17 December 2017

News Flash

डोळ्यांवरचा ताण

संगणक वापरताना खोलीतील वातानुकूलित यंत्रणेचा झोत डोळ्यांच्या दिशेने नसावा.

संपदा सोवनी | Updated: June 15, 2017 12:53 AM

डॉ. संजय पाटील, नेत्रतज्ज्ञ

कामाच्या गडबडीत जसा मान आणि खांद्यांना ताण आल्याचे जाणवते, तसाच ताण डोळ्यांवरही येत असतो. संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर, वाचन या गोष्टींमुळे डोळ्यांवर येणारा ताण कसा घालवावा हे सांगणाऱ्या या काही टीप-

 • दैनंदिन कामादरम्यान डोळ्यांवर येणाऱ्या ताणासाठी ‘रूल ऑफ ट्वेंटी’ पाळण्यास सांगितले जाते. म्हणजे संगणक वापरताना किंवा वाचताना दर वीस मिनिटांनी वीस मीटर अंतरावर वीस सेकंद पाहावे. यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो.
 • ताण कमी करण्यासाठी डोळ्यांची १५ ते २० वेळा उघडझाप करावी.
 • संगणक वापरताना खोलीतील वातानुकूलित यंत्रणेचा झोत डोळ्यांच्या दिशेने नसावा. ‘एसी’च्या गार हवेने डोळ्यांना कोरडेपणा येतो.
 • दर एक तासाने डोळे गार पाण्याने धुवावेत.
 • संगणकाच्या ‘मॉनिटर’ची उंची आणि आपल्या डोळ्यांचा ‘स्क्रीन’कडे पाहण्याचा कोन योग्य
 • हवा. काही ठिकाणी ‘डेस्कटॉप’कडे वर पाहिल्यासारखे पाहावे लागेल, असा तो मांडलेला असतो. हे टाळून ‘लॅपटॉप’प्रमाणे डोळ्यांच्या रेषेत संगणकाचा स्क्रीन हवा.
 • पूर्ण उजेडात, दिवसा वाचलेले चांगले. वाचताना पुस्तक आणि डोळ्यांमध्ये एक फुटाचे अंतर ठेवा. झोपून वाचू नका.
 • डोळ्यांना चष्मा असेल, तर तो डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे नियमित वापरणे गरजेचे. दोन डोळ्यांच्या दृष्टीत जो फरक असतो, त्याचा विचार चष्मा देताना केलेला असतो. त्यामुळे चष्मा वापरल्यामुळे डोळ्यांवरील ताण कमी होतो.
 • चाळिशीनंतर काचबिंदूची शक्यता तपासण्यासाठी ‘इन्ट्राओक्युलर प्रेशर’ तपासावे लागते. ‘इन्ट्राओक्युलर प्रेशर’ म्हणजे डोळ्यांमधील
 • दाब. हा दाब वाढल्यास त्या स्थितीस काचबिंदू म्हणतात. ही शक्यता चाळिशीनंतर अधिक असते. त्यामुळे अशा व्यक्तींनी वर्षांतून एकदा तरी नेत्रतज्ज्ञांकडून काचबिंदूच्या दृष्टीने डोळे तपासणी जरूर करून घ्यावी.
 • चाळिशीपूर्वी चष्म्याचा नंबर लागला असल्याची शक्यता वाटत असता डोळे जरूर तपासावेत. चष्मा लागल्यावर त्याचा नंबर बदलला आहे का, हेही नेत्रतज्ज्ञांच्या सल्ल्याने तपासायला हवे.

डोळे कोरडे पडण्याची समस्या

संगणक, मोबाइल, टीव्ही अशा उपकरणांचा सततचा वापर, जागरण, सतत प्रवास या गोष्टींमुळे डोळे कोरडे पडण्याचे (ड्राय आय) प्रमाण वाढते आहे. ‘कॉन्टॅक्ट लेन्स’ वापरणाऱ्यांमध्येही डोळे कोरडे पडू शकतात. थायरॉइडचा त्रास असलेल्या व्यक्ती किंवा चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करून घेतलेल्या व्यक्तींनाही ही समस्या जाणवण्याची शक्यता अधिक असते.

 • डोळे कोरडे पडू नयेत म्हणून डोळ्यांना पुरेशी विश्रांती हवी. येथे ‘रूल ऑफ ट्वेंटी’ लक्षात ठेवा.
 • सारखे डोळे चोळू नका.
 • खूप वाऱ्यात बाहेर जायचे असेल तर गॉगल वापरा.
 • कॉन्टॅक्ट लेन्स वापरत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘ल्युब्रिकेटिंग ड्रॉप्स’ वापरा.
 • डोळ्यांत रासायनिक पदार्थ वापरलेली सौंदर्यप्रसाधने जाऊ देऊ नका, तसेच डोळ्यांत साबणाचे पाणी जाऊ देऊ नका.
 • दिवसातून तीन-चार वेळा डोळे गार पाण्याने धुवा.
 • ‘ड्राय आय’ टाळण्यासाठी तब्येत सांभाळून खाण्यात स्निग्ध पदार्थ असावेत.

First Published on June 15, 2017 12:50 am

Web Title: mental stress issue