12 December 2017

News Flash

राहा फिट : मनाचे आरोग्य

दैनंदिन ताण-तणावाला सामोरे जाण्यासाठी राग येणाऱ्या कारणांवर मात करण्यासाठी प्रयत्न करा.

मीनल गांगुर्डे | Updated: August 3, 2017 1:30 AM

डॉ. वाणी कुल्हळी, मानसोपचारतज्ज्ञ

शांत राहून, मनाशी संवाद साधल्यास अनेक ताण निवळतात, राग कमी होतो, पण आता तेवढा वेळच कोणाकडे नसतो. प्रत्येक जण धावपळीत आहे. त्यामुळे रागही तेवढय़ाच वेगात येतो आणि त्याचा वेळीच निचरा झाला नाही तर इतर कोणावर निघतो. त्याचे पुढचे परिणाम किंवा पश्चत्ताप सहन करण्याची वेळ आपल्यावर ओढवते. खरेतर नियमित व्यायाम, पुरेशी झोप, सकस आहार घेतल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. मात्र याचा अवलंब करणे शक्य होत नाही. मग चिडचिड होणे, अस्वस्थ वाटणे, कामाकडे दुर्लक्ष होणे, सातत्याने झोप येणे, व्यसनाच्या अधीन जाणे या पुढच्या पायऱ्या येतात. राग येणे, ताण येणे हे साहजिकच आहे. मात्र त्याचा प्रवास नैराश्याकडे होऊ न देणे आपल्या हातात आहे. राग किंवा ताण आला तर अनेक लहानसहान गोष्टींमधून तो कमी करता येतो. या सर्व युक्त्या प्रत्येकाला लागू होतीलच असे नाही, मात्र आपला राग कशाने जातो याचा विचार करून तुम्ही त्यात भर घालू शकता.

दैनंदिन ताण-तणावाला सामोरे जाण्यासाठी राग येणाऱ्या कारणांवर मात करण्यासाठी प्रयत्न करा. यासाठी पूर्वनियोजन करणे उपयुक्त ठरू शकते. तणाव याकडे समस्या म्हणून न पाहता त्याचे आव्हान स्वीकारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. अशा प्रसंगी आपली मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करा. कार्यालयात एखाद्या विषयावर वरिष्ठांसोबत वाद झाल्यास ती व्यक्ती आपल्या विरोधात आहे, असा विचार करू नका. अशा प्रसंगी त्या व्यक्तीला उलट उत्तर देण्याऐवजी मध्यम मार्ग स्वीकारा किंवा अशा प्रसंगी आपण शांत होण्याच्या उपायांचा शोध घ्या. वर दिलेले सर्वच उपाय प्रत्येक व्यक्तीला उपयुक्त ठरतील असे नाही. त्यामुळे आपल्या रागावर नियंत्रण आणण्यास उपयुक्त ठरणारे उपाय निवडा व त्याचा सातत्याने वापर करा. या उपायांचा वारंवार वापर केला तर ताण-तणाव कमी होऊ  शकतो. सातत्याने नवनवीन विषयांबद्दल वाचत राहणे, शिकत राहणे हादेखील उपाय ताण-तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे नियमित काम करण्याबरोबर संगीत, कला, नृत्य, साहित्य किंवा तत्सम विषय शिका.

 • राग अनावर झाला किंवा खूप अस्वस्थ वाटत असेल, तेव्हा एके ठिकाणी शांत बसून खोल श्वास घ्यावा. अशा प्रकारे किमान ६ ते ७ वेळा खोल श्वासोच्छवास घ्यावा.
 • चेहऱ्यावर थंड पाणी मारावे आणि पेलाभर थंड पाणी प्यावे.
 • मोबाइलच्या स्क्रीनवर सकारात्मक किंवा प्रेरणादायी वाक्यांचे चित्र ठेवावे. अनेक जण विनोदी चित्रही ठेवतात. राग अनावर होत असेल किंवा अस्वस्थ वाटत असल्यास मोबाइलवरील चित्र पाहणे फायद्याचे ठरू शकते.
 • खूप जास्त ताण आल्यासारखे वाटत असल्यास आपल्या आजूबाजूच्या वस्तूंकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या परिसरातील वस्तू कुठे व कशा ठेवल्या आहेत हे लक्ष देऊन पाहा आणि डोळे बंद करून आठवण्याचा प्रयत्न करा.
 • मनातल्या मनात आकडे मोजावे आणि कालांतराने हेच आकडे मागून मोजण्यास सुरुवात करावी.
 • आपल्या आवडीनुसार सौम्य तालातील संगीत ऐकणे.
 • आवडीचे पुस्तक, लेख, कविता वाचणे.
 • कार्यालयातील संगणकाशेजारी एखादे छोटे रोपटे ठेवणे किंवा संगणकाशेजारी कुटुंबाचे छायाचित्र, विनोदी छायाचित्र ठेवणे.
 • कुत्रा, मांजर या प्राण्यांशी खेळणे. घरातील पाळीव प्राणी हे अनेकांचा ताण घालवणारे उत्तम मित्र असतात.
 • आजूबाजूचे वातावरण सुगंधी ठेवणे फायद्याचे ठरते.
 • तणावाच्या प्रसंगी आपल्या मनात येणाऱ्या भावना लिहून काढा. सुरुवातीला कठीण वाटेल, मात्र मनातले विचार कागदावर उतरले की त्यातील गुंता कमी होतो, आपल्याला नेमक्या कोणत्या गोष्टीचा राग आलाय किंवा ताण आलाय ते समजते.
 • अस्वस्थ वाटत असल्यास आंघोळ करणे. हा उपाय थोडा वेगळा असला तरी बहुतेकांना त्याचा फायदा होतो हे निश्चित.
 • नामस्मरण करणे. हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. मात्र यातून मन वेगळीकडे वळण्यास मदत होते.
 • मित्रांशी चर्चा करणे. तुमच्या सोबत असूनही त्रयस्थपणे घटनेकडे पाहणे मित्रांना जमते. केवळ बोलूनही ताण निवळतो.
 • शक्य असल्यास चालण्यासाठी बाहेर पडणे. चालणे हा व्यायामप्रकार म्हणूनही उपयुक्त आहे. शिवाय ताण वाढलेल्या जागेपासून दूर राहिल्यानेही फायदा होतो.
 • विनोदी चित्रपट पाहणे. हा उपाय तातडीने करता आला नाही तर दिवसभराचा ताण घालवण्यासाठी आपल्या आवडीचे चित्रपट मदत करतात. अर्थात केवळ त्यात गुंतून पडण्याची जोखीम असते.
 • योगासने करणे. श्वासावर लक्ष देणे, दीर्घ श्वास घेणे, असे साधे प्रकारही मन:शांती वाढवतात. कार्यालयाच्या खूर्चीवर बसल्या बसल्याही काही मिनिटे डोळे मिटून शांत राहिल्यास बरे वाटते.

First Published on August 3, 2017 1:30 am

Web Title: mental health mental issue