23 November 2017

News Flash

पिंपळपान : केळे

पिकलेले केळे बल्य, रक्तपित्तप्रशमन, शोणितास्थापन, संग्राहक आणि जीवनीय आहे.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले | Updated: September 14, 2017 2:16 AM

‘‘कदल्यास्तु फलं स्वादु कषायं नतिशीतलम्। रक्तपित्तहरं रूच्यं वृष्यं

कफकरं गुरू॥ कन्दस्तु वातलो रूक्ष: शीतोऽसक्कृमिकुष्ठनुत्॥’’ (ध.नि.)

आपणा सर्व भारतीयांच्या स्वयंपाकगृहात पिकलेली केळी, कोणत्या ना कोणत्या उपवासाच्या निमित्ताने उपस्थित असतातच. एकवेळ धार्मिक भावनेने उपवास करणारी मंडळी वरई तांदूळ, साबुदाणा, काकडी, बटाटा असे पदार्थ उपवासाला खाणार नाहीत. पण किमान एक केळे खाल्ल्याशिवाय मराठी माणसांचा सोमवार, गुरुवार, शनिवार, महाशिवरात्री, एकादशी असे उपवास संपन्न होणारच नाहीत. कदली (संस्कृत), कला (बंगाली), केला (हिंदी), बाळे, रसबाळे (कन्नड), बाळ (मल्याळम) अशा विविध नावांनी केळीची ओळख आहे. केळीची लागवड भारतभर सर्वत्र होतेच. हे सांगावयाची आवश्यकता नाही, तरीपण खवय्या मंडळींना सुकेळीचा आनंद केव्हा न केव्हा अवश्य घ्यावासा वाटतो. महाराष्ट्रातील वसईजवळील आगाशी परिसरात एकेकाळी खूप मोठय़ा प्रमाणात सुकेळीच्या झाडांची लागवड होत असे. काही वर्षांपूर्वी ही झाडे जवळपास नष्ट झाली होती, पण पुन्हा वन विभागाने आणि काही वनस्पतीतज्ज्ञांच्या सहकार्याने सुकेळीच्या अनोख्या जातीच्या केळींची लागवड वाढलेली आहे. आपण सर्व जण केळीचे साल काढून त्याचा आस्वाद घेतो, पण बंगळूरुहून म्हैसूरला जाताना वाटेत एक अनोख्या प्रकारच्या केळीचे स्टॉल वाटेत खवय्यांचे स्वागत करत असतात, त्या केळय़ांना सालच नसते. ती केळी तशीच्या तशी खाण्याचा प्रघात आहे. पर्यटनप्रेमींनी हा लाभ जरूर घ्यावाच.

ज्यांच्या परिसरात विविध फलपुष्पांच्या वृक्षलतांकरिता मोकळी जागा असते, तेथे अतिशय डौलाने, वाऱ्याबरोबर हलणारी केळीची हिरवीगार पाने असणारी लहानमोठी झाडे असतातच. आपण सर्व भारतीय मंडळी खूप धार्मिक व उत्सवप्रेमी आहोत. विविध सार्वजनिक समारंभ, लग्न, मुंज, वाढदिवस यानिमित्ताने वेगवेगळय़ा लहानमोठय़ा मंगल कार्यालय, हॉल, मॉल यांच्या प्रवेशद्वारी, केळीच्या हिरव्यागार पानांचे खुंट सर्वाचेच सहर्ष स्वागत करत असतात. अशा मंगलप्रसंगी भोजनाकरिता केळीची हिरवीगार पाने, ताटांऐवजी सर्वत्र वापरली जातात. विविध श्राद्ध व यज्ञाच्या निमित्ताने सातू व इतर धार्मिक साहित्य ठेवण्याकरिता केळीच्याच पानांचा उपयोग करतात.

पिकलेले केळे बल्य, रक्तपित्तप्रशमन, शोणितास्थापन, संग्राहक आणि जीवनीय आहे. कच्च्या केळ्याचे पीठ बल्य व संग्राहक आहे. केळय़ाच्या घडाच्या दांडय़ाचा रस स्वेदजनन आणि सोपटाचा रस तृष्णानिग्रहण करणारा आहे. केळय़ाच्या घडांच्या निर्माणाअगोदर येणाऱ्या पुष्पघोसाला केलबोंड-मोचक अशी संज्ञा आहे. हा पुष्पघोस शीतल, ग्राही व स्तंभन असतो.

जुलाबात आणि आवेत पिकावयास आलेल्या केळय़ाचे पीठ देतात. केळय़ाची साल काढून त्याचे वेफर करून मोठय़ा प्रमाणावर खवय्यांकरिता उपलब्ध असतात. काही गोड, तर काही नमकीन असतात. ज्यांना कोड किंवा विविध त्वचाविकाराची बाधा झालेली आहे. फुप्फुसामध्ये खूप कफ झालेला आहे, घशात चिकटा व नाकात सर्दी गच्च बसली आहे, अशांनी केळय़ाचा आस्वाद घेऊ नये, हे सांगावयास नकोच. थोर आयुर्वेदीय शास्त्रकारांनी ‘जयति रसाला प्रतिश्यायम्’ म्हणजे सर्दीकरिता केळे अग्रक्रमाचे असे का म्हटले आहे, हे मोठेच कोडे आहे. अनार्तव, अल्पार्तव, कष्टार्तव या मायभगिनींच्या नेहमीच्या समस्येत केळाच्या खुंटाच्या स्वरसापासून केलेला आर्तवक्वाथ, कुमारी आसव व अन्य औषधांबरोबर दिल्यास निश्चयाने मासिक पाळीसंबंधित वरील तक्रारी दूर होतात.

केळीची झाडे तोडल्यानंतर सुकवून जाळल्यास पुष्कळ क्षार मिळतो. यात जवखार जास्त प्रमाणात असतो. हा क्षार साबणासारखा वापरता येतो. मराठी खवय्या मंडळींना केळय़ाची शिकरण आणि अनेक फळांचे बरोबर केळे असलेले फ्रूटसॅलड हवेहवेसे असते. मात्र शास्त्रकारांनी केळे व दूध यांचे मिश्रण परस्परविरोधी गुणाचे असते, म्हणून शक्यतो टाळावे, असा मौलिक सल्ला दिला आहे. इति केळे पुराण!

आजकाल प्रत्येक सोसायटीला मोठी सामाईक गच्ची असते. या गच्चीत भरपूर ऊन असते. त्याचा उपयोग करून सूर्याची ऊर्जा साठवायची असेल तर केळीचे म्हणजे ‘रंभा’ फळाचे एखादे रोप लावावे. त्यात खत म्हणून विविध पालापाचोळा टाकावा. किंचित माती टाकावी. स्वयंपाकघरातील वाया गेलेले बेसिनचे पाणी वापरावे. त्यामुळे केळीचे रोप भराभर फोफावते. लांब लांब पोपटी पानांची सूरनळी बाहेर पडून अलगद उलगडते. पाच-सहा फूट एकेक पान अशी हळूहळू तीस-पस्तीस पाने येतात. त्यावेळी रसरशीत पानांच्या लावण्यवती केळीला ‘रंभा’ का म्हणतात हे कळते.

नऊ-दहा महिन्यांनी आपली प्रतीक्षा संपते अन् केळीच्या खोडातून केळफूल बाहेर पडते. किरमिजी रंगाच्या पानांचा कोन उमलत जातो. पान गळते अन् केळीची नाजूक फणी बाहेर पडते. इतर फुलांत फलनक्रिया झाल्याशिवाय फळ धरत नाही. याला केळी अपवाद आहे. घरातील फुकट जाणारे अन्न केळीला जेवढे द्याल तेवढा केळीचा घड छान पोसला जातो. आपणास फळबाजारात मिळणारी केळी ही कृत्रिमपणे पिकवली जातात. हे सर्वानाच माहिती आहे. कार्बाईडमध्ये पिकवलेली केळी, पिवळीधम्मक, बेचव असतात. त्याऐवजी निसर्गत: हळूहळू पिकत जाणारी सुमधुर केळी खाण्याची मजा काही औरच असते, ते अनुभवा. केळीचा घड काढल्यावर केळ मरते. आपल्याला देता येईल तेवढे देऊन केळे पुराण संपवितो.

First Published on September 14, 2017 2:16 am

Web Title: information on banana benefits of banana