तळपायांना भेगा पडणे

दिवसातून २ ते ३ वेळा तळपाय स्वच्छ धुऊन, कोकम तेलाचे गोळे गरम करून (वितळवून) निघणारे कोकम तेल चोळून चोळून जिरवावे किंवा गाईचे तूप व खोबरेल तेल एकत्र करून किंवा वेगवेगळे २ ते ३ वेळा तळपायांना चोळून जिरवावे. या भेगांबरोबर तळपायांची आग होत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास थंड पाण्यात दोन्ही पावले बुडवून ठेवावीत. वरील कोकम तेल, खोबरेल तेल किंवा तूप हे काशाच्या वाटीने चोळावे.

तळपायांच्या भोवऱ्या

गरम पाण्यात तुरटीचा खडा भिजवून त्याने भोवरीवर घासून मसाज करावा आणि त्यानंतर भोवरीचे मलम लावावे. भोवरी मऊ पडून वेदना कमी होतात.

चिखल्या

बोटांच्या बेचक्यांमध्ये या होतात. यात खूप खाज असेल तर खोबरेल तेलात मीठ एकत्र करून चोळावे. चिखल्या सुकण्यासाठी शंखजिऱ्याची पावडर किंवा ज्येष्ठमध पावडर खोबरेल तेलातून चोळून लावावी. लिंबाचा पाला वाटून तो लावावा. राळ, मेण, तेल यांपासून बनवलेली मलमे चिखल्या व भेगांमध्ये खूप उपयोगी पडतात. पायांच्या सर्वच त्वचाविकारांमध्ये तळपाय, बोटांमधील जागा कायम कोरडी ठेवणे व पायांना धूळ, माती, चिखल, पाणी यांपासून दूर ठेवणे अत्यावश्यक असते.

– वैद्य राजीव कानिटकर