18 January 2019

News Flash

मन:शांती : समुपदेशन म्हणजे काय?

‘आम्हाला काही त्रास नाही होत. फक्त झोपेसाठी औषध द्या आणि बाकी समुपदेशन करूया.’

(संग्रहित छायाचित्र)

-डॉ. अद्वैत पाध्ये

‘समुपदेशन म्हणजे काय असतं डॉक्टर?’

‘समुपदेशन म्हणजे फक्त बोलायचंच ना? बोलून फक्त कसं बरं करणार?’

‘समुपदेशन करणारे काय वेगळं बोलतात? आम्ही जे जे सांगतो तेच तर सगळं सांगतात? मग कशाला करायचं समुपदेशन?’

‘आम्हाला काही त्रास नाही होत. फक्त झोपेसाठी औषध द्या आणि बाकी समुपदेशन करूया.’

‘आता मला बरं वाटतंय. आता औषधेच चालू ठेवूया. समुपदेशन कशाला?’

असे अनेक प्रकारचे प्रश्न, अशा अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया मानसोपचाराबाबत ऐकायला मिळतात. या उपचारांबद्दलचं अज्ञान वा अर्धवट माहितीतून झालेले गैरसमज हे यामागचं महत्त्वाचं कारण आहे. मास्लो नावाच्या मानसशास्त्रज्ञाने या मानसोपचाराची नेटकी व्याख्या केली आहे. समुपदेशन ही उपचाराची अशी पद्धती आहे की ज्यामध्ये बाधित/ तणावग्रस्त व्यक्तीला समजून घेऊन, तसेच आजूबाजूच्या व्यक्ती, परिस्थिती समजून घेऊन, त्या व्यक्तीला स्वत:च्या वैचारिक, भावनिक प्रक्रियांमध्ये बदल घडवण्यास प्रवृत्त करून जीवनातील विविध समस्यांना तोंड देण्याची त्या व्यक्तीची क्षमता वाढवली जाते वा त्या व्यक्तीला सक्षम केले जाते! यामध्ये योग्य गोष्टींसाठी त्या व्यक्तीला प्रोत्साहित करणे (चांगल्या सवयी), भावनांचं प्रकटीकरण करून मनातल्या सर्व गोष्टी सांगून मनावरचे ओझे कमी करणे, तणाव कमी करायला मदत करणे, सवयी बदलणे, विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवणे आणि नातेसंबंध सुधारायला मदत करणे इत्यादी बाबी अंतर्भूत असतात. कोणत्याही मनोविकारांमध्ये आधी सांगितल्याप्रमाणे तीन घटक कारणीभूत असतात. जीवशास्त्रीय, मानसशास्त्रीय, सामाजिक वा कौटुंबिक. त्यातील जीवशास्त्रीय घटकांसाठी औषधोपचार वा इतर शारीरिक उपचार आहेत तसेच मानसशास्त्रीय, कौटुंबिक घटकांसाठी समुपदेशन महत्त्वाचे आहेत. नुसते औषधोपचार, नुसते समुपदेशन यापेक्षा दोहोंची सांगड घालून केलेले उपचार हे जास्त प्रभावी आणि यशस्वी ठरतात.

समुपदेशनाचे वर्गीकरण करायचे झाले तर ते वैयक्तिक किंवा मग जोडप्याचे, जोडीचे, कुटुंबांचे किंवा गटाचे असू शकते. वैयक्तिक समुपदेशनात लहान मूल, कुमारवयीन मुले, प्रौढ व्यक्ती येतात. लैंगिक वा वैवाहिक समस्यांसाठी जोडीने किंवा दाम्पत्याचे मानसोपचार करावे लागतात तर विविध स्वमदत गट, अल्कोहोलिक अ‍ॅनॉनिमससारखे गट समुपदेशनासाठी येतात.

समुपदेशन हा शब्द मानसोपचाराला समानार्थी वापरला जातो. समुपदेशन या शब्दाचा अर्थच सांगतो की हा उपदेश नाही, गुरूने शिष्याला केल्यासारखा वा थोरांनी लहानाला केल्यासारखा. यामध्ये आधी समोरच्या व्यक्तीशी आपुलकीचं नातं, विश्वासाचं नातं प्रस्थापित करून त्याच्या समस्येला सर्व बाजूंनी जाणून घेण्यात येतं. त्यासाठी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांशीही बोलले जाते, पण व्यक्ती / रुग्ण देत असलेली माहिती ही त्या व्यक्तीच्या संमतीशिवाय कोणालाही सांगितली जात नाही, हा गुप्ततेचा करार असतो आणि मग नंतर विविध उपाय वापरून त्या व्यक्तीची समस्या सोडवण्यासाठी त्या व्यक्तीला मार्ग सुचवला जातो. शेवटी त्या मार्गावरून जाणे किंवा तो सल्ला अमलात आणणे हे त्या व्यक्तीचे काम असते. थोडक्यात समुपदेशनाचे यश हे मानसोपचारतज्ज्ञाचे कौशल्य आणि रुग्णाचे सहकार्य, अंमलबजावणी यावर अवलंबून असते. त्यात सातत्य हे फार महत्त्वाचे असते. त्याचे यश हे औषधासारखे लगेच दिसत नाही तर वेळ लागू शकतो. व्यक्ती किती मनापासून, सातत्याने उपचारांना येत आहे तसेच तज्ज्ञ किती कौशल्याने वेगवेगळ्या पद्धती वापरून उपचार करत आहे यावर यशस्वीतता ठरत असते.

तज्ज्ञ व रुग्ण / व्यक्ती यांचे नाते फार महत्त्वाचे असते या प्रवासात. बऱ्याचदा रुग्ण / व्यक्ती तज्ज्ञांकडे मित्र, भाऊ / बहीण, वडील, गुरू या नात्यातून पाहू शकते. तसेच व्यक्तीच्या सहकार्याप्रमाणे तज्ज्ञालाही व्यक्तीबद्दल सकारात्मकता वाटत असते, पण व्यक्ती सहकार्य करत नसेल तर तज्ज्ञाच्या मनातही थोडी नकारत्मकता येऊ शकते. या सर्वाचा परिणाम उपचाराच्या यशस्वीततेवर होत असतो. रुग्णाच्या समस्येच्या तीव्रतेप्रमाणे, बौद्धिक पातळीप्रमाणे वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. तीव्र लक्षणे असताना किंवा अल्पशिक्षित व्यक्तीसाठी वर्तनोपचार, तसेच आश्वासकता निर्माण करणारे, समस्येची माहिती देऊन जागरूकता निर्माण करणारे समुपदेशन द्यावे लागते, तर सुशिक्षित आणि बौद्धिक व्यायाम असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत वैचारिक दृष्टिकोन बदलण्यावर भर दिला जातो आणि तो करताना वर्तनोपचाराशी सांगड घातली जात असते.

सिग्मंड फ्रॉॅईडने मनोविश्लेषणाची पद्धती वापरली होती, पण ती खूपच दीर्घकालीन असते आणि त्याची यशस्वीतता सर्वच समस्यांसाठी  दिसून येत नसल्याने आता ती कालबाह्य झाली आहे. एकूणच मानसोपचार ही नक्की प्रभावी उपचारपद्धती आहे. हिचा योग्य, सातत्यपूर्ण उपयोग केला तर नक्कीच लाभ होतो!

Adwaitpadhye1972@gmail.com

First Published on May 15, 2018 3:27 am

Web Title: informative article on counseling