16 October 2019

News Flash

ऑक्टोबर उकाडा

ऑक्टोबर महिना सुरू होताच कडक उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमुळे जिवाची काहिली होते.

|| शैलजा तिवले

ऑक्टोबर महिना सुरू होताच कडक उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमुळे जिवाची काहिली होते. ‘ऑक्टोबर हीट’ असा उल्लेख केल्या जाणाऱ्या या ऋतूबदलाच्या काळामध्ये आरोग्याची योग्य काळजी घेतल्यास विषाणूजन्य आजारांपासून ते उष्णतेच्या दाहामुळे निर्माण होणारे विविध आजार टाळणे शक्य आहे.

ऑक्टोबर महिना हा ऋतू परिवर्तनाचा काळ असून यात हवेमध्ये उष्णता आणि दमटपणाचे प्रमाण वाढते. हे वातावरण विषाणूच्या वाढीसाठी पोषक असते. पावसाळ्यानंतर अचानक बदलत्या तापमानाशी जुळवून घेण्यास शरीराला वेळ लागतो. या काळात रोगप्रतिकारकशक्तीही कमी झालेली असते. त्यामुळे या काळात विषाणूजन्य तापासह संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते.

विषाणूजन्य ताप सर्वसाधारणपणे दोन ते चार दिवस राहतो. परंतु याच काळात डेंग्यूच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने दोन दिवसांहून अधिक काळ ताप असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने चाचण्या करून घ्याव्यात, असे फॅमिली डॉक्टर जयेश लेले सांगतात.

ऑक्टोबर महिन्यातील वाढत्या उष्म्यामध्ये शरीराची काळजी कशी घ्यावी याबाबत आहारतज्ज्ञ राजीव कानिटकर सांगतात, या काळात घाम अधिक प्रमाणात येतो. त्यामुळे शरीरातील पाणी मोठय़ा प्रमाणावर कमी होते. दिवसभरात कमीत कमी दीड लीटर ते जास्तीत अडीच लीटर पाणी शरीरात जाणे गरजेचे आहे.

पाण्यासोबतच इतर खनिजांची आवश्यकता

घामावाटे पाण्यासोबतच शरीरातील खनिजेही बाहेर फेकली जातात. यांची पूर्तता केवळ पाण्यामधून होत नाही. यासाठी दिवसभरात पाण्यासोबतच लिंबू, आवळा, कोकम यांची सरबते प्यायल्यास इतर खनिजांची कमतरता भरून निघते. मात्र ही सरबते थंड पाण्यातून न घेता साध्या पाण्यातून घ्यावीत. धने, जिरे, वाळ्याचे पाणीही फायदेशीर असते. नारळाचे पाणीदेखील उपयुक्त आहे. स्वयंपाक करणाऱ्या गृहिणी किंवा भटारखान्यामध्ये काम करणारे कामगार जे मुख्यत: आगीजवळ काम करतात, अशा व्यक्तींनी पाण्यासोबतच खनिजांची पूर्तता करण्यासाठी वर नमूद केलेले पदार्थ अवश्य घ्यावेत.

आहारातील बदल

उष्णता, पित्त वाढवणाऱ्या पदार्थाचे आहारामध्ये शक्यतो सेवन टाळावे. गरम मसाल्यांचा वापर केलेल्या पदार्थामुळे शरीरातील उष्णता वाढण्याची अधिक शक्यता असते. यामध्ये विशेषकरून दालचिनी, मिरी आणि लवंग याचा कमीत कमी वापर करावा. तसेच तेलकट किंवा झणझणीत तिखट पदार्थाचे प्रमाणही आहारामध्ये कमी असावे. फळांमध्ये डाळिंबे, मोसंबी, कलिंगड यांचे जास्तीत जास्त सेवन करावे. यामध्ये मात्र शीतपेटीमध्ये म्हणजेच फ्रिजमध्ये ठेवलेली थंड फळे खाऊ नयेत.

अंगातील उष्णता वाढल्यास

उन्हाचा दाह वाढल्याने शरीरातील उष्णताही वाढते. त्यामुळे मग लघवीला गरम होणे, लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे, संपूर्ण अंगातून वाफा निघाल्यासारखे वाटणे, पोटामध्ये उष्मा जाणवणे ही लक्षणे जाणवायला लागतात.

गुलकंद पोटातील उष्णता कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. थंड दुधात घालून गुलकंद प्यायल्यास पोटातील आग कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर पोळीला जॅम लावून खाल्ला तरी चालेल. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी गुलकंदाऐवजी धने, जिरे, वाळ्याचे पाणी प्यावे. धने, जिरे, वाळा, तुळशीचे बी यांपैकी कोणतेही पदार्थ रात्री पाण्यामध्ये भिजत घालावेत. सकाळी हे पाणी थोडे उकळून गाळून प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते. दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये सब्जा घालून प्यायल्यानेही बराच फरक पडतो. भाताच्या लाह्य़ांचे पाणी हे सलाइनइतके प्रभावी असते. सलाइनमधील पाण्याप्रमाणेच भाताच्या लाह्य़ांचे पाणीदेखील शरीरातील पाण्याची कमतरता जलद रीतीने भरून काढते. कानामध्ये रात्री कोमट तेलाचे काही थेंब घालावेत. याचा उष्णता कमी करण्यासाठी फायदा होतो. अनेकदा उष्णतेचा दाह वाढल्यास कानातून वाफा आल्यासारखे वाटते. अशा वेळी दुर्वाचा रस कानामध्ये पाच थेंब घालून तो १५ ते २० मिनिटे ठेवावा. त्यानंतर कान उलटा करून तो बाहेर काढून टाकावा. घशाची आणि तोंडाची आग किंवा जळजळ होत असेल तर वेलचीचे दाणे आणि खडीसाखर दिवसातून दोन ते तीन वेळा चघळावी.

डोळ्यांची, पायांची आग होत असल्यास..

डोळ्यांची आणि पायाची आग यावर उत्तम उपाय म्हणजे कैलास जीवन किंवा शतधौत घृत पायाच्या तळव्यांना लावून चोळणे. घृत हा संस्कृत शब्द असून याचा अर्थ तूप. शतधौत तूप हे अगदी शुद्ध स्वरूपाचे तूप असते. रोज संध्याकाळी झोपताना कैलास जीवन किंवा हे तूप लावून तळपाय चोळल्याने डोळ्यांची आग तर कमी होतेच, शिवाय तळव्यांना थंडावा जाणवायला लागतो. डोळ्यांच्या पापण्यांच्या वरच्या आणि खालच्या बाजूसही कैलास जीवन किंवा हे तूप लावल्यास बराच आराम पडतो. कडक उन्हातून आल्यानंतर डोळ्यांची जळजळ होते. अशा वेळी कच्च्या थंड दुधामध्ये भिजवून कापडाच्या पट्टय़ा डोळ्यांवर ठेवल्या तरी जळजळ काही प्रमाणात कमी होते. या काळामध्ये डोळे कोरडे पडतात. त्यामुळे डोळे येणाचा त्रास ही होतो. तेव्हा डोळ्यांवर दुधाच्या किंवा गुलाब पाण्याच्या पट्टय़ा ठेवल्याने कोरडेपणा कमी होतो.

त्वचेची काळजी

उन्हामुळे सतत घाम येत असल्याने बुरशीजन्य (फंगल) संसर्ग होण्याची शक्यता असल्याचे नमूद करत असताना त्वचारोगतज्ज्ञ डॉ. के. ई. मुकादम सांगतात, दिवसातून दोन वेळा आंघोळ करावी. अंग कोरडे ठेवावे. शक्यतो सैलसर आणि सुती कपडे घालावेत. बुरशीजन्य संसर्ग झाल्यास थेट औषधांच्या दुकानातून मलम घेऊन न लावता त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.

त्वचा नाजूक असलेल्या व्यक्तींनी दुपारी १२ ते चार या कडक उन्हाच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे. उन्हामध्ये बाहेर जायचे असल्यास केमिकल सनस्क्रीनऐवजी फिजिकल सनस्क्रीनचा वापर करावा. केमिकल सनस्क्रीनमधील रसायनांमुळे त्वचेला हानी पोहोचू शकते, तसेच सनस्क्रीन घेताना त्यातील एसपीएफचे (सन प्रोटेक्शन फॅक्टर) प्रमाण १५हून अधिक असेल याची खात्री करून घ्यावी.

संपूर्ण अंगाची आग होत असेल, अंगाला खूप घाम येत असेल किंवा घामाला वास येत असेल अशा व्यक्तींनी आंघोळीनंतर कोणत्याही साध्या पावडरमध्ये चंदन पावडर मिसळून ती संपूर्ण अंगाला लावावी, असा सल्ला आहारतज्ज्ञ डॉ. राजीव कानिटकर देतात.

तहान भागत नसल्यास..

उन्हामुळे घसा कोरडा पडतो. सारखे पाणी प्यायले तरी तहान भागत नाही. अशा वेळी मग थंड पाणी किंवा सरबते रिचवली जातात. थंड पदार्थ खाल्ल्याने किंवा प्यायल्याने तहान भागते, हा गैरसमज आहे. हे पदार्थ तात्पुरता थंडावा देणारे असून त्यांच्या सेवनाने घशाचा शोष अधिकच वाढत जातो. अशा वेळी उलट करावे. गरम पाणी प्यावे. गरम पाण्याने तहान कमी होते. हे पटण्यासारखे नसले तरी हा प्रयोग नक्की करून पाहावा. खडीसाखर, वेलची, जेष्ठमध चघळ्याने देखील घशाचा शोष कमी होण्यास मदत होते. ताक प्यायल्यानेही घशाचा शोष कमी होतो. तसेच ते पाचक असल्याने पचनक्रियेसाठी देखील फायदेशीर असते.

First Published on October 9, 2018 3:01 am

Web Title: october heat 2