20 January 2019

News Flash

पथ्य अपथ्य! : संधिवात

आयुर्वेदाने मात्र संधिवात या शब्दाची व्याप्ती मोठी केलेली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र

संधिवात हा शब्द थरकाप उडविणारा, मनाला खचवणारा. एवढे संधिवाताचे भय व्यक्तीच्या मनामध्ये निर्माण झालेले दिसते. आयुर्वेदाने मात्र संधिवात या शब्दाची व्याप्ती मोठी केलेली आहे. प्रत्येक सांध्यांना होणाऱ्या वेदना म्हणजे संधीवात नव्हे, तर त्याची निदान मीमांसा तज्ज्ञ वैद्याकडून करून वातरक्त, आमवात, एकांगवात आदीमध्ये निष्कर्षांप्रत करून पथ्य व चिकित्सेची योजना करावी. या प्रत्येक प्रकारात आयुर्वेदानुसार संप्राप्ती वेगळी असल्या कारणाने निदान करण्यात चूक झाली की, पथ्य चुकते व चिक्तिसाही चुकीच्या दिशेने होऊन त्या रुग्णाची व्याधी वाढलेली दिसते. सामान्यत मोठय़ा सांध्यांना, लहान सांध्यांना होणाऱ्या वेदना, कधी कधी प्रथम येणारी सूज नंतर स्थिरावणे, वेदना तीव्र होणे आदी लक्षणे वातव्याधी दर्शवतात. यावरील सामान्य पथ्य व्यक्तीने पाळल्यास निश्चितच पुढील अवस्था टाळल्या जातील यात शंका नाही. थंडी वाढू लागली की व्यक्तीमधील वाताची विकृती (असल्यास) लक्षणे दाखवायला सुरुवात करते. म्हणूनच वाताचे पथ्य थंडीत अत्यंत महत्त्वाचे ठरते.

कोरडय़ा धान्यांचे, पदार्थाचे सेवन वातव्याधी वाढविताना दिसून येतात. म्हणून हे टाळायला हवे. यामध्ये वऱ्याचे तांदूळ (भगर), नाचणी, जव यांचा समावेश प्रथम करायला हवा. या धान्यांपासून केलेले पदार्थही साहजिकच टाळायला हवे. या धान्यांमधील वात विकृत करण्याची, वृद्धी करण्याची क्षमता संस्कारांनी देखील कमी होत नाही हे विशेष.

काय खाऊ नये?

सध्या लहान मुलांमध्येदेखील हाड दुखणे, सांधे दुखणे अशा तक्रारी जाणवतात. कित्येक पालक संध्याकाळी रात्री मुलांचे हातपाय दाबताना दिसतात. मुलांच्या खाण्यातील नेमकेपणा दूर गेल्याने शरीरस्थ वातामुळे हा त्रास होत आहे. यामुळे खाण्यातून मठ, मटकी, वाल, मोड आलेली मेथी, वाटाणे, भाजलेले-उकडलेले चणे त्यातही सालीसकट असल्यास अधिक त्रासदायक असल्याचे संधिवाताच्या रुग्णाने न खाल्यास लक्षणे कमी होण्यास मदत होते. राजमा, छोले, रगडा, चुरमुरे हेसुध्दा या व्यक्तींनी टाळावे. काळी डाळ हा प्रकार बाहेरच्या जेवणात असतो. ही काळी डाळ संधिवाताच्या सर्व त्रासांमध्ये लक्षणे वाढविणारी आहे. चवळी, वालाची उसळ संधिवात वाढवितात हे लक्षात ठेवायला हवे. बरेच लोक वातकाळात, वृद्धवयात म्हणजे वाताचे प्राबल्य असलेल्या वयात पालेभाज्यांचा अतिरेक करतात. आयुर्वेद शास्त्रानुसार कारलीसुद्धा संधिवातामध्ये टाळायला हवी. जाड बियांच्या फळभाज्याचे सेवन न करणे आरोग्यास हितकारक राहील. संधिवातामध्ये आहाराचा परिणाम इतका तात्काळ होतो की, त्या व्यक्तीला अपथ्य खालल्यानंतर लगेच लक्षणात वाढ दिसून येते. संधिवाताच्या रुग्णांनी हे टाळायला हवे.

संधिवात असताना सुपारीच्या खांडाचे व्यसन ठेवू नये. सर्व प्रकारचे तुरट पदार्थ संधिवाताची लक्षणे वाढवितात. स्त्रियांना तुरट पदार्थ खाण्याचे व्यसन लागल्यासारखे वाटते. जेव्हा त्या ‘माती’ नियमित खाताना आढळतात, तेव्हा ती माती भाजकी असली तरी ती संधिवात वाढवते. मीठ जास्त असलेले पदार्थ टाळावेत. विशेषत साठवणूक केलेले पदार्थ यात डबा बंद फळांचे रस, शीतपेये, ‘रेडी टू इट’, तयार पिठे, तयार भाज्या यांचे सेवन संधिवाताचे लक्षण वाढवते. फळांमध्ये जांभळासारखी फळे तसेच ताडगोळे संधिवात वाढवितात. रताळी, साबुदाणा, साबुदाण्याचे तळलेले पदार्थ, बटाटा, मैद्याचे तळलेले पदार्थ संधिवात वाढवितात. अळूचे कंद वा अळूच्या पानांची वडी न खाल्लेली बरी. कमलकंद हा पदार्थ संधिवातामध्ये अपथ्यकर आहे. नाश्त्याच्या प्रकारात पोहे वा पराठे, बेसनाचे विविध खाद्य पदार्थ, वाळलेले मासे, कोरडे मांस, साठवलेले मासे, दुधाचे नासवलेले पदार्थ, मध टाळावे.

काय खावे?

संधिवाताच्या रुग्णांनी तांदूळ भरपूर प्रमाणात खावा, साळीच्या लाह्य़ा जास्त सेवन करावे तसेच भेंडी, तोंडली, दोडके, फरसबी या भाज्यांचे सेवन करावे. कोवळ्या वांग्याचे भरीत, शेंगदाणे विरहित वांग्याची भाजी, भाज्यांमध्ये मूग, तुरडाळ टाकायला हरकत नाही. मूग व कुळथाचा विशेष उपयोग संधिवाताच्या रुग्णांनी करावा. मुगाचे, उडदाचे लसूण-आले-हळदयुक्त सूप संधिवातामध्ये रुची व अग्नी वाढवते. डाळिंब, द्राक्ष, गोड संत्री, आंबा, बोर, चिंच, लिंबू यांचा वापर या रुग्णांनी मनसोक्त करावा. लोणी, खवा, ताजे दह्य़ाचे पाणी, मेथीचे दाणे, अहालीवाचे खोबऱ्याचे केलेले लाडू वा खीर फायदेशीर ठरते. कोवळ्या मुळ्याचा वापर, गाजर बीट, उकडलेल्या कोबीची पाने यांचा सॅलेड म्हणून वापर करावा. नुसते आले दिवसभरात सेवन केल्यास चांगला लाभ होतो. संधिवातावर नियंत्रण मिळवण्यासाठी आयुर्वेदातील पंचकर्मे उत्तम फलदायी ठरतात.

First Published on February 6, 2018 4:16 am

Web Title: osteoarthritis