22 February 2019

News Flash

मन:शांती : स्किझोफ्रेनियावरची औषधे

स्किझोफ्रेनियाच्या विकारात डोपामिनचे प्रमाण वाढते तर सिराटोनिनचे कमी होते.

स्किझोफ्रेनिया

स्किझोफ्रेनियाच्या आजाराला ‘वेड लागणे’ ही सामान्य माणसाची संज्ञा होती. किंबहुना आजपण थोडीफार आहेच. असेच रुग्ण जास्त करून उपचारासाठी आणले जात असल्याने सर्व मनोविकारतज्ज्ञांना ‘वेडय़ांचे डॉक्टर’ हे नामाभिधान काही काळ पूर्वीपर्यंत तर नक्कीच होते. या आजारावर ‘वेड लागणे’ किंवा ‘सैतानाची बाधा’ असाच समज असल्याने क्रूर उपचार केले जायचे किंवा समाजाबाहेर काढले जायचे, मनोरुग्णालयात ठेवले जायचे.

मनोरुग्णालयातसुद्धा त्यांना बांधून ठेवणे वगैरे शिवाय उपायच नसायचा, अगदी विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत फक्त झोप येणारी औषधे अ‍ॅण्टीहिस्टामिनिक्स (साधारण आज अ‍ॅलर्जीवरच्या, सर्दीवरच्या उपराचारात वापरली जाणारी), बार्बीच्यूटेस्ट्स (जी सर्वसाधारण भूलदेण्यासाठीच आज वापरतात) क्लोरल हायड्रेट अशी झोप येणारी औषधे वापरून फक्त झोपवून ठेवणे याशिवाय पर्याय नसायचा. परंतु त्यामुळे लक्षणांमध्ये काहीच फरक दिसायचा नाही.

अशाच एका अ‍ॅण्टीहिस्टामिनिक औषधाची दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जास्त गरज भासू लागली. त्यावर संशोधन चालू असताना ‘कारपेंटर’ या शास्त्रज्ञाकडून ‘क्लोरप्रोमॅझिन’ या औषधाचा शोध लागला. खरं पाहता ते अतिशय क्षीण अ‍ॅण्टीहिस्टामिनिक पण जास्त झोप येण्याची क्षमता असलेले औषध होते, ज्याचा वापर त्यामुळे भूल देण्याआधी द्यायचे औषध म्हणून करण्यात येऊ  लागला. नंतर १९५२ मध्ये फ्रेंच मनोविकारतज्ज्ञ जीन डिले आणि पिअर डेनिकर यांनी सर्वप्रथम त्याचा उपयोग स्किझोफ्रेनिया, तसेच उन्माद (मॅनिया) अवस्थेतील रुग्णांसाठी केला. यामुळे फक्त झोप येत नाही तर स्किझोफ्रेनियाची लक्षणे पण खूप कमी होत आहेत, असं लक्षात आल्यावर त्याचा उपयोग या आजाराच्या उपचारांसाठी केला जाऊ  लागला. अनेक वेगवेगळ्या वर्गातील औषधे फ्लुफेनाझिन, परफेनाझिन वगैरे नंतर आली. पण नंतर १९५८ मध्ये बर्टहर्मनने निर्माण केलेल्या हॅलोपेरिडॉल या औषधामुळे मनोरुग्णालयात खितपत पडणारे रुग्ण समाजात परत येऊ  लागले, नव्याने विकार होणाऱ्यांचे उपचार घरात राहून होऊ  लागले. हा किती मोठा क्रांतिकारी बदल या औषधांनी घडवून आणला. त्यानंतर ट्रायफ्लुपॅराझिन, थायोरिडाझोन, पिमोझाईड यांसारखी औषधे आली. ही सर्वसाधारण एका प्रकारचे कार्य किंवा कार्यस्थळ असणारी औषधे होती. स्किझोफ्रेनियाच्या विकारात डोपामिनचे प्रमाण वाढते तर सिराटोनिनचे कमी होते. तर ही औषधे डोपामिनवर काम करणारी औषधे होती. त्यामुळे स्किझोफ्रेनियाच्या सर्वच लक्षणांवर परिणाम होत नव्हता. विशेषत: नकारात्मक लक्षणांवर. नंतर जी औषधे निर्माण केली ती या दोनही जीवरासायनिक संप्रेरकांवर काम करणारी होती. स्क्रिझोफेनियामध्ये भास होणे, संशय येणे, भीती, स्वच्छता नीट न राखणे, झोप न येणे, हिंसक होणे, बडबड करणे ही जी पटकन दिसून येणारी लक्षणे असतात त्यांना सकारात्मक लक्षणे म्हणतात कारण त्यामुळे व्यक्तीला लवकर उपचारासाठी आणले जाते. तर कोणाशीच न बोलणे, कोणात न मिसळणे, घरातच बसून राहणे, कोणतीच भावना प्रदर्शित न करता येणे वगैरे लक्षणे असली तरी ती पटकन लक्षात येत नाहीत. किंवा जास्त त्रासदायक नसतात त्यामुळे उपचार लवकर सुरू होत नाहीत म्हणून नकारात्मक! नवीन औषधे रिसपेरिडोन, ओलॅझोपिन, क्युटीयापिन, अमिसाल्पिराईड क्लोझापिन, ही जास्त परिणामकारक, व दोनही लक्षण प्रकारांवर काम करणारी आहेत.

दुष्परिणाम

जिथे चांगला परिणाम असतो तिथेच काही दुष्परिणामही (साइडइफेक्ट) असतात. हाताला कंप येणे, अस्वस्थ होणे, मान अचानक वाकडी होणे, ओठ वगैरेंच्या विचित्र हालचाली होणे, झोप जास्त येणे असे साइड इफेक्ट असले तरी ते मात्रा कमी करून किंवा साइडइफेक्ट घालवणारे औषध देऊन पूर्णत: बरे होणारे आहेत. सुरुवातीच्या काळात काही होतात तर काही बराच काळ घेतल्यानंतर होतात. पण सर्वाना उपाय आहे. नवीन औषधांमुळे वजन वाढणे, भूक जास्त लागणे, काही वेळा पांढऱ्या पेशी कमी होणे, फिट येणे असेही दुष्परिणाम असतात. पण मागे म्हटल्याप्रमाणे ते कमी करता येतात.

परिणामकारकता वाढते..

हल्ली सर्व औषधांबद्दलची ‘माहिती’ गुगलवर उपलब्ध असते. ती वाचून अनेकदा रुग्ण वा नातेवाईकांच्या मनात शंका, संशय निर्माण होतात. त्यांचे निरसन करून घ्यावे. पण केवळ ‘माहिती’वर विश्वास ठेवून त्या विषयातील ‘ज्ञान’ मिळवलेल्या डॉक्टरच्या सल्ल्यावर अविश्वास दाखवून उपचार बंद करणे चुकीचे असते. स्किझोफ्रेनियाच्या आजारात रुग्णाला आजार बऱ्याचदा मान्य नसतो, तेवढे वास्तवाचे भान नसते. त्यामुळे मध्येच उपचार ते बंद करतात किंवा नकार देतात. सतत औषधे घ्यायचा कंटाळा येतो. म्हणूनच वरील औषधांची (काही) डेपो प्रिपरेशन्सही उपलब्ध आहेत. महिन्यातून एकदा वा दोनदा इंजेक्शन घेतले की फारतर एखादे औषध घ्यावे लागते एवढेच! त्यामुळे परिणामकारकता वाढते व गुण छान येतो!

डॉ. अद्वैत पाध्ये Adwaitpadhye1972@gmail.com

First Published on February 13, 2018 1:50 am

Web Title: medicine for schizophrenia