‘झण्डु: कटुकषाया

स्याज्ज्वरभूतग्रहापहा।’ रा. नि.

‘दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा’

समस्त भारतीयांच्या जीवनात ‘साडेतीन मुहूर्त’ या संज्ञेला खूप महत्त्व आहे. वर्षप्रतिपदा, विजयादशमी, कार्तिक महिन्यातील दिवाळी पाडवा या तीन सणांबरोबर अक्षयतृतीयाचा अर्धा सण हे मोठय़ा उत्साहाने साजरे केले जातात. विजयादशमीच्या अगोदर दोन दिवसांपासून बाजारात लहान-मोठय़ा आकारांची झेंडूची फुले विकली जातात. कारण गरिबातला गरीब माणूसही आपल्या दारी लक्ष्मीचे आगमन व्हावे म्हणून मोठय़ा श्रद्धेने झेंडूच्या माळा लावत असतो.

झण्डू (संस्कृती), गेंदा (हिंदी), गलगोटो (गुजराती), गुल हजारा (फारसी) या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मोहक फुलांची खूप मोठय़ा प्रमाणावर बागायती लागवड केली जाते. गडद तांबट ते फिक्कट पिवळा अशा विविध सुंदर रंगांच्या झेंडूंची लागवड वर्षां ऋतूच्या प्रारंभी सर्वत्र होते. झाडाच्या काडय़ा कोनयुक्त व खरखरीत स्पर्शाच्या असतात. पाने एकांतरोन व मोठय़ा आकाराची टोकदार असतात.

झेंडूच्या फुलांची चव किंचित कडू व तुरट रसाची असते. झेंडूत एक कडू चवीचे सत्त्व आहे. झेंडू फुलांचा रस रक्तसंग्राहक व जखमेची सूज कमी करणारा आहे. शरीराला कुठेही किरकोळ जखम झाल्यास झेंडूच्या फुलांचा वाटून लेप लावावा. खेडोपाडी भूतग्रह बाधा दूर करण्याकरिता झेंडूच्या पंचांगाचा रस देण्याची प्रथा एके काळी होती.

बकुळ

‘मधुरच कषायं च स्निग्धंसंग्रहि बाकुलम्। स्थिरीकरं चदन्तानां विशदंतत्फलं गुरू।

बकुलस्तुवरोऽनुष्ण: कटुपाकरसो गुरू:। कफपित्तविषविश्वत्रकृमिदन्तगदापह:॥’

भा. प.

मुंबईतील दादर येथील मोठय़ा पुलावर तसेच पुणे-मुंबईच्या एक्स्प्रेस हायवेवर, दहा-बारा वर्षांच्या लहान लहान मुली जेव्हा बकुळीच्या फुलांचे मोहक गुच्छ घेऊन येतात त्या वेळेस त्यांना नकार देणे माझ्या जिवावर येते. बकुल (संस्कृत), मौलसरी (हिंदी), बोलसरी (गुजराती), बकुळ व ओवळी (मराठी), ओवळी (कोंकणी), बकुळम (ता. क.) अशा विविध नावांनी ओळखणारा वृक्ष वर्षभर पानाफुलांनी बहरलेला विविध बागांतून बघावयास मिळतो. याची झाडे दक्षिण भारतात मोठय़ा प्रमाणावर आहेत. गुजरातमध्ये बकुळची मौलसरी नावाची, वेगळय़ाच सुगंधाची झाडे मोठय़ा प्रमाणावर बघावयास मिळतात. जावा, सुमात्रा या बेटांत बकुळीचे मोठय़ा संख्येने वृक्ष आहेत. विविध अत्तरे किंवा सेंटच्या वापरात बकुळफुलांचा अवश्य समावेश असतो.

दात काही कारणाने हलत असल्यास किंवा तोंडातून लाळ वारंवार गळत असल्यास बकुळीच्या सालीच्या काढय़ाच्या गुळण्या कराव्यात. जुनाट रक्तयुक्त आवेमध्ये बकुळीची फळे काही प्रमाणात गुण देतात. बकुळीच्या फुलांचा बाष्परूपाने काढलेला अर्क थंडीतापात दिल्यास आराम मिळतो.