24 January 2019

News Flash

पिंपळपान : चित्रक

चित्रकोऽग्नि: समसाक्षात। असे सार्थ वर्णन चित्रक मुळाच्या गुणधर्माचे केलेले आहे.

चित्रक

चित्रकोऽग्निसम पाके कटुक: कफशोफजित्। वातोदशशरेग्रहणीकृमिपाण्डु विनाशन:।।

चित्रकोऽग्नि: समसाक्षात। असे सार्थ वर्णन चित्रक मुळाच्या गुणधर्माचे केलेले आहे. मात्र ही चित्रक मुळे अस्सल चित्रकाचीच आहेत ही काळजी घेण्याची खूप गरज असते. कारण बाजारात खऱ्या चित्रक मुळाऐवजी बनावट कसलीही मुळे देण्याचा प्रघात वाढला आहे. चित्रकाचे मुळाचे वर समांतर रेषा काडय़ांना असतात याची खात्री करूनच ते वापरावे. चित्रकाच्या नेहमीचा चित्रक, लाल चित्रक आणि काळा चित्रक अशा प्लम्बेगो वर्गातील तीन भिन्न जाती आहेत. त्यातील प्लम्बेगो झायलेनिका या जातीची मुळे औषधासाठी वापरली जातात. हे बहुवर्षांयु सदोदित पल्लवयुक्त लहानसर क्षुप आहे. याचा दांडा गोल असून त्यास पुष्कळ फांद्या फुटतात. फांद्या पसरलेल्या असून जमिनीवर पडतात, तेव्हा पेरोपेरास मुळे फुटतात. शोभेच्या चित्रकाची फुले निळसर असतात. औषधी चित्रकाची फुले पांढऱ्या रंगाची आणि पाने मोगऱ्याच्या पानासारखी हिरवीगार असतात. साल काळसर लालूस आणि उभी चिरलेली असून त्यावर थोडय़ा लहान गाठी असतात. चित्रक मुळाची रुची तिखट, कडू आणि जिभेस भोसकल्याप्रमाणे दु:खदायक असते. मुळाच्या सालीतच औषधी गुण असतात. ती नेहमी ताजीच वापरावी. कारण जुनी साल औषधी गुण गमावलेली असते. चित्रकाच्या मुळाच्या सालीत एक दाहजनक द्रव्य आहे. ते दारूत किंवा उकळत्या पाण्यात सहज मिसळते. थंड पाण्यात अजिबात मिसळत नाही. लहान मात्रेत चित्रकाने पचननलिकेच्या श्लेष्मल त्वचेस उत्तेजन येते आणि आमाशय आणि उत्तरगुद यांचे रक्ताभिसरण वाढून त्यांना शक्ती येते. याने पोटात गरमी उत्पन्न होते अणि पचनक्रिया वाढते. गुदांतील अर्श उत्पन्न होणाऱ्या वलीवर चित्रकाची प्रत्यक्ष क्रिया होते आणि त्याने वलीची शिथिलता नाहीशी होऊन थोडासा ग्राहीपणादेखील उत्पन्न होतो. याने यकृतास उत्तेजन मिळून पित्त नीट वाहू लागते, म्हणून चित्रक दिल्यानंतर मळ नेहमीच पिवळा होतो. रक्तात मिसळून नंतर मलोत्सर्जक ग्रंथीवर याची उत्तेजक क्रिया होते. मोठय़ा मात्रेत चित्रक दाहजनक आणि कैफजनक विष आहे. त्यामुळे घशात आणि आमाशयात आग सुटते, उमासे येतात, उलटय़ा-जुलाब होतात. नाडी अशक्त होऊन अंग गार पडते. गर्भाशयावरील चित्रकाची क्रिया लक्षात ठेवण्यासारखी आहे. साधारण चित्रकाच्या मोठय़ा मात्रेने कटीतील सर्व इंद्रियांचा दाह उत्पन्न होतो, जुलाब होतात आणि गर्भाशयातून रक्त वाहू लागते. चित्रकाने गर्भाशयाचे इतके जोरदार संकोचन होते की प्रहर- दोन प्रहरात गर्भ पडतो. मात्र हा गर्भ मृत असतो. चित्रकाच्या लेपाने फोड उठतो याकरिता काळजी घ्यावी.

हरी परशुराम औषधालयाच्या आरोग्यवर्धिनी, आभादि गुग्गुळ, चंद्रप्रभा, पुनर्नवा मंडुर, लेप गोळी, अश्वगंघापाक, पंचकोलासवर, दशमूलारिष्ट, संधिवातारी गुग्गुळ आणि लक्ष्मीविलास रस या औषधात चित्रकाचा वापर आहे.

– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

First Published on April 17, 2018 4:16 am

Web Title: medicinal uses and benefits of chitrak plant