18 December 2017

News Flash

गुजरात / हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल २०१७

किती हा कामाचा ताण?

वनातील अर्धा वेळ नोकरीसाठी दिला तरी आरोग्यावर मात्र नोकरीच्या अनुभवाचा पूर्ण परिणाम होत असतो.

डॉ. वाणी कुल्हळी | Updated: October 5, 2017 1:37 AM

शहरातील बहुतांश जणांच्या आयुष्याचा अर्धा वेळ कार्यालयाच्या ठिकाणी जातो. काम अर्धा वेळ असले तरी कामाचा ताण काही जणांचे  संपूर्ण आयुष्य व्यापतो. नोकरी व घर येथील जबाबदाऱ्या व ताण वेगळे ठेवणे जमले नाही तर निराशा येते, हे प्रत्येकाने अनुभवलेले असते. कार्यालयीन ताणाने आयुष्य व्यापले जात असल्याने याबाबत गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. जागतिक मानसिक आरोग्य सप्ताहानिमित्त हा विशेष लेख.

२०१५ मध्ये अतिनैराश्यग्रस्त असलेल्या जर्मनविंग्जच्या विमानचालकाने मुद्दामून विमानाचा अपघात घडवून आणला. या अपघातात १५० जण मृत झाले.

मानसिक आजारांमुळे २०१५-२०३० या काळात जवळ-जवळ पाच अब्ज डॉलरचे नुकसान भारताला होणार आहे, असा अंदाज संशोधनातून कळला आहे.

अशा अनेक उदाहरणांमधून काम आणि मानसिक आरोग्याचा एकमेकांशी असलेला घनिष्ठ संबंध अधोरेखित होतो. हल्लीच्या काळात व्यक्ती आपला दिवसाचा अध्र्यापेक्षा अधिक वेळ नोकरीसाठी वापरतात. जीवनातील अर्धा वेळ नोकरीसाठी दिला तरी आरोग्यावर मात्र नोकरीच्या अनुभवाचा पूर्ण परिणाम होत असतो. आपले आरोग्य अमूल्य आहे आणि मानसिक आरोग्य त्याचा मुख्य घटक आहे. कार्यालयातील वातावरणाचा व कामाचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम मान्य करत यंदा जागतिक मानसिक आरोग्य दिवसानिमित्त ‘कामाचे ठिकाण आणि मानसिक आरोग्य’ यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

कामाशी निगडित मानसिक आरोग्याचे पैलू

नियमितपणे काम केल्याने मानसिक आरोग्य चांगले राहते. नोकरी नसणे किंवा गमावणे हे पुरुषांमधील अतिनैराश्याचे महत्त्वाचे कारण आहे असे संशोधनांमधून समजले आहे. तसेच नोकरी करणाऱ्या स्त्रियांमध्ये आत्मविश्वास आणि पर्यायाने मानसिक आरोग्य जास्त चांगले टिकून राहते. देशातील नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण त्या देशाच्या आर्थिक विकास आणि स्थैर्याचे दर्शक मानले जातात. त्यामुळे नोकरी करण्यासाठीच्या संधी वाढवण्याचे धोरण सरकारकडून आखले जाते. कोणाच्याही आवडी, कौशल्य, व्यक्तिमत्त्वाशी अनुरूप असलेले काम आणि कामाची पद्धत असेल तर ताण कमी होतो. मानसिक आरोग्य चांगले नसेल तर कामाबद्दल ओढ कमी होते आणि त्याचा ताण जास्त जाणवतो.

कामाच्या ठिकाणी अतिनैराश्य, तंबाखूचे व्यसन, दारूचे व्यसन हे तीन मुख्य प्रश्न आढळतात. अस्वस्थ वाटणारी व्यक्ती आपले काम लक्षपूर्वक करू शकत नाही. यामुळे कामाची गती आणि प्रत खालावते आणि दुर्घटनाही होऊ शकतात. अशी व्यक्ती कामाला नियमितपणे किंवा वेळेवर येऊ शकत नाही. त्यांचे इतरांशी जमत नसल्यामुळे ते अनेकदा एकटे राहतात किंवा त्यांना इतरांविषयी वारंवार तक्रार करावी लागते. मानसिक आजारामुळे झालेल्या शारीरिक परिणामामुळे या व्यक्ती आजारीदेखील जास्त पडतात आणि प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे ते लवकर बरे होत नाहीत.

नवी दिशा

सर्वसाधारणपणे १५ ते २० टक्के व्यक्तींना मानसिक अस्वस्थता असू शकते. त्याचा नकारात्मक प्रभाव त्यांच्या कुटुंबावर तर होतोच, पण नोकरी देणाऱ्या संस्थेवरही होतो. काम व्यवस्थित न झाल्याने तर नुकसान होतेच, शिवाय मानसिक त्रास असलेल्या कामगारांचा आरोग्य विमा, जीवन विमा यावर अधिक खर्च होतो. त्याचप्रमाणे कंपनीची शिस्त व कायदे पाळण्यासंबंधीही अनेक समस्या निर्माण होतात. आधीच्या काळात मानसिक अस्वस्थता असलेल्या व्यक्तीला निवडून त्याला नोकरीतून बाहेर काढण्याची पद्धत होती; पण असे केल्याने कंपनीचे आर्थिक नुकसान होते आणि ते नैतिकदृष्टय़ योग्य नसल्याचे लक्षात आले. अपंगत्वासंबंधीच्या कायद्यांनुसारही असे करणे बेकायदेशीर झाले आहे. म्हणून मानसिक त्रास असलेल्या कर्मचाऱ्याला योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा देऊन त्याचे आयुष्य परत रुळावर आणणे हा योग्य आणि फायदेशीर पर्याय ठरलेला आहे. त्याहूनही अधिक चांगला पर्याय म्हणजे मानसिक आजार टाळणे – हा आहे.

मानसिक आजार कसे टाळू शकता?

व्यक्तिगत उपाय : आपले काम आणि कामाचे स्वरूप, आपल्या आवडी, कौशल्य, व्यक्तिमत्त्व आणि कुवतीप्रमाणे निवडावे. त्यासाठी करिअर मार्गदर्शकाचीही मदत घेऊ शकता. काम करण्याची क्षमता जास्त असेल तरीही सतत काम करणे योग्य नाही. असे केल्याने मेंदू थकून जातो आणि मानसिक आजार होऊ शकतात. कामाचा ताण कमी करण्यासाठी चहा, कॉफी, तंबाखू, दारू, झोपेच्या गोळ्या वापरणे म्हणजे मानसिक आजाराला आमंत्रण देणे आहे. त्याऐवजी पुरेसा आराम करणे, नियमित व्यायाम करणे, छंद-कला जोपासणे आणि नातेवाईक – मित्रांना भेटणे हे जास्त योग्य आणि परिणामकारी. कामाच्या ठिकाणी विशिष्ट त्रास असेल तर चर्चा करून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समुपदेशनाचा मार्ग सांगितला गेल्यास तो मान्य करून मदत घ्यावी. कधीकधी नोकरी बदलणे हा पर्यायही मान्य करावा लागतो.

मानसिक त्रास आणि आजार

मानसिक आजारप्रवण असलेल्या व्यक्तीला ताणतणावामुळे मानसिक आजार होतो. मानसिक त्रास आणि मानसिक आजार टाळण्यासाठी नोकरी करणाऱ्याने आणि कंपनी मालक दोघांनीही काळजी घेतली पाहिजे. आजार झाल्यास लवकरात लवकर तो ओळखून त्याचे उपचार केल्याने व्यक्ती पूर्वीसारखीच काम करू शकते. हे व्यक्तीसाठी, कंपनीसाठी, समाजासाठी आणि देशासाठी फायद्याचे आहे.

कंपनीची जबाबदारी

कंपनी कितीही मोठी किंवा लहान असली तरी कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे, ही कंपनीची जबाबदारी असते. तिथे कोणाचाही शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळ होणार नाही अशी काळजी घेतली पाहिजे. कामाचे तास कायद्याने नियंत्रित केले जातात आणि सुट्टय़ा देणे भाग असते. त्यामुळे कामाचा ताण कमी होतो. त्याही पुढे जाऊन अलीकडे कर्मचारी साहाय्य कार्यशाळा घातल्या जातात. त्यातून तणाव व्यवस्थापन, तंबाखू-दारू व्यसनमुक्ती, नातेसंबंध अशा विषयांवर कार्यशाळा घेतल्या जातात.

एखाद्या व्यक्तीला काही मानसिक त्रास होत असल्यास त्याबद्दल चर्चा करून मार्ग काढण्यासाठी अनेक कंपन्यांमध्ये समुपदेशक असतात. मानसिक आजार आढळल्यास हे समुपदेशक उपचारासाठी प्रवृत्त करून त्या व्यक्तीला लवकर बरे होण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाकडे पाठवतात. समुपदेशक नसले तरीही मानसिकरीत्या त्रस्त असलेल्या

व्यक्तींना कशी मदत करावे याचे प्रशिक्षण मनुष्यबळ विकास विभागामधील (एचआर) काही कर्मचाऱ्यांना असते. त्यामुळे ते असे त्रास ओळखून समुपदेशकाकडे जाण्याचे सुचवू शकतात.

काही व्यवसायांमध्ये विशिष्ट प्रकारचे ताणतणाव असतात. यामध्ये त्याच व्यवसायातील इतरांबरोबर ग्रुप बनवून ते एकमेकांना आधार देतात. असे व्यवसायाची काही उदाहरणे म्हणजे डॉक्टर आणि पोलीस. व्यवसायामधील अनुभव वाढल्यावर जबाबदारीही वाढते. त्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण घेतल्याने त्याचा ताण कमी होतो.

vbkulhalli@gmail.com

First Published on October 5, 2017 1:37 am

Web Title: office workload office pressure