24 November 2017

News Flash

पिंपळपान : नारळ

थोर व्यक्तीचा सत्कार करावयाचा झाल्यास नारळाशिवाय सत्कार होत नाही.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले | Updated: August 24, 2017 1:14 AM

‘‘स्निग्धं स्वादु हिमं हृद्यं दीपनं बस्तिशोधनम्।

वृष्यं पित्तपिपासाघ्नं नालिकेरदिकं गुरू।।’’

भारतीय समाजामध्ये नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही शुभप्रसंगी श्रीगणेश पूजेनंतर शेंडीवाल्या नारळाची पूजा करण्याची प्रथा सर्वत्र, युगानुयुगे चालू आहे. कोणाही थोर व्यक्तीचा सत्कार करावयाचा झाल्यास नारळाशिवाय सत्कार होत नाही. याउलट मराठी भाषेची एक गंमत नारळासंबंधी काही औरच सत्य सांगते. एखाद्या उद्योगधंद्यात वा कार्यालयात एखाद्या व्यक्तीचे काम असमाधानकारक असल्यास त्याला काढून टाकण्याच्या प्रकारालाही ‘नारळ देणे’ असाच अर्थ अपेक्षित आहे.

जगभर सर्वमान्य असलेला ‘देवाची करणी, नारळात पाणी’ असा नारळ आपल्या अनेकविध आरोग्य समस्यांचा ‘हल’ खात्रीने करतो. आमच्या मायबहिणींच्या रोजच्या स्वयंपाकात ओल्या नारळाचे खोबरे किंवा गोटा खोबऱ्याचे सुके खोबरे नाही, असे कोणत्याच स्वयंपाकघरात घडत नाही. एके काळी आपल्या समाजात अशी समजूत होती की, नारळ-माडाची लागवड फक्त समुद्रपट्टीतच होते, पण ही समजूत खोटी ठरवणारी नारळाची झाडे पुणे शहरातील अनेक सोसायटय़ांत खूप उंच वाढलेली आपण नेहमीच पाहतो. मलबार, कोकण व केरळामध्ये नारळाच्या झाडावर सरसर चढून नारळ काढण्यासाठी खूप मागणी असते.

माड किंवा नारळाचे सर्वच भाग उपयोगी पडतात. पूर्वी अनेक गावांमध्ये नारळाच्या झाडाच्या झावळय़ा घरांचे छप्पर शाकारण्यासाठी वापरल्या जात असत. जून पण ताजे नारळाचे खोबरेल तेल काढण्याचा मोठा व्यावसाय दक्षिण भारतात अनेक ठिकाणी आहे. या तेलात गंधयुक्त द्रव्य आणि आम्लता असते, पण आपण आपल्या घरी नारळाचे खोबरे खवून; ‘लोणी कढवून जसे तूप करतो’ असे नारिकेल तेल तयार केल्यास त्यात किंचितही आम्लता नसते. अशा ताज्या नारिकेल तेलात तुपाइतकेच अनेकानेक शरीरपोषक गुण असतात. नारळापासून काढलेल्या तेलाचा उत्तम दर्जाचा साबण दक्षिणेत खूप लोकप्रिय असतो. नारळाच्या कवटीपासून जाळून काढलेले तेल अनेकानेक त्वचाविकारांवर उपयुक्त आहे. पूर्वी पुण्याच्या मंडईमध्ये पावगी नावाच्या महिला अशा तेलाची खूप विक्री करीत असत. त्यासाठी त्या स्वत: भरपूर श्रम घेत. नारळाचे तेल केश्य, कृमिघ्न, व्रणरोपण, श्लेश्मघ्न, शोषघ्न व कर्षण आहे. आपणा सर्वाना शहाळ्याचे पाणी पिण्याची खूप आवड असते. ते शीतल, मूत्रजनन, मूत्रविरजनीय व पिपासाघ्न आहे. महिलांनी गरोदरपणी नियमित ओल्या नारळाचे खोबरे खाल्ल्यास जन्माला येणारे बाळ गोरेपान व कांतीवान असते, असा सार्थ सार्वत्रिक समज आहे. जून नारळाचा अंगरस खोकला, क्षय व अशक्तपणा दूर होण्यासाठी देतात. त्याने कब्ज मोडतो. दक्षिणेतील मलबार प्रदेशात नारळापासून अति चविष्ट गूळ बनवण्यात येतो. ज्यांचे केस अकाली गेले आहेत, त्यांनी घरी केलेले नारिकेल तेल, पोटात घेण्यासाठी व केसांना लावण्यासाठी वापरल्यास महिना-दीड महिन्यात उत्तम केस येतात. असा अनेक टक्कल पडलेल्या मंडळींचा अनुभव आहे.

घरगुती नारिकेल तेल कॉडलिव्हर ऑइलपेक्षा खूप चांगले काम देते. त्यासाठी क्षयी व्यक्तींनी ओले खोबरे खावे आणि ताजे तेलही प्यावे. खूप अवघड शस्त्रक्रियेच्या आधी व नंतरही कोवळय़ा नारळाचे दूध दिल्यास शस्त्रकर्म निर्विघ्नपणे पार पडते. खूप श्रमाचे काम करणाऱ्या महिलांनी ओले किंवा कोरडे खोबरे खाल्ल्यास त्या आपली गमावलेली ताकद लगेच कमावतात.

हरी परशुराम औषधालयात नारळाच्या तेलाचा वापर करून बनविले जाणारे जपाकुसुम तेल, केसांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी खूप मोलाचे आहे.

First Published on August 24, 2017 1:14 am

Web Title: information on coconut