जेव्हा रक्तस्राव अधिक होतो तेव्हा जंतुसंसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हल्ली आधुनिक वैज्ञानिक प्रगतीमुळे मासिक पाळीच्या वेळेस नानाविध प्रकारे काळजी घेतली जाते. परंतु त्यामुळे हा रक्तस्राव खूप काळ शरीरालगत राहतो. मग रोगजंतुसंसर्ग वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने दिसू लागतो.

काही वेळेस फक्त योनीमार्गाच्या आजूबाजूस त्वचा लालसर होऊन त्यावर बारीक पुरळ येतात. कंड सुटल्यामुळे घर्षण झाल्यास हाच जंतुप्रादुर्भाव संलग्नित भागात पसरत जातो. अनेकदा संप्रेरक द्रव्याच्या परिणामामुळे श्वेतपदरात बदल होत असतात. मासिक पाळी येऊन गेल्यानंतर होणारा स्राव हा पाण्यासारखा पारदर्शक प्रवाहित असला तरी त्यास दुर्गंधी येत नाही. या स्त्रावाने खंर तर त्वचा योग्य राखली जाते, परंतु याच श्वेतपदराच्या पारदर्शकतेत जर बदल झाला वा त्यास दरुगधी येऊ लागली तर मात्र याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मासिकपाळीप्रमाणे वा गर्भधारणा राहिल्यानंतर प्रवाहित पारदर्शक असलेला स्राव कमी झाल्यानंतर रोगजंतुसंसर्ग होण्यास सुरवात होते. प्रथम श्वेतपदराचा त्रास होतो, ओटीपोटात दुखून येते, अशक्तपणा येतो, योनीमार्गाचा दाह होतो, कंड सुटून अस्वस्थता येते.

असा रोगजंतुसंसर्ग विशेषत: जीवाणूमुळे होतो वा एक प्रकारच्या बुरशी संसर्गामुळे वा व्हायरसमुळे होतो. नेहमीच मूत्रमार्गात ई-कोलाय जीवाणू असतात. परंतु त्यांचे प्रमाण वाढल्यास त्रास होऊ शकतो. एखादवेळेस योनीमार्गातील योनीपटलाच्या बाजूस गाठ येऊन त्यात पू साठतो. मग असंख्य वेदना होतात, ताप येतो अशा वेळेस अशा गाठीतून (बार्थोलीन सिस्ट) पू काढावाच लागतो व त्याची योग्य ती काळजी न घेतल्यास वारंवार ही समस्या उद्भवू शकते. काहीवेळेस हर्पिससारखा प्रादुर्भाव झाल्यास खूप कंड सुटून छोटे पुरळ उठतात व त्यातून पाणी वाहू लागते यावरही योग्य तो औषधोपचार करणे जरूरीचे ठरते.

गर्भारपणाच्या वेळेस, बाळंतपणाच्या वेळी अथवा मधुमेही महिलांस योनीमार्गाचा जंतुसंसर्ग लवकर होतो. अशावेळेस दह्य़ासारखा पदार्थ योनीमार्गात साठून राहिल्याने खूप कंड येतोच, शिवाय हातपायही दुखू लागतात. असाच जंतुसंसर्ग बाट्रायकोमोनाल जीवांणूमुळे होतो. या वेळेस श्वेतपदराचा रंग पिवळसर हिरवट होतो, योनीमार्ग दूखू लागतो, खूप कंड सुटल्याने परिस्थिती असह्य़ होते. अशा वेळेस श्वेतपदराच्या पद्धतीवरून परीक्षणावरून काही प्रसंगी श्वेतपदराची तपासणी करून निदान केले जाते.

हल्ली जशा गोळ्या आपण पोटात घेऊ शकतो, त्याच प्रमाणात आपण योनीमार्गातही ठेवू शकतो. यामुळे शरीरातील दाहामुळे होणारा रोगजंतुसंसर्ग आटोक्यात येऊ शकतो. श्वेतपदराचा त्रास हा मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी, सुरू झाल्यानंतर वा बंद झाल्यानंतरही होऊ शकतो. साधारण वयाच्या २० ते ४० वर्षांपर्यंत कमी-अधिक प्रमाणात होणारा श्वेतप्रदराचा त्रास आपण योग्य इलाज केल्यास आटोक्यात येऊ शकतो. परंतु काही स्त्रियांना हा त्रास मधुमेह असल्याने होत असेल तर मधुमेह आटोक्यात आणल्याशिवाय हा बंद होत नाही. रजोनिवृत्तीनंतर होणारा श्वेतपदर व त्यातून होणारा किंचितसा रक्तस्त्राव ही बाब गंभीर असू शकते.

काही स्त्रियांना हा त्रास संभोगामुळे होणाऱ्या रोगजंतूच्या प्रादुर्भावाने होतो (सेक्शुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन) याकडे लक्ष देणे महत्त्वाचे. आपण काहीवेळेस सर्दी-खोकला वा शस्त्रक्रिया केल्यानंतर औषधे घेत असतो. यामुळे योनीमार्गातील संरक्षित आवरणास इजा पोचते व बुरशीसम जंतू वाढीस लागतात. श्वेतपदराचा विचार गंभीरपणे करण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे जर रोगजंतूच्या प्रादुर्भावाने योनीपटलास सूज येऊन वा हर्पिससारख्या व्याधी अधिक काळ बळावत असतील वा अतिशय कंड सुटत असेल तर ती योनीमार्गाच्या कर्करोगाची चाहूल असू शकते. यासाठी काही चाचण्या आवश्यक ठरतात. वारंवार होणारा मूत्रदाह, ओटीपोटात दुखणे याकडे दुर्लक्ष करून चालत नाही.

हल्ली नवनवीन प्रकारची खूप चांगली औषधे योनीमार्गाची स्वच्छता राखण्यास आली आहेत. ती स्नानाच्या वेळेस वापरल्यास योनीमार्ग रोगजंतूविरहित आपण राखू शकतो, पण त्याचा अतिवापर टाळावा. घराबाहेरील प्रसाधनगृहाचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक ठरते.

आपल्याला होणारा त्रास हा स्त्रीरोगतज्ज्ञांस नि:संकोचपणे सांगणे व जसा सुरू झाला आहे, त्या नियमावलीनुसार सांगणे रोगनिदानाच्या दृष्टीने सुखकारक ठरते. स्त्रीरोगतज्ज्ञांकडून योनीमार्गाची तपासणी करून, चाचण्या करून वेळीच उपाय केल्यास योग्य त्या मार्गदर्शनामुळे आपले आरोग्य आपण आपल्या हाती ठेवू शकतो.

-डॉ. रश्मी फडणवीस

reshmifadnawis46@gmail.com