. गोड बदाम भारतात येणाऱ्या बदामांपेक्षा जास्त पौष्टिक व स्नेहन आहेत. यात तांदळातील पिष्टमय सत्त्व नसते म्हणून या बदामाची पेज मधुमेहात दिल्याने ताकद येते आणि मधुमेह वाढत नाही. प्राणवहस्त्रोतसाचे, मूत्र व जननेंद्रियांच्या विकारात साहाय्यक द्रव्य म्हणून दोन ते तीन बदाम वाटून दुधाबरोबर अवश्य द्यावे. बदामाची पेज द्यावयाची असल्यास ते रात्रभर पाण्यात भिजत टाकले पाहिजे. असे केल्याने त्यात एका नव्या जातीचे सत्त्व उत्पन्न होते. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. बदामाची पेज जास्त उकळू नये, कारण त्यातील नवीन पाचकद्रव्याचा नाश होतो. भिजवलेले बदाम, आस्कंद व पिंपळी यांची तूप, दूध व साखर घालून केलेली पेज गर्भवती महिलांसाठी एक दिव्य रसायन आहे. त्यामुळे अंगावरचे दूध वाढते व धुपणी कमी होते.

लहान व कृश प्रकृतीच्या बालकांच्या वाढीकरिता हरी परशुराम औषधालयाने शतावरी कल्प करत असताना बदामाचा कल्क मिसळून एक उत्तम दर्जाचा संयुक्त कल्प केला आहे. ‘सकाळी भरपूर सूर्यनमस्कार घालावे, जोर-बैठका काढाव्यात आणि चार-पाच बदाम आणि पाच-दहा बेदाणे खावे,’ असे माझे वडील वैद्य यशवंत हरी वैद्य खडीवाले नेहमी सांगत असत.