23 January 2018

News Flash

पिंपळपान : चिंच

शेंगातील गीर पिपासाघ्न रोचक, दाहशामक, आनुलोमिक आणि रक्तपित्त प्रशमन आहे.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले | Updated: August 3, 2017 1:26 AM

‘‘अम्लिकाया: फलं त्वाममत्यम्लं

लघु पित्तकृत।

पक्वं तु मधुराम्लं स्यादभेदि विष्टम्भबातजित्।।

चिञ्चापत्रं तु शोथघ्नं

रक्तदोष व्यथापहम्।

तस्य शुष्कत्वचाक्षार: शूलमन्दाग्निनाशन:।।’’  (भा. प्र.)

माझे प्राथमिक शिक्षण शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत झाले. त्या शाळेच्या इमारतीच्या मागे असलेल्या मैदानाच्या एका बाजूस एक मोठा चिंचेचा वृक्ष होता. आम्हा मुलांचा दुपारच्या सुट्टीचा वेळ ओल्या, गाभुळलेल्या किंवा पिकलेल्या चिंचेची बुटके दगडाने पाडण्यात जात असे. लहानपणी आपण सहजपणे ओली चिंच मजेत खात असू, पण आता मोठे झाल्यावर ओली चिंच खायचा नुसता विचार जरी आला तरी दात आंबतात. या गुणामुळेच चिंचेला अम्लिका (संस्कृत), इमली (हिंदी), चिन्तचेट्ट (तेलुगू), आमलम (मल्याळम), टॅमरिंड (इंग्रजी) अशा विविध नावांनी ओळखले जाते.

हा वृक्ष सावकाश वाढतो. दीर्घकाळ जगतो. त्यामुळे त्याचे खोड म्हणजे खूप मोठय़ा आकाराचा जणू काही जाडजूड खांबच असतो. अपवाद म्हणून गुजरातमध्ये गोड चवीच्या चिंचेची झाडे आहेत. चिंचेत चिंचाम्ल (टार्टारिक अ‍ॅसिड ९ भाग), जम्बीराम्ल (सायट्रिक अ‍ॅसिड ९ भाग) आणि जवखाराचे चिंचाम्लाशी मिश्रण (पोटॅशियम बाय टायट्रेट ७ टक्के) असते. चिंचेच्या आत ज्या पांढऱ्या आठोळय़ा असतात, त्याचा उपयोग कपडय़ांना विशेषत: घोंगडय़ांना खळ देण्यासाठी करतात.

शेंगातील गीर पिपासाघ्न रोचक, दाहशामक, आनुलोमिक आणि रक्तपित्त प्रशमन आहे. टरफलाची राख क्षारस्वभावी, मूत्रजनन आणि आनुलोमिक आहे. फुले शोथघ्न आणि रक्तसंग्राहक आहेत. पित्तज्वरात किंवा कोणत्याही ज्वरात कबज असल्यास आणि दाह होत असल्यास चिंचेचे पन्हे देतात. अत्यार्तव व गरमीपरम्यामध्ये चिंचेच्या टरफलाची राख देतात. पाला ठेचून वाहत्या जखमेवर लावल्यास जखम लवकर भरून येते.

ज्या मंडळींना दीर्घकाळ मलावरोधाचा त्रास आहे, संडासला खडा होतो, कठीण होते, जोर करावा लागतो. त्यांनी ‘चिंचालवण तेल’ पहाटे व सायंकाळी पाच वाजता तीन चमचे गरम पाण्याबरोबर घ्यावे. आपणास एक कप चहा करावयास जेवढा वेळ लागतो, तेवढय़ाच वेळात चिंचालवण तेल तयार होते. नेहमीचे गोडेतेल सहा चमचे, थोडेसे मीठ, पाव लिटर पाणी आणि चिंचेची दोन बुटुके घ्यावीत. प्रथम चिंच व पाणी एकत्र उकळावे, चतुर्थाश उरवावे. ते पाणी गाळून त्यात मीठ व गोडेतेल मिसळावे, आटवावे, फक्त तेल उरवावे. असे तेल पहाटे व संध्याकाळी प्यावे. सकाळी ‘शौचानंदं परमसुखदम।’ हा अनुभव खात्रीने घ्यावा. शंखवटी या प्रसिद्ध औषधात चिंचेचा मोठय़ा प्रमाणात वापर आहे. चिंचाक्षार-टार्टारिक अ‍ॅसिड हे निव्वळ रसायन असून त्यात कणभरही चिंच नसते. फक्त चिंचेची चव एकाच कणात इतकी असते की आपले दात क्षणात आंबतात. आपल्या रोजच्या जेवणात चविष्ट चिंचासार देणाऱ्या मायभगिनींना प्रणाम.`

First Published on August 3, 2017 1:26 am

Web Title: information tamarind
  1. No Comments.