17 December 2017

News Flash

पोलिसांचे आरोग्य

सांधेदुखी हा पोलिसांमध्ये आढळणारा एक फार मोठा विकार आहे. सांधेदुखी ही एक प्रकारची वाताची

वैद्य विजय कुलकर्णी | Updated: March 16, 2017 4:40 AM

अत्यंत अनियमित दिनक्रम हे पोलिसांचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. मात्र तरीही आपल्या आरोग्याची काळजी पोलिसांनी घेणे आवश्यक आहे.

सांधेदुखी हा पोलिसांमध्ये आढळणारा एक फार मोठा विकार आहे. सांधेदुखी ही एक प्रकारची वाताची व्याधी आहे. वेळेवर पोषक आहार न मिळणे, अधिक वेळ उपाशी राहावे लागणे, आहारात वातुळ पदार्थाची (वडा-पाव, मिसळ-पाव, इत्यादी) रेलचेल असणे, अतितिखट, खारट खाण्याची सवय, तसेच कोरडे खाणे, अनेक प्रसंगांत होणारे अतिश्रम अशी किती तरी अपथ्ये पोलीस सेवेत असणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत घडत असतात. त्याचा परिणाम म्हणून वाताची अनेक दुखणी निर्माण होतात. त्यात सांधेदुखी, मानेचे दुखणे, कंबर दुखणे, पाय खूप दुखणे यांचा समावेश होतो. पोलिसांना अनेकदा खूप वेळ उभे राहणे सहन करावे लागते. कुठे बंदोबस्तासाठी जाणे, कुठल्या मोर्चाबरोबर तासन्तास चालणे, कैद्यांना कोर्टात हजर करण्यासाठी नेणे, वाहतुकीची व्यवस्था लावण्यासाठी उभे राहावे लागणे, अशी किती तरी कामे पोलिसांना करावी लागतात आणि वाताच्या तक्रारींना निमंत्रण मिळते.

आता कर्तव्यपूर्ती तर करावी लागते, मग होणाऱ्या विकारांना प्रतिबंध कसा करायचा? यावर एक उपाययोजना होऊ शकते, ती म्हणजे रोज आंघोळीपूर्वी फक्त पाच-दहा मिनिटे काढून हाता-पायांना, पाठीला, कमरेला मानेला तेलाचे मालीश करायचे हा निश्चय करून त्याची अंमलबजावणी आग्रहपूर्वक (अगदी प्रवासातही) करावी. याने वाताचे बहुतेक विकार होण्याचे टाळता येते.

प्रतिबंधात्मक उपाय : सातत्याने उभे राहावे लागल्याने, खूप चालावे लागत असल्याने अनेक पोलिसांना सिराग्रंथीचा (Vericose veins) विकार होण्याची शक्यता असते. पायांवर लहान-मोठय़ा निळसर शिरा दिसू लागल्या की या तक्रारीची ही चाहूल आहे, असे समजून वेळीच त्याचा प्रतिबंध करावा. अशुद्ध रक्तवाहिनीच्या झडपामध्ये विकृती झाल्याने हा विकार उद्भवतो. तुपाचा आहारात योग्य वापर करणे, मधूनमधून थोडेसे बसून आराम करणे, पायांना पट्टा बांधणे असे प्रतिबंधक उपाय यावर करता येतात.

श्वसनसंस्थेचे विकार- पोलिसांना अनेकदा वाहनांच्या संपर्कात राहावे लागते, परिणामी प्रदूषणाशी संबंध येतो. यातूनच पुढे पोलिसांना बऱ्याचदा श्वसनसंस्थेचे विकार होण्याची शक्यता असते. त्यामध्ये खोकला, दमा यांचा प्रामुख्याने समावेश होतो. वाहतूक पोलिसांना तर सतत वाहनांच्या धुराला सामोरे जावे लागते. त्यामुळे फुप्फुसाची ताकद कमी होण्याची शक्यता असते. धूर नाकात जाऊ नये यासाठी नाकाचे संरक्षण करणारी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्राणायामसारखे काही दैनंदिन उपक्रमही फुप्फुसाची क्षमता वाढवायला उपयोगी पडतात. योगासनांचाही उपयोग याकामी होऊ शकतो. योगासने-प्राणायामसारखे दैनंदिन उपक्रम करावेत. सूर्यनमस्कारासारखे व्यायाम पोलिसांनी नियमितपणे केले तर सर्वागालाच फायदा होतो.

वैद्य विजय कुलकर्णी

आयुर्वेद चिकित्सक, नाशिक.

First Published on March 16, 2017 4:40 am

Web Title: police health cops health police mental health