25 September 2020

News Flash

पिंपळपान : अफू

सध्या चीन या देशाने विविध क्षेत्रांत प्रगती करून अमेरिकेलाही मागे टाकले आहे.

अहिफेनं रसे तिक्तंविपाके कटुकं विषम्।

स्तम्भनं रूक्षमुष्णं च वेदनास्थापनं परम्॥

स्वेदनं स्वापजननं कफरोगविनाशनम्॥

द्रव्यगुणविज्ञानम् (पृष्ठ- ८४)

सध्या चीन या देशाने विविध क्षेत्रांत प्रगती करून अमेरिकेलाही मागे टाकले आहे. पण सुमारे १०० वर्षांपूर्वी चीनमधील बहुसंख्य ग्रामीण प्रजेला अफूचे प्रचंड व्यसन लागले होते. समस्त चिनी प्रजेला हे व्यसन लावण्याचे दुष्कर्म युरोपातील, पाश्चात्त्य देशांतील व्यापाऱ्यांनी दीर्घकाळ चालवले होते. कारण त्यांना चीनमधील कच्ची साधनसंपत्ती नाममात्र पैशात लुटायची होती, तसेच कायम चीनला व्यसनाच्या विळख्यात अडकवायचे होते.

अहिफेन, अफीन, अफीम, ओपिअम या विविध नावांनी ओळखली जाणारी वनस्पती चरक, सुश्रुतादी ग्रंथात अजिबात वर्णिलेली नाही. अफूचा पहिला उल्लेख चौदाव्या शतकातील शारंगधर संहिता आणि सोळाव्या शतकातील भावमिश्रांच्या ग्रंथात सापडतो. अफूची आयात भारतात तुर्कस्थान, इराण अशा प्रदेशांतून सुरू झाली आणि त्यानंतर हळूहळू आपल्या देशातील उत्तर भागात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र होत आहे. अफू हा खूप खूप अंमल आणणारा; सामान्य माणसाच्या आयुष्याची ‘होळी’ करणारा पदार्थ आहे. हे माहीत असूनही केंद्र सरकार त्याच्या सार्वत्रिक शेतीवर बंदी घालू शकत नाही; कारण त्यामध्ये खसखस हे तुमच्या-आमच्या आहारातील घटक अफूच्या बोंडांमध्ये मिळते.

अफूचे विविध राज्यांत होणाऱ्या लागवडीनुसार चार प्रमुख प्रकार मानले जातात. नेपाळ व बिहारमध्ये अफूला ‘पटनिया’ या नावाने ओळखले जाते. याचे औषधी कार्य विशेष उल्लेखनीय आहे. उत्तर प्रदेशमधील बनारस जवळपासच्या प्रदेशात अफूला ‘बनारसी’ या नावाने ओळखले जाते. त्याचाही औषधात वापर होत असतो. मध्य भारत, राजस्थान व पश्चिम भारतातील अफूला ‘मालव अफीम’ असे संबोधतात. त्याचा वापर खूपच कमी आहे. आयुर्वेदीय ग्रंथात अफूच्या विविध वर्णाप्रमाणे चार भेद सांगितले आहेत.

जारण अफीम नावाने ओळखली जाणारी अफू पांढऱ्या रंगाची असते. तिच्या वापराने आहाराचे चांगले पचन होते.

काळय़ा रंगाच्या अफूला मारण अशी संज्ञा आहे. ती वारंवार घेत राहिल्यास माणसाला लवकरच यमसदनास पाठवते.

पिवळय़ा रंगाची अफू शरीराचा वर्ण सुधारण्याचे, टिकाऊ स्वरूपाचे आयुष्य व म्हातारपण लांब ठेवण्याचे कार्य करते, असे ग्रंथात वर्णन आहे.

सारण नावाची अफू चित्रविचित्र रंगांची असून ती मलमूत्रनि:सारक आहे. मात्र श्वेत व पीत वर्णाची अफू आजकाल दुर्मीळ आहे.

अफीम हिंदी या पाचव्या प्रकारच्या अफूचे गोळे; अधिकृत सरकारी अफू म्हणून चीनसारख्या देशात निर्यात होत असत.

अफू हे दिव्य औषध आहे. अफूमध्ये उत्तेजक, आल्हादकारक, वाजीकर, सर्व शरीरांस शांतता आणणारा, निद्राजनन, पीडाशामक, शूलघ्न, कैफ आणणारा, श्लेष्मघ्न, ग्राही, शोणितास्थापन, स्वेदजनन, ज्वरघ्न, शोथघ्न, कासहर, संकोच – विकासप्रतिबंधक असे अमौलिक धर्म आहेत. अफू लहान-मोठय़ा प्रमाणात दिल्यास वेगवेगळे परिणाम घडतात. अफूचा सावकाश गुण पाहिजे असल्यास पाव गुंजेची गोळी द्यावी; तत्काळ गुण हवा असल्यास आसवारिष्टात मिसळून द्यावी. एक काळ ग्रामीण भागात लहान बाळाला कणभर अफू चाटवून शेतावर काम करणाऱ्या महिला आपल्या कामावर जात, अशी घातक पद्धत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 12:10 am

Web Title: opium
Next Stories
1 रक्ताचे नाते!
2 मना पाहता! : रागाचा निचरा
3 पंचकर्म : रजोनिवृत्तीच्या काळातील पंचकर्म
Just Now!
X