News Flash

मना पाहता! : डॉ. गूगल उवाच!

चाळिशीनंतरचं हृदयविकाराचं भारतातलं वाढलेलं प्रमाण लगेच गूगलच्या संदर्भासहित दाखवण्यात आलं.

प्रतिनिधिक छायाचित्र

‘‘तुम्ही म्हणताय खरं की हे औषध मी घ्यावं.. पण त्या औषधाचे कितीतरी दुष्परिणाम आहेत. मी गूगलवर अमुक अमुक वेबसाइटवर जाऊन हे पाहिले आहे. हा बघा संदर्भ..’’ नितीनने लगेच आपल्या मोबाइलवर तातडीने मला गूगलवरचा संदर्भ दाखवला. त्यात त्याला सुचवलेल्या गेलेल्या औषधाच्या अनिष्ट परिणामांची यादी होती. ‘‘मला मुळात मानसिक आजार नाहीच आहे. माझ्या छातीत दुखतंय हल्ली, सगळय़ा तपासण्या नॉर्मल आहेत म्हणून काय झालं? हृदयविकार असलेल्या १२ टक्के लोकांमध्ये ई. सी. जी. तले बदल डॉक्टरांच्या नजरेतून निसटतात. मी माझ्या कार्डिऑलॉजिस्ट डॉक्टरांना हे सांगितलं. थांबा तुम्हाला तो संदर्भ दाखवतो.’’ नितीनने लगेच गूगलवरचा तोही संदर्भ समोर धरला. ‘‘एवढंच नाही. भारतातलं सध्याचं हृदयविकाराच्या झटक्यांचं प्रमाण वाढलं आहे. ही बघा आकडेवारी.’’ चाळिशीनंतरचं हृदयविकाराचं भारतातलं वाढलेलं प्रमाण लगेच गूगलच्या संदर्भासहित दाखवण्यात आलं.

‘‘माझी गेल्या महिन्यात चाळिशी उलटली. हे असं इथे डावीकडे दुखतं. अहो पण कार्डिऑलॉजिस्ट डॉक्टर ऐकूनच घ्यायला तयार नाहीत. त्यांचं म्हणणं एकच- तुम्हाला हृदयविकार नही. खरं म्हणजे सगळी लक्षणं गूगलनुसार जुळत आहेत. छातीत दुखण्याची जागा, वेळ, दुखण्याचा प्रकार सगळं तंतोतंत जुळत आहे. दुसरं असं की माझ्या कुटुंबात हृदयविकार आहे. माझे वडील, काका या दोघांनाही त्याच कार्डिऑलॉजिस्टचे उपचार चालू आहेत. त्यांना मी हृदयविकाराच्या आनुवंशिकतेबद्दलचे गूगलवरचे १० पुरावे दाखवले. ते शेवटी माझ्यावर चिडले. म्हणाले, ‘मी डॉक्टर आहे की तुम्ही?’ हे बघा मी एक संशोधन वृत्ती असलेला सॉफ्टवेअर इंजिनीअर आहे. इंटरनेटवर जगातलं सगळं ज्ञान आज उपलब्ध आहे. त्याचेच संदर्भ मी देतोय. माझ्या मनाने काहीतरी सांगत नाही. मला वाटतं डॉक्टरांनी हे समजून घ्यायला हवं. मी इंटरनेटवरची वैद्यकीय जर्नल्स नेहमी वाचतो. माझ्या अभ्यासू वृत्तीमुळे मला हे सहजपणे जमतं. पण डॉक्टर कुठल्याच चर्चेला तयार नाहीत. त्यांच्याकडे मी किमान आठ वेळा जाऊन आलो. त्यांना आतापर्यंत इंटरनेटवरचे अनेक संदर्भ दाखवले. पण ते चक्क त्याच्याकडे काणाडोळा करतात. मला खरोखरच हृदयविकाराचा झटका आला म्हणजे? मला त्यांनी सरळ मानसोपचारतज्ज्ञांकडे जायला सांगितलं. मला हे पटलेलं नाही. त्यांनी सांगितलं म्हणून केवळ तुमच्याकडे आलो. आता तुम्हीही म्हणता की माझा आजार मानसिक आहे. मी काय ढोंग करतोय का?’’

नितीनला खरोखरच ‘हायपोकॉड्रिअ‍ॅसिस’ (hypochondriasis) नावाचा मानसिक आजार आहे. या आजारात व्यक्तीला वाटतं की आपल्याला एखादा गंभीर शारीरिक आजार आहे. (हृदयविकार, कर्करोग, एड्स वगैरे) त्या आजाराची सर्व शारीरिक लक्षणं आपल्याला होत आहेत, असं वाटून ही व्यक्ती त्या दृष्टीने शारीरिक तपासण्या व्हाव्यात हा आग्रह धरते. शारीरिक तपासण्यांमध्ये काहीही गैर आढळलं नाही तरी त्या व्यक्तीचं समाधान होत नाही. औषधोपचार आणि मानसोपचार यांचा या आजारासाठी उपयोग होतो. नितीनच्या बाबतीच मात्र त्याची बुद्धिमत्ता आणि तथाकथित संशोधक वृत्ती (आणि त्यातून नकळत येणार अहंकार) हे उपचारातले अडथळे ठरत आहेत.

‘जगातलं संगळं ज्ञान इंटरनेटवर उपलब्ध आहे’ या त्याच्या वाक्यात एक बदल सुचवावाचा वाटतो- जगातील बरीचशी ‘माहिती’ आज इंटरनेटवर उपलब्ध. माहितीला जेव्हा अनुभूतीची जोड मिळते, तेव्हा त्याला शहाणपण म्हणतात. वैद्यकशास्त्रात निदान आणि उपचार या शहाणपणाने करायच्या गोष्टी आहेत. नुसती पुस्तकी किंवा इंटरनेटवरची माहिती वाचून रोगनिदान किंवा उपचार करता येत नाहीत. अनेक वष्रे अनेक रुग्णांना तपासल्यानंतर माहिती-ज्ञान-शहाणपण हा प्रवास साध्य होतो. वैद्यकीय व्यवसायाला इंग्रजीत ‘प्रॅक्टिस’ म्हणता ते काय उगाच? खरं म्हणजे ही एक अखंड चालणारी साधना आहे. (नुसंत वाचन करून स्वत:ला शहाणे म्हणवणारे, समर्थ रामदासांच्या मते ‘पढतमूर्ख’ असतात.)

इंटरनेटवरची माहिती अमुक एका व्यक्तीच्या बाबतीत कशी लागू होईल हे सांगण्यासाठी तज्ज्ञाचीच गरज असते. ती आंधळेपणाने जशीच्या तशी आपल्या बाबतीत वापरणं हे घातक आहे. सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा वेगळय़ा असतात एवढंच.. आणि त्यांचं निर्मूलन करणंही मुळीच सोपं नाही.

drmanoj2610@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 12:27 am

Web Title: medical google doctor
Next Stories
1 पिंपळपान : धोत्रा
2 पोटाचा घेर कमी करायचाय?
3 थॅलेसेमिया : जनुकीय आजार
Just Now!
X