News Flash

मोजमाप आरोग्याचे : थंडीतले दुखणे!

थंडी वाढली की सांधेदुखी असलेल्यांचा त्रास वाढतो. दुखरे स्नायूही आणखी त्रास देतात.

व्यायामाला किंवा रोजच्या हालचालींनाही एकदम सुरुवात केली तर दुखापत होण्याची शक्यता या दिवसांत वाढते.

थंडी वाढली की सांधेदुखी असलेल्यांचा त्रास वाढतो. दुखरे स्नायूही आणखी त्रास देतात. व्यायामाला किंवा रोजच्या हालचालींनाही एकदम सुरुवात केली तर दुखापत होण्याची शक्यता या दिवसांत वाढते. हे असे का होते, यावर काही साधे उपाय आहेत का, ते जाणून घेऊ या-

थंडीत सांधेदुखी किंवा स्नायूदुखी का वाढते?
शरीरातील रक्तवाहिन्या तापमानाला प्रतिसाद देत असतात. कमी तापमानात त्या आकुंचन पावतात. त्यामुळे नेहमीच्या तापमानाला एखाद्या रक्तवाहिनीचा व्यास जेवढा असतो, त्याच्या तुलनेत थंडीत हा व्यास नैसर्गिकरीत्याच कमी होतो. त्यामुळे ती रक्तवाहिनी एरवी जेवढय़ा रक्ताचा पुरवठा विशिष्ट स्नायू वा सांध्याला करत असेल त्यापेक्षा आकुंचन पावलेल्या रक्तवाहिनीतून अर्थातच कमी रक्तपुरवठा होतो. जो स्नायू वा सांधा मुळातच आजारी आहे त्याला रक्तपुरवठा कमी झाल्यास वेदना सुरू होतात. या वेदनांना वैद्यकीय भाषेत ‘इस्किव्हिक पेन’ म्हणतात. मुळातच तो आजारी स्नायू वा सांधा दुखत असेल तर दुखणे वाढते आणि दुखत नसेल तर दुखणे सुरू होते.

स्नायू वा सांधा दुखावल्यावर..
थंडीत स्नायू वा सांधा दुखावून असह्य़ वेदना सुरू झाल्यावर डॉक्टरांना दाखवलेले बरे. परंतु डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी दुखऱ्या भागाला थोडा आराम देण्याचा प्रयत्न नक्कीच करता येईल. दुखऱ्या भागाची हालचाल मर्यादित करा, त्या स्नायूला वा सांध्याला विश्रांती द्या, शक्य असल्यास त्या ठिकाणी आधार देऊन क्रेप बँडेज बांधा वा नी कॅप घाला, शेक द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

थंडीत स्नायू आणि सांध्यांना इजा?
स्नायू व सांध्यांना होणारी इजाही थंडीत अधिक दिसते. व्यायामाच्या वेळी किंवा धावणे, चालणे, मैदानी खेळ खेळणे अशा हालचाली एकदम केल्यास अशी इजा चटकन होऊ शकते. हालचालींपूर्वी ‘वॉर्म अप’ न करणे हे त्याचे कारण असते. पण अशा वॉर्म अपच्या हालचाली आठवणीने केल्या, अगदी रोजच्या दैनंदिन हालचालींना सुरुवात करण्यापूर्वीही वॉर्म अपचे काही व्यायाम केले, तर हालचालींदरम्यान होणारी दुखापत टाळता येईल. वॉर्म अप म्हणजे स्ट्रेचिंग नव्हे. अजिबात हालचाल नसलेल्या स्नायूला एकदम मोठी हालचाल करण्याऐवजी थोडी-थोडी हालचाल देत ती वाढवत नेणे म्हणजे वॉर्म अप.

उपाय काय?
आपण जेव्हा उन्हात उभे असतो किंवा व्यायाम करत असतो, तेव्हा शरीरातील उष्मांकांचे ज्वलन होताना शरीरात कमी वेळात अधिक ऊर्जा निर्माण होते, परिणामी शरीराचे तापमान वाढते. अशा वेळी त्वचेतून घाम बाहेर पडतो आणि त्यासाठी श्रीरातील उष्णता वापरली जाते. त्याच प्रकारे एखादा सांधा किंवा अवयवाचे तापमान कमी झाले की शरीर ते तापमान वाढवण्यासाठी त्या ठिकाणचा रक्तपुरवठा वाढवते. थंडीच्या दिवसात स्नायू आणि सांध्यांच्या वाढलेल्या दुखण्यांवरील महत्त्वाचा उपाय म्हणजे दुखरा सांधा लोकरीच्या कपडय़ात वा ‘नी कॅप’मध्ये गुंडाळावा, त्याला इलेक्ट्रिक हीटिंग पॅडने किंवा गरम पाण्याने शेका. असे करताना त्या जागच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावून रक्तपुरवठा वाढेल आणि तिथे अधिक उष्णता पोहोचवली जाईल. शिवाय आपण शरीराच्या बाहेरूनही त्या दुखऱ्या स्नायूला किंवा सांध्याला शेकत आहोतच. या दोन्हीच्या परिणामांमुळे दुखणे कमी व्हायला मदत होते. स्नायूंमध्येही बाहेर टाकण्याजोगी उत्सर्जित द्रव्ये साठलेली असतात. ती स्नायूमधून बाहेर टाकण्यासाठी रक्तपुरवठाच माध्यम म्हणून काम करतो आणि त्यामुळेही दुखण्याला आराम पडतो.

लक्षणे कोणती?
दुखण्यात झालेली वाढ हे थंडीतल्या स्नायूदुखीचे किंवा सांधेदुखीचे एक लक्षण आहे. दुसरे महत्त्वाचे लक्षण म्हणजे ताठरपणा. सांध्याच्या पृष्ठभागाची अवस्था कितपत चांगली आहे आणि ती हालचाल करणारे स्नायू या दोन गोष्टींवर सांध्यांची हालचाल अवलंबून असते. थंडीत स्नायू मुळातच ताठर असतात. त्यामुळे पुढे सांध्याला ताठरपणा आल्यामुळे हालचालीवर मर्यादा येतात.

दुखरे स्नायू आणि सांधे कोणते?
* सांधे- गुडघे, मनगट आणि हाताची बोटे, पाठ आणि मणक्याचे सांधे.
* स्नायू-पाठीचे मणक्यांभोवतीचे स्नायू, पोटऱ्या.

कर्करोगाचा विळखा
जगामध्ये दरवर्षी नवीन कर्करोगग्रस्त रुग्णांचे निदान : अंदाजे १० लाख.
कर्करोगाने दरवर्षी मृत्यू : सुमारे ६ लाख. (एकूण मृत्यूच्या १२ टक्के)
कर्करोगाच्या एकूण प्रमाणापैकी तंबाखूमुळे होणारा कर्करोग : ३४ टक्के.
तंबाखूमुळे होणाऱ्या कर्करोगाचे भारतातील प्रमाण : ४१ टक्के
जगभरातील तोंडाच्या कर्करोगाचे भारतात रुग्ण : ८६ टक्के
भारतात २० ते २५ वयोगटातील कर्करोगाचे रुग्ण : ६० टक्के.

२०१५ या वर्षांत कर्करोगाचे नवीन रुग्ण : १६,५८,३७०
२०१५ या वर्षांत कर्करोगाने मृत्यू : ५,८९,४३०.

कर्करोगाची कारणे (टक्केवारी)
आहार : ३५
तंबाखू : ३०
आनुवंशिक : ६
विषाणू : ५
कामाचे ठिकाण : ४
मद्यपान : ३
प्रदूषण : ३
डॉ. मिलिंद गांधी, अस्थिरोगतज्ज्ञ
docmilind@gmail.com
(शब्दांकन- संपदा सोवनी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2016 3:36 am

Web Title: pain in winter season
Next Stories
1 सारासार : ध्वनिप्रदूषण म्हणजे नेमके काय?
2 आयुर्मात्रा : घशाच्या तक्रारी
3 उदरभरण नोहे.! भरपूर खा, पौष्टिक खा!
Just Now!
X