डॉ. अद्वैत पाध्ये

‘‘डॉक्टर, आमच्या नीलेशचे नैराश्य ईसीटी देण्याएवढे तीव्र आहे का? ईसीटी देणार म्हणजे भूल देणार. हे टाळून दुसरी तशीच परिणामकारक काही उपचारांची पद्धत आहे का?’’

All information about OpenAI GPT 4 Vision in marathi
प्रतिमा, मजकूर आणि ध्वनी अशा तिन्ही गोष्टींवर करणार प्रक्रिया; GPT- 4 Vision नक्की काय आहे?
How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
Did you know that polyvalent astaxanthin is a natural colorant
Health Special : नैसर्गिक रंग देणारे बहुगुणी ॲस्टाझॅनथीन तुम्हाला माहीत आहे का?
Foods For a Diabetic:
तुम्हाला मधुमेह असल्यास ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश; रक्तातील साखरेची पातळी राहील नियंत्रणात

नीलेशची आई मला विचारत होती, ‘‘नैराश्यासाठी दुसरी आणखी परिणामकारक उपचारपद्धती आहे असे मी ऐकले आहे. ती देता येईल का?’’ दहा वर्षांपूर्वी हा प्रश्न विचारला असता तर अशी पद्धती आपल्या देशात उपलब्ध नाही, असे मी सांगितले असते. परंतु आज ही पद्धती – ज्याला रिपेटेंटिव्ह ट्रान्सकेनियल मॅग्नेटिक स्टीम्युलेशन (आरटीएमएस) उपचारपद्धती म्हणतात, देशात काही ठिकाणी उपलब्ध आहे.

सेरेलेट्टी व ल्युरिओ बिनी यांनी ईसीटीचा शोध लावला, तो १९३८ मध्ये! त्यानंतर पन्नास वर्षांनी १९८५ मध्ये अँथोनी व त्याच्या सहकाऱ्यांनी चुंबकीय लहरींद्वारे मेंदू उत्तेजित करून काही विकारांवर उपचार करता येतात हे सिद्ध केले. सुरुवातीला चेतातंतूच्या कार्याच्या अभ्यासासाठी याचा उपयोग केला जात असताना अँथोनीच्या लक्षात आले की याचा उपयोग चेतापेशींमधील जागेतील रिसेप्टर्सवरही व पर्यायाने चेतापेशींच्या कार्यावरही होऊ शकतो.

पण याचा पहिला परिणामकारक उपयोग हा इंग्लंडमधील शेफील्ड विद्यापीठात  १९८५ मध्येच बार्कर, जॅलिन्स व फ्रिस्टन यांनी करून दाखवला. त्यानंतर यंत्रामध्ये अनेक बदल करून २०हर्टझपर्यंतच्या उच्च मात्रेत उत्तेजना देऊन मेंदूच्या भाषा, स्मृती व मूडवर चांगला परिणाम साधता येतो हे सिद्ध झाले. नैराश्याबरोबर चिंतेचे विकार (भयगंड) स्किझोफ्रेनिया विकारात पण त्याचा चांगला उपयोग करता येऊ शकतो हे दिसून आले. २००८ मध्ये अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने या उपचारपद्धतीला नैराश्याच्या विकारात वापरण्यासाठी मान्यता दिली.

एक विशिष्ट प्रकारची कॉईल वापरून या चुंबकीय लहरींनी मेंदूला उत्तेजित केले जाते. चुंबकीय लहरी मेंदूतील विद्युत रासायनिक बदलाला प्रोत्साहित करतात व त्याद्वारे मेंदूच्या पेशीतील ज्या विविध जीवरसायनांच्या रिसेप्टर्स असतात त्यांच्या कार्यावर योग्य तो परिणाम साधला जातो. उदा. नैराश्यात सिरोटोनिनचे प्रमाण कमी असते तेव्हा त्याच्या रिसेप्टर्सचे कार्य वाढवले जाते तर स्किझोफ्रेनियात डोपामिनचे प्रमाण जास्त असते तिथे त्यांच्या रिसेप्टर्सचे कार्य कमी केले जाते.

त्यामुळे उपचार सुरू करण्याआधी कोणत्या वारंवारतेच्या टप्प्यावर मेंदूचे उत्तेजन होऊन हातांच्या बोटांची एकदम झटक्यासारखी हालचाल होते ते पाहिले जाते. त्यापेक्षा काही टक्के कमी वारंवारता असलेल्या चुंबकीय लहरी डोक्यावर विशिष्ट ठिकाणी कॉइल ठेवून दिल्या जातात. दररोज एक दिवस याप्रमाणे काही आठवडे सातत्याने हे उपचार घ्यावे लागतात.

ज्यांना फिट्सचा त्रास आहे अशा व्यक्तींना हे उपचार देता येत नाहीत. कारण अशा व्यक्तींना या उपचारांत फीट येण्याची शक्यता थोडी जास्त असते. तेवढे सोडले तर या उपचारपद्धतीला बाकी फारसे दुष्परिणाम आढळत नाहीत.

ही पद्धती वापरताना ईसीटीप्रमाणे शरीरात वा मेंदूत कोठेही सुई वगैरे काही टोचावी लागत नाही किंवा झटके पण येत नाहीत त्या अर्थाने ही पद्धत सोपी आहे. परंतु ईसीटी ही सहा ते दहा सत्रांमध्ये संपते तर ही काही आठवडे दररोज/आठवडय़ातून पाच दिवस याप्रमाणे द्यावी लागते. वारंवारता कमी ठेवली तर आठवडय़ातून पाच दिवस याप्रमाणे सहा आठवडे, जास्त ठेवली तर चार आठवडे नैराश्याच्या विकारासाठी हे उपचार घ्यावे लागतात. सर्वसाधारण डोक्याच्या पुढच्या भागावर कॉईल ठेवून प्रीफॉटल कॉर्टेक्सला उत्तेजित केले जाते.

नैराश्याची अतितीव्र लक्षणे असतील, म्हणजे रुग्ण आत्महत्येचा प्रयत्न करत असेल किंवा हिंसक होत असेल तर अशा वेळेस लवकर आराम मिळणे व लक्षणे ताबडतोब कमी होणे गरजेचे असते. अशा स्थितीत मग ईसीटीची उपचारपद्धती जास्त परिणामकारक ठरते. परंतु मध्यम -तीव्र लक्षणे किंवा औषधोपचारांना प्रतिसाद न देणारी लक्षणे असतील तर अशा वेळी ही चुंबकीय उपचारपद्धती उपयोगी ठरू शकते. शेवटी कोणत्या रुग्णाला कोणती उपचारपद्धती वापरायची हा निर्णय तज्ज्ञालाच घ्यावा लागतो.

या उपचारांमुळे होणारे परिणाम हे दीर्घकाळ टिकतात. कारण चेतापेशींच्या कार्यप्रवणतेवर हे परिणाम होतात. त्यामुळे ही पद्धती भारतात मूळ धरत आहे. याशिवाय मेंदू उत्तेजनाच्या इतरही काही पद्धती सांगितल्या गेल्या आहेत, अभ्यासल्या जात आहेत, पण अजून वापरात आलेल्या नाहीत. थोडक्यात मनोविकारावरील औषधोपचार, औषधांशिवायचे हे शारीरिक उपचार / मेंदू उपचार विकसित होत आहेत, चांगले परिणाम दाखवत आहेत. फक्त आपल्या मनातील सकारत्मकता जागृत ठेवली पाहिजे!

Adwaitpadhye1972@gmail.com