मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी सकारात्मक विचार करा, मन शांत ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा, ताणाचं व्यवस्थापन करा इत्यादी आज्ञार्थी किंवा सुभाषितवजा सल्ले आपण ऐकतो किंवा इतरांनाही देतो. अशा सल्ल्यांचं आपल्या दैनंदिन आयुष्यातलं स्थान काय? हे सल्ले आचरणात आणताना काय अडचणी येतात? मानसिक आरोग्य सांभाळायचं म्हणजे नेमकं काय करायचं? याची साध्या, सोप्या शब्दात उकल करणारे हे सदर.

माझी एक मैत्रीण आहे. तिला मी तिच्या नावानेच हाक मारतो. पण तिचं एकंदरीत व्यक्तिमत्त्व ताई या पारंपरिक संकल्पनेत बसेल असं आहे. इतरांना सल्ले (अर्थात अनाहूत आणि फुकट) देणं हा तिचा आवडता उद्योग. तेव्हा आपण सोयीसाठी तिला ताई म्हणू. व्हॉट्सअ‍ॅपसारखं प्रवाही (आणि प्रभावीसुद्धा) माध्यम तिच्या सेवेसी सादर आहे. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर टनावारी सुभाषितांचा पाऊस कोसळतोय. आयुष्य सुंदर आहे, ते असं जगा, ते तसं जगू नका अशा गोष्टी आपल्याला ठणकावून सांगितल्या जाताहेत. ताई व्हॉट्सअ‍ॅपवरून अतिशय सुंदर सुंदर सुभाषित इकडून तिकडे ढकलत असते. या फॉरवर्ड्सबद्दल तिला रोज प्रचंड प्रमाणावर प्रशंसा मिळते. परवा तिचा फोन आला.

‘माझं एका मैत्रिणीशी भांडण झालं. रागाच्या भरात मी तिला नको नको ते बोलले. आता मला खूप अपराध्यासारखं वाटतंय. मला आश्चर्य वाटतं. एवढा राग मला येऊच कसा शकतो?’

तिचा आवाज कातर झाला होता. ही गोष्ट तिच्या मनाला खरोखरच लागलेली असावी हे जाणवत होतं. प्रेमाची फुलं आच्छादली की रागाचे निखारे शांत होतात. आयुष्य सुंदर आहे वगैरे वगैरे संदेश काही दिवसांपूर्वीच तिने कोणाला तरी व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला होता. मैत्रिणीशी भांडण होण्याआधी हा संदेश तिला आठवला नाही किंवा आठवला असला तरी तो त्या वेळच्या प्रसंगाला कसा लागू होईल हे तिला उमगलं नाही. ती नक्की स्वतशी म्हणत असणार, मला कळतंय पण वळत नाही.

एक गोष्ट आपण इथे लक्षात घेऊ या. असे सुविचार हे खिशातल्या दोन हजारांच्या नोटेसारखे असतात. भाजी घ्यायला गेले तर त्या नोटेचा उपयोग नाही, तिथे पन्नासची नोटच हवी!

राग ही अत्यंत नैसर्गिक भावना आहे. आपण आपल्या भावनांचं नेमकं  काय करतो? अनेकदा आपण त्या दडपतो. ज्या वेळी आपण भावना दडपतो तेव्हा त्या वेळी शरीरात निर्माण झालेल्या रसायनांचं काम पूर्ण व्हायच्या आतच आपण वेगळ्या अवस्थेत जातो आणि ती रसायनं तशीच राहतात. सतत होणाऱ्या रसायनांचे शरीरावर घातक परिणाम होतात.

उदा. हृदयाचा वेग, रक्तदाब, रक्तातली साखर, स्नायूंमधला ताण वाढणं. यातूनच शारीरिक विकार उद्भवतात. तात्पर्य.. भावना दडपणं सर्वथैव धोक्याचं. याउलट आपण काय करतो? आपल्या भावना जशा येताहेत तशा दुसऱ्यावर ओतून मोकळं होतो. ज्याला आपण ‘भावना व्यक्त करणं’ असं गोंडस नाव दिलंय ते! याचं लक्ष्य कुणीही असू शक तं. ज्या व्यक्तीमुळे आपल्या मनात ती भावना चाळवली गेली ती व्यक्ती.. किंवा ते जर शक्य नसेल तर आपल्यापेक्षा लहान किंवा कमकुवत व्यक्ती.. उदा. मुलं. आपण बेधडक त्यांचा अपमान करणं, त्यांना धमक्या देणं सुरू करतो. हे जर खपून जात असेल तर आपण ते वरवरचेवरही करू लागतो. यामधून ती व्यक्ती आणि आपण यामध्ये एक वेगळंच दुष्टचक्र सुरू होतं. ते आपल्याला आणि त्या व्यक्तीला घातक असतं. दुसऱ्यावर भावनांचं ओझं ढकलल्यामुळे आपला भार कमी होत नाही हे वेगळंच. त्यातून आपली अपराधीपणाची भावना वाढीला लागते आणि अपराधी वाटल्याबद्दल स्वत:चा आणि इतरांचा रागही! राग दडपणं आणि राग कसाही व्यक्त करणं या दोन्हींमध्ये एक समान गोष्ट आहे. या दोन्हीमध्ये आपण आपला राग नाकारलेला आहे. (छे छे .. मला कुठे राग आलाय? मी शांतच आहे किंवा ती व्यक्ती चुकीचं वागत होती मग मी तरी काय करणार?)

आपण जेव्हा म्हणतो की अमुक एक गोष्ट मला कळली तेव्हा ती आपल्याला त्या अर्थी कळलेलीच नसते. जेव्हा आपण ती वळवतो तेव्हाच ती आपल्याला खऱ्या अर्थी कळते. वळवणारे आपण असतो हे महत्त्वाचं. आपण इतके रागावू शकतो याचं ताईला आश्चर्य वाटलं. कारण सर्वाना गोड गोड सल्ले देणारी ताई या प्रतिमेत राग कसा बसेल? पण शेवटी ताई ही प्रतिमा नसून एक खरीखुरी व्यक्ती आहे. म्हणून तिने आपल्या पर्समध्ये एक पन्नासाची नोट कायम ठेवायला हवी आहे. मला राग येऊ शकतो. तो जेव्हा येतो तेव्हा मी त्याला फक्त हो म्हणायला शिकायला हवं.

drmanoj2610@gmail.com