‘‘कुङ्कुमं कटुकं स्निग्धं शिशेरुग्व्रणजन्तुजित्।

तिक्तं वमिहरं वण्र्य व्यङ्गदोषत्रयापहम्।।’’  (भा. प्र.)

समस्त भारतीयांच्या जीवनात देवपूजेला खूप महत्त्व आहे. प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे विविध फळे, पुष्प किंवा सुगंधित द्रव्यांनी देवपूजा करीत असतो. ‘देवपूजेस्तव ही कोरांटी’ अशी प्रथा आहे. कोणी बेल, तुळस किंवा दुर्वा वाहून पूजा करतात, पण हरिद्रा कुंकुमं समर्पयामी या प्रमाणे हळद-कुंकू वाहिल्याशिवाय कोणतीच पूजा सफल होत नाही, अशी सर्व भक्तांची भावना असते. पूजेकरिता वापरले जाणारे कुंकुम व केशर या दोन्हींत भिन्नता आहे. ‘केशर कस्तुरी सुगंध’ अशी पूजेकरिता फार पूर्वी प्रथा होती, असे जुनेजाणते लोक सांगतात. पण आता कस्तुरीची तर बातच सोडा पण अस्सल केशर मिळणे खूप दुष्कर होऊन बसले आहे.

कुङकुम, रुधिर, संकोच (संस्कृत), केस (हिंदी, गुजराती), कुमकुम (बंगाली), जाफरान (फारसी) अशा विविध नावांनी ओळखल्या जाणाऱ्या केशराचे मूळस्थान काश्मीर, इराण, स्पेन यापैकी कोणते याबाबत तज्ज्ञांत मतभेद आहेत. काश्मिरी केशरापेक्षा स्पॅनिश केशराला खवय्ये अधिक पसंती देतात. बाजारामध्ये ‘जाफरानी केशर’ या नावाने मिळणाऱ्या केशरला खूप मागणी असते.

आपल्या वापरातील केशर, पुष्पातील पराग आहे. याच्या झाडास कंद असतात. केशराची लागवड मुख्यत्वे काश्मिरात करतात. सर्वाधिक केशर पंजाबातच खपते. मुंबईतील बाजारात फ्रान्स, चीन व इराणमधून केशर येते. खरे केशर एकरंगी, सुवासिक आणि जरा कडवट असते. करडईच्या फुलांतील पराग केशरांत मिसळतात. ते करडय़ा रंगाचे असून, त्यास वास नसतो. करडईच्या परागापेक्षा खरे केशर जड असते. केशर दीपन, पाचन, रोचन, वेदनास्थापन, संग्राहक, संकोचविकासप्रतिबंधक, आर्तवजनन व कामोत्तक आहे. हे सर्व धर्म अल्प प्रमाणात असल्यामुळे केशर हे प्रधान औषध नाही. हे अर्धा ते दीड ग्रॅम या प्रमाणात इतर औषधांबरोबर द्यावे. कष्टार्तवात केशर पूर्ण मात्रेत दिल्यास पोटदुखी कमी होते व मासिक पाळी सुधारते. लहान मुलांच्या सर्दी-पडशात केशराचे दोन चर पराग दुधामध्ये मिसळून दिल्यास चटकन उतार पडतो आणि खूप महागडी औषधी घ्यावी लागत नाहीत. लहान मुलांच्या पोटफुगी, जुलाब अशा तक्रारींत केशराचा आठवणीने वापर करावा. बालकांच्या आनंदीमुद्रेच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.

विविध रुग्णमित्रांकरिता काही वेळा तीव्र गुणाची औषधे, नाइलाजाने अनेक ज्ञानी वैद्यमंडळी देत असतात. उदा. पारा, गंधक, नागभस्म अशी स्ट्राँग घटकद्रव्ये त्यात असतात. त्याची ‘रिअ‍ॅक्शन’ रुग्णाला कदापि होऊ नये म्हणून त्या औषधांबरोबर किंवा अनुपान म्हणून दिल्या जाणाऱ्या दुधामध्ये अल्प प्रमाणात का होईना केशर वापरण्याचा उत्तम प्रघात आहे. कृश, कमजोर व रोगप्रतिकारकशक्ती गमावलेल्या व्यक्तींकरिता अनेकानेक प्राश, पाक व अवलेह वापरले जातात. त्यात दालचिनी, तमालपत्र, सुंठ, लवंग, पिंपळी, मिरी अशा विविध चूर्णाबरोबर अल्प प्रमाणात केशर मिसळल्याने ती औषधे रक्तवर्धन व रुची वाढविण्याचे उत्तम काम पाहतात. हरी परशुराम औषधालयाच्या नागगुटी व कुंकुमाद्य घृत या औषधात केशराचा आवर्जून समावेश केला जातो. त्यामुळे ती औषधे अधिक परिणामकारक ठरतात.

केशर कितीही महाग असले तरी ‘जयति रसाला प्रतिश्यायं’ अशी प्रसिद्धी असलेल्या श्रीखंडात उत्तम दर्जाचे केशराचा समावेश असतो.