News Flash

पिंपळपान : इसबगोल

जुनाट रक्तीआव किंवा मूत्रपिंडाच्या दाहयुक्त विकारात इसबगोलचा फांट देतात.

इसबगोल

‘‘अश्गोलमश्चकर्णबीज च स्निग्धजीरकम्।

अश्वगोल गुरू स्वादु स्निग्ध शीतं च पिच्छिलम्॥’’

विविध लहान-मोठय़ा शहरांतील रुग्णमित्रांना, वारंवार संडास होणे किंवा मलावरोधाची नित्य बाधा असल्यास, ‘तुम्ही इसबगोल घ्या’ हे सांगावे लागत नाही, इतका इसबगोलचा सार्वत्रिक वापर आहे. इसबगोलचे बी किंचित गुलाबी रंगाचे व नोकदार टोक असलेले असे असते. पण त्याचा वापर क्वचितच केला जातो. इसबगोलच्या बियांवरील साल गिरण्यांमध्ये काढली जाऊन त्याची इसबगोल भुशी, किंचित पांढरट रंगाची अशी तयार केली जाते. इसबगोलचे मूळ उत्पत्तीस्थान इराण, सिंध व अलीकडे पंजाब प्रांतात आहे. मध्य प्रदेशात याची मोठय़ा प्रमाणावर लागवड केली जात आहे. दोनशे वर्षांपूर्वी वैधराज मोरेश्वरकृत ‘वैद्यामृत’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्यामध्ये अतिसारावर अनुभवपूर्ण उल्लेख केला गेला व त्यामुळे उत्तर हिंदुस्थानात या इसबगोलभुशीचा खूप खूप वापर सुरू झाला. खरे पाहिले असता इ. स. दहाव्या शतकापासूनच विविध अरब देश व इराणमध्ये हकीम लोक त्यांचेकडे नित्य येणाऱ्या रुग्णांकरिता इसबगोलचा वापर खूप खूप करत असत. कारण त्या काळात प्रवाहिका, डिसेंट्री, अतिसार यामुळे सर्वसामान्य माणूस फार पिचलेला असे.

इसबगोलला अश्वकर्णबीज, असफगोल, इस्फगोल, स्फुगर अशा विविध नावांनी ओळखले जाते. फारसी भाषेत इस्फ या नावाने घोडय़ाची ओळख होते. इसबगोलच्या बियांचा आकार घोडय़ाच्या कानासारखा असतो. म्हणून त्याला इसबगोल म्हणण्याची प्रथा पडलेली असावी. इसबगोल शीतल, स्नेहल, मलसंग्राहक व रक्तसंग्राहकाचे उत्तम काम करते. इसबगोल नेहमी तापातील प्राथमिक अवस्था व अभिष्यंदयुक्त रोगात देतात. याचा फांट नल्याने खोकल्याची ढास आल्यास उपयुक्त आहे. त्यामुळे घशाचा व श्वासनलिकेचा कोरडेपणा लगेच कमी होतो. आतडय़ांच्या कफ व पित्तप्रधान रोगांमध्ये नियमित दिल्यास काही काळात अन्नपचन सुधारते. इसबगोलभुशी आतडय़ात गेल्यावर फुगते. ज्या मंडळींना दीर्घकाळचा मलावरोधाचा त्रास आहे, त्यांच्या आतडय़ातील अन्नाचे पुर:सरण क्रिया मंदावलेली असते. अशांना काही वेळा दोन दोन दिवस मलप्रवृत्तीच होत नाही. अशी मंडळी तत्काळ सर्वत्र रेडीमेड असणाऱ्या इसबगोलभुशीचा वापर सुरू करतात. इसबगोलभुशी तुमच्या आमच्या आतडय़ांत गेल्यावर फुगून आतडय़ांत साठलेला मळ आपल्याबरोबर खात्रीने खाली घेऊन जाते. ती नियमितपणे वापरली नाही तर त्याचा दुष्परिणाम संबंधिताला होत नाही. ‘पण घ्यावयास सुलभ असल्यामुळे तिचा अकारण रोज वापर केल्यामुळे, आतडय़ांची आपणहून मळ पुढे ढकलण्याची नैसर्गिक क्रिया नष्ट होते, व संबंधिताला जणू काही त्याचे व्यसनच लागते.’

जुनाट रक्तीआव किंवा मूत्रपिंडाच्या दाहयुक्त विकारात इसबगोलचा फांट देतात. दिवसेंदिवस औषधी बाजारात ग्राहकांना, भूलभुलैया करून विविध औषधांची सवय लावायची शर्यत जोरात आहे. इसबगोलभुशीला सोनामुखी पानांच्या काढय़ाची भावना देऊन खूप महागडय़ा किमतीत ती जगभर विकली जाते. हे सत्य ग्राहकमित्रांना माहीत असावे. ‘ग्राहक देवोभव!’

– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 3:50 am

Web Title: isabgol benefits
Next Stories
1 हृदयाजवळचा  स्टेंट
2 मन:शांती : मानसिक आजार.. का?
3 पिंपळपान : अमरवेल
Just Now!
X