वैद्य प. य. वैद्य खडीवाले

पूतिहा कटुरुष्णश्च रोचनो दीपनस्तथा।

हन्ति वातं कफं शूलं वम्याध्मानकृमींस्तथा।।

पुदिना हा आपल्या सर्वाच्या दररोजच्या जेवणातील चटणीचा एक अविभाज्य घटक आहे. पुदिन्यास वातलोम, पूतिनाश अशी संस्कृतमध्ये अन्वर्थक नावे आहेत. इंग्रजीत वाइल्डमिन्ट असे म्हणातात. सुगंधी वनस्पती असलेल्या पुदिन्याची बागायती लागवड केली होते. अलीकडे मोठय़ा प्रमाणावर मिळणाऱ्या पुदिन्याची पाने हिरवी असतात. पूर्वी किंचित काळसर आणि हिरवट रंगाचा अधिक चांगल्या दर्जाचा पुदिना भाजीमंडईमध्ये मिळत असे. पुदिना उष्ण आणि रूक्ष असून त्यात वातप्रशमन, दीपन, आर्तवजनन, संकोचविकासप्रतिबंधक असे गुण आहेत. याच्या रसाचा मात्र सकाळ-संध्याकाळ दोन चमचे घेणे गुणकारक आहे.

पुदिना अजीर्ण, कुपचन, पोटफुगी आणि पोटदुखी या विकारांत देतात. याचा अग्निशमन धर्म फार मौल्यवान आहे. याचा धान्याहारी लोकांत विशेष उपयोग होतो. धान्याहारी लोकांना पुदिन्याची चटणी दिल्यास मलावष्टंभ होत नाही. पुदिना काविळीमध्येही देतात. प्रसुतिज्वरांत अंगरस १ ते २ तोळी दरदिवशी घेतल्यास पुष्कळ फायदा होतो. नाडी आणि इतर चिन्हे याचा सारासार विचार करून मात्र वाढवली तरी चालते. ज्वर आणि उन्हाने शरीरांतील उष्णता एकदम वाढल्यास पुदिन्याचा फांट देतात. याच्या सुक्या पानांनी दात घासतात. चक्कर येत असल्यास पुदिन्याच्या पाल्याचे नस्य करतात.

पुदिन्याचा अंगरस आमाशयाची अशक्तता, जुलाब, डोकेदुखी, वातरोग, मूत्रपिंड विकार आणि बस्तीतील अश्मरी या रोगात देतात. पुदिन्यामुळे आतडय़ातील अन्न कुजत नाही आणि पोटात वायूचा गुबारा धरत नाही. ज्यांना वारंवार नाइलाजाने शंकास्पद, खराब, दूषित पाणी प्यावे लागते, त्यांना कृमी, जंत या विकारांना नेहमी तोंड द्यावे लागते. अशांनी नियमित पुदिना, आले अशी चटणी किंवा उकळून केलेले पाणी अवश्य प्यावे.

पूर्वी लाहोर शहरात एक वैद्य होते. त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना ते औषध देत. या औषधांत काही द्रव्ये आहेत याची माहिती मात्र गुप्त ठेवली जात असत. या वृद्ध वैद्याचा अंत:काळ आल्यावर त्याने आपल्या अनोख्या ‘अमृतधारा’ या औषधाचे रहस्य उघड केले. पुदिना किंवा पेपरमिंट अर्क आणि भीमसेनी कापूर असे समभाग एकत्र मिसळल्याबरोबर हे औषध तयार होते. ही सर्व केमिकल्स आहेत. अलीकडे अशी केमिकल चीन व जपानने आयात केली जातात. हे वैद्य या औषधाचा उपयोग पोटात घेण्याकरिता बाह्य़ोपचारार्थही करत असत. त्या काळात सर्वत्र दूषितच पाणी पिण्यासाठी वापरले जात असते. त्यामुळे अतिसार, हगवण, पोटदुखी या रोगांची बाधा होत असे. अशी बाधा झाल्याबरोबर दोन ते चार चमचे अमृतधारा गरम पाण्यात किंवा कोऱ्या कॉफीत घेतल्यास या रोगांपासून नक्कीच फायदा मिळतो. खूप वाहणाऱ्या सर्दीत अमृतधारा दोन थेंब नाकावर बाहेरून लावल्यास नाक वाहणे थांबते. नाक कोरडे होते.