05 April 2020

News Flash

आबालवृद्ध : गोवर

जंतू शरीरात गेल्यावर गोवराची लक्षणे अंदाजे ९ ते १२ दिवसांनी दिसतात.

डॉ. अविनाश गावंडे

गोवर हा श्वसनसंस्थेशी निगडित विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. यात ताप, खोकला, डोळे लाल होणे, अंगावर चट्टे उठणे ही लक्षणे दिसतात.

एका रुग्णापासून दुसऱ्या निरोगी बालकास श्वसनमार्गावाटे किंवा डोळ्यातील पांढऱ्या भागावाटे जंतू शरीरात प्रवेश करून गोवर होऊ शकतो. आजाराची लागण झाल्यावर चार दिवसांपर्यंत हा आजार इतरांमध्ये पसरू शकतो. गोवरबाधित बालकाच्या संपर्कात आलेल्या निरोगी व लसीकरण न झालेल्या साधारणपणे ९० टक्के मुलांना या आजाराचा धोका असतो. हे जंतू खोकला किंवा श्वसनसंस्थेतून बाहेर पडल्यावर हवेत जवळपास एक तास जिवंत राहू शकतात. त्यामुळे थेट संपर्क नसल्यावरही आजाराची शक्यता असते. जंतू शरीरात गेल्यावर गोवराची लक्षणे अंदाजे ९ ते १२ दिवसांनी दिसतात.

आपल्याकडे हिवाळ्यात किंवा वसंत ऋतूच्या काळात (साधारणत: जानेवारी ते एप्रिल) गोवराचे रुग्ण आढळतात.

बालकाची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यास, आईपासून बाळाला पुरेशी प्रतिकारशक्ती न मिळू शकल्यास किंवा कुपोषण व ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता असल्यास गोवराच्या संसर्गाचा धोका अधिक असतो.

संभाव्य गुंतागुंती कोणत्या-

 • तीव्र अतिसार
 • न्यूमोनिया
 • कानाच्या आतमध्ये संसर्ग
 • मेंदूत सूज येणे
 • डोळ्याच्या बुबुळाला अल्सरही होऊ शकतो.

उपचार व प्रतिबंधात्मक उपाय-

 • कमी प्रमाणात गोवर असलेल्या रुग्णाने जास्त वेळ आराम करणे, व्यवस्थित पाणी पिणे, वेळेवर औषधोपचार घेण्याने बरे वाटते.
 • डोळ्याचा त्रास कमी करण्यासाठी त्या वेळी प्रकाशात जाणे टाळावे.
 • आजार होऊ नये म्हणून आरोग्यदायी आहारासोबतच जीवनसत्त्व ‘अ’चे डॉक्टरांच्या सल्ल्याने सेवन करावे.
 • आजार टाळण्यासाठी गोवरची लस बाळाला वयाच्या नवव्या महिन्यात पहिला डोस व एक वर्षांनंतर दुसरा डोस द्यावा. तीन आजारांसाठी असलेली ‘एमएमआर’ (मीझल्स, मम्स, रुबेला) नावाची लस वयाच्या पंधराव्या महिन्यात व पाचव्या वर्षी अशा दोन मात्रांमध्ये देणेही फायद्याचे असते.

लक्षणे

 • ताप, सर्दी, शिंका, खोकला
 • डोळे लाल होणे व त्यातून पाणी येणे.
 • प्रकाशात डोळे उघडण्यास त्रास होणे.
 • कधी-कधी उलटय़ा व अतिसार होऊ शकतो.
 • तिसऱ्या व चौथ्या दिवशी तोंडात दातांच्या मागच्या बाजूला निळसर पांढऱ्या रंगाचे चट्टे
 • पाचव्या व सहाव्या दिवशी फिकट लाल रंगाचे चट्टे किंवा उंचवटे असलेले चट्टे हे सुरुवातीला कानाच्या मागे व त्यानंतर चेहरा, मान, शरीरावर २ ते ३ दिवसांत पसरतात.
 • आजारामुळे बाळाचे वजन थोडे घटते, थकवा येतो.
 • पचनशक्ती कमी होणे, काही दिवसांपर्यंत अशक्तपणा

(शब्दांकन: महेश बोकडे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2016 3:47 am

Web Title: measles disease
Next Stories
1 मोजमाप आरोग्याचे : उच्च रक्तदाब
2 प्रौढांचे लसीकरण
3 प्रकृ‘ती’ : स्तनांचे आजार
Just Now!
X