12 December 2017

News Flash

पिंपळपान : ब्राह्मी

मण्डूकपर्णी चवीने तुरट व कडू, कटू विपाकी, लघू असूनही शीतवीर्य आहे.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले | Updated: July 27, 2017 1:09 AM

मण्डूकपर्णी ही लताब्राह्मीसारखी दिसते, परंतु दोघांचे स्वरूप, प्राकृतिक वर्गी, गुणकर्म पूर्णपणे भिन्न आहे. ‘द्रव्यगुण विज्ञानम्’ ग्रंथकर्ते वैद्य आचार्य यादवजी त्रिकमजी ब्राह्मीऐवजी प्रतिनिधी द्रव्य म्हणून मण्डूकपर्णी वापरू नये असा मोलाचा सल्ला दिला आहे. पण प्रत्यक्षात व्यवहार पूर्णपणे वेगळा आहे. कारण जलब्राह्मी-अस्सल ब्राह्मी खूप अल्प प्रमाणात मिळते. याउलट वाळलेली मण्डूकपर्णी औषधी बाजारात मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध आहे.

मण्डूकपर्णी (संस्कृत), थुलकुडी, थानकुनी (बंगाली), खडब्राह्मी (गुजराथी), सेंटेला असायटिका (लॅटिन) अशा विविध नावांनी मण्डूकपर्णी ओळखली जाते, तर ब्राह्मी (संस्कृत), ब्रह्मी (हिंदी, बंगाली), नीरू ब्राह्मी (कन्नड, मल्याळम) आणि बॅकोपा मोनेरी (लॅटिन) अशा भिन्न नावांनी ब्राह्मी ओळखली जाते.

मण्डूकपर्णी चवीने तुरट व कडू, कटू विपाकी, लघू असूनही शीतवीर्य आहे. त्याचा विशेष उपयोग हृद्रोग, वय:स्थापन, अरुचि, रक्तपित्त, विविध त्वाचाविकार, कफपित्तविकार आणि प्रमेह विकारात केला जातो. ब्राह्मीची मुख्य क्रिया मेंदू व मज्जातंतूवर होत असते. त्याच्या वापराने मेंदूला शांतता येते आणि पुष्टी मिळते. या गुणांमुळे ब्राह्मी खासकरून मानसिक ताण-तणाव, उन्माद, अपस्मार अशा विकारांमध्ये आवर्जून वापरली जाते. मानसविकार नवीन व खूप तीव्र असल्यास ब्राह्मी देऊ नये. कारण त्यात मज्जा उत्तेजक गुण आहेत. त्यामुळे मानसविकार अधिकच बळावेल.

प्राचीन आयुर्वेदीय ग्रंथात ब्राह्मीबरोबर शंखपुष्पी ही वनस्पती वापरावी, असे सांगितले आहे. रोग्याची नाडी शिथिल असल्यास ब्राह्मीचा उपयोग होत नाही, म्हणून तिच्याबरोबर उपलेट किंवा कोहळ्याच्या रसाचा वापर करावा. ब्राह्मीचा उत्तम उपयोग होतो. त्याचप्रमाणे पुष्कळ बोलून ज्यांच्या श्वासनलिकेला थकवा येतो, तेव्हा ब्राह्मीचा अवश्य वापर करावा. ब्राह्मी पोटातही देतात आणि ताजी ब्राह्मी डोक्यावरही चोळतात. ब्राह्मी मतिभ्रंश व गतिभ्रंश या दोन्ही स्थितीत देता येते. ब्राह्मीमुळे लघवीचे प्रमाण वाढते.

हरी परशुराम औषधालयाच्या ब्राह्मीवटी, निद्राकर वटी, ब्राह्मीप्राश, सारस्वतारिष्ट, जपाकुसुमादि तेल, आमलवऱ्यादि तेल, ब्राह्मी घृत या औषधांमध्ये ब्राह्मीचा प्रमुख सहभाग आहे.

First Published on July 27, 2017 1:09 am

Web Title: information on brahmi plant