09 March 2021

News Flash

कुष्ठरोगावर नियंत्रण

कुष्ठरोग हा कुष्ठजंतूमुळे (मायक्रो बॅक्टेरिअम लेप्रे) होणारा सांसर्गिक रोग आहे.

कुष्ठरोग हा कुष्ठजंतूमुळे (मायक्रो बॅक्टेरिअम लेप्रे) होणारा सांसर्गिक रोग आहे.

कुष्ठरोग हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे. त्वचा, हातातील आणि पायातील परीघवर्ती चेता, नाकाची अंत:त्वचा, घसा आणि डोळ्यावरही आजाराचा परिणाम होऊन त्यांची संवेदना नष्ट होऊ शकते. आजार बळावल्यास रुग्णाच्या हाता, पायांची बोटे वाकडी होणे वा गळून पडू शकतात. या आजाराचे वेळीच निदान करून तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेतल्यास आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. पूर्व विदर्भाच्या सहाही जिल्ह्य़ांसह राज्यातील १६ जिल्ह्य़ांत या आजाराचे रुग्ण जास्त आहेत.

कुष्ठरोग हा कुष्ठजंतूमुळे (मायक्रो बॅक्टेरिअम लेप्रे) होणारा सांसर्गिक रोग आहे. या जिवाणूंचा शरीरात शिरकाव झाल्यास मानवाची रोग प्रतिकारशक्ती कमी होते. तेव्हा वेळीच उपचार न झाल्यास रुग्णाच्या त्वचेतील केसांची मुळे, घाम येणाऱ्या ग्रंथी आणि संवेदी चेता यांचा नाश संभावतो. परिणामी त्वचा कोरडी आणि रंगहीन बनते. त्वचा संवेदनहीन झाल्याने स्पर्शज्ञान होत नाही. चेहरा, हात आणि पायाच्या चेता आकाराने मोठय़ा होतात. चेता हातास जाणवणे हेही या आजाराचे लक्षण आहे. तर लेप्रोमॅट्स कुष्ठरोग (एलएल) हा कुष्ठरोगाचा दुसरा अधिक संसर्गजन्य प्रकार आहे. यात शरीरातील प्रतिकारशक्ती रोगापासून बचाव करण्यास अपुरी पडते. त्यामुळे कुष्ठरोगाचे जिवाणू त्वचेमध्ये वाढतात. या संवर्गातील कुष्ठरुग्णाच्या सर्व शरीरभर आणि चेहऱ्यावर गाठी येण्याची शक्यता असते. कधी कधी डोळे, नाक आणि घशातील अंत:त्वचेवर गाठी येतात. चेहऱ्यावर आलेल्या गाठीमुळे चेहसा सिंहासारखा दिसायला लागतो. एमबी कुष्ठरोगामुळे अंधत्व, आवाजात बदल, नाकाचा आकार बदलू शकतो. या रुग्णाचा संसर्ग दुसऱ्याकडे केव्हाही होऊ शकतो. लहान मुलांमध्ये याची लागण लवकर होते. राज्यातील गडचिरोली जिल्ह्य़ात सर्वाधिक कुष्ठरोगाचे रुग्ण आढळले असून चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्य़ांतही प्रति दहा हजारांत एकहून जास्त लोकांना हा आजार आहे.

महत्त्वाचे

कुष्ठरोग हा कोणालाही होऊ शकतो.

हा आजार आनुवंशिक नाही.

पाप-पुण्याचा आजाराशी कुठलाही संबंध नाही.

पूजा-अर्चा, नवस फेडणे, जडीबुटी, मंत्र-तंत्र हा उपाय नाही.

स्पर्शजन्य (स्पर्शामुळे होणारा) रोग नाही.

सहजासहजी कुणालाही होणारा आजार नाही.

हा आजार संबंधित व्यक्तीच्या कुष्ठरोगाविरुद्धच्या रोगप्रतिकारक शक्तीवरच अवलंबून आहे.

कुष्ठरोगाविरुद्धच्या नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीमुळे ९८ टक्के लोकांना हा आजार होऊ शकत नाही.

लवकरच निदान आणि नियमित औषधोपचाराने रुग्ण बरा होतो, पण विकृती पूर्ववत होत नाही.

बहुविध औषधोपचाराने बरी झालेली व्यक्ती रोग प्रसार करत नाही.

आजाराचा प्रसार

संसर्ग झालेल्या रुग्णाच्या शिंकण्यातून, खोकल्यातून व श्वासातून कुष्ठरोगाचे जंतू हवेत पसरतात.

श्वास प्रक्रियेत श्वसन मार्गातून हे जंतू मानवी शरिरात प्रवेश करतात.

कुष्ठरोगाचा अधिशयन काळ हा कुष्ठजंतूचा संसर्ग (जंतूचा शरीरात प्रवेश) झाल्यापासून ते कुष्ठरोगाची लक्षणे शरीरावर दिसू लागेपर्यंतचा काळ जवळपास ३ ते ५ वर्षे इतका आहे.

औषधोपचाराखालील (बहुविध औषधोपचार- एम. डी. टी.) पूर्ण झालेले कुठलेच रोगी कुष्ठरोगाचा प्रसार करत नाही.

उपचार व प्रतिबंधात्मक उपाय

बहुविध औषधोपचार (एम. डी. टी.) वा इतर औषधांचा वापर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्याने करावा.

निरंतर स्वयंदेखभालीने रुग्णाच्या विकृतीस प्रतिबंध घालता येतो.

बधिर व लकवाग्रस्त अवयवांना जखमा होऊ नये म्हणून काळजी घेणे.

रुग्णाला जखम होताच तातडीने उपचार करणे.

रुग्णाचे सुन्न, बधिर हातपाय दररोज १५ ते २० मिनिटे पाण्यामध्ये बुडवून तेलाने मालीश, व्यायाम, करणे.

सुन्न, बधिर पायासाठी एम. सी. आर. चपलांचा नियमित वापर करणे.

लक्षणे

अंगावरील त्वचेच्या रंगापेक्षा फिक्कट, लालसर कुठलाही डाग वा चट्टा.

त्वचेच्या रंगरूपात होणारे बदल (तेलकट, लालसर, सुजलेली व गुळगुळीत त्वचा).

त्वचेला कोरडेपणा येतो व भेगा पडतात.

संबंधित भागात बधिरता येते.

स्नायूंत अशक्तपणा येऊन ते नीट कार्य करू शकत नाहीत.

एलएल कुष्ठरोगामध्ये नाकाचा आकार मोठा होतो.

नाकाच्या अंत:त्वचेमध्ये कुष्ठरोगाच्या गाठी आल्याने परिणाम होतो.

चेहऱ्यावर आणि शरीरभर गाठी येणे.

परीघवर्ती चेतांच्या टोकांचा दाह होणे.

निदान

रुग्णाच्या त्वचेवरील डागाच्या संवेदना तपासून बहुतांश रुग्णांत कुष्ठरोगाचे निदान करणे शक्य आहे.

काही रुग्णांत बाधित चेतातंतू व संबंधित भागातील संवेदना आणि स्नायूंची कमजोरी तपासूनही आजाराचे निदान करता येते.

वरील दोन्ही बाबी दिसत नसल्यास रुग्णांत त्वचाविलेपन नमुन्याची प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारे तपासणी करून निदान करता येते.

त्वचेवरील चट्टय़ांची स्थिती आणि रुग्णाच्या कुष्ठरोगप्रवण भागात असलेल्या सहवासातूनही आजाराची खात्री करता येते.

डॉ. संजय मानेकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 2:31 am

Web Title: leprosy disease symptoms causes and treatment
Next Stories
1 बाल आरोग्य : ‘ताप’दायक!
2 उन्हाळा फलदायी!
3 पंचकर्म : वसंत ऋतूसाठी पंचकर्मे
Just Now!
X