15 October 2019

News Flash

मातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य

प्रसूतीपूर्व नैराश्य (पेरीपार्टम डिप्रेशन)

‘‘तुम्ही गृहिणी असा किंवा करिअर वुमन, घर, काम आणि मुलांसाठी द्यावा लागणारा वेळ यांचा समतोल साधणे ही तारेवरची कसरत आहे,’’ या शब्दांत सेरेना विल्यम्स या टेनिस जगतातील सम्राज्ञीने मातृत्वानंतर येणारे नैराश्य (पोस्टपार्टम डिप्रेशन) या आजाराशी झगडत असल्याचे कारण सांगत ‘रॉजर कप हार्ड कोर्ट टुर्नामेंट’मधून माघार घेतली. मातृत्वानंतर येणारे नैराश्य हा नव्याने उद्भवलेला आजार नाही. या घटनेच्या पाश्र्वभूमीवर हा आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणे कोणती, कारणे आणि उपाय यांबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

नव्याने अंगावर पडलेली बाळाची जबाबदारी, बदललेले दैनंदिन आयुष्य, अपुरी झोप, आर्थिक ओढाताण अशा अनेक कारणांमुळे महिलांमध्ये मातृत्वानंतर नैराश्याची लक्षणे दिसतात. मातृत्वानंतरचे नैराश्य हा मानसिक आजार आई आणि वडील या दोघांमध्येही आढळतो. महिलांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे, कारण पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आयुष्यात अधिक प्रमाणात बदल घडतात. मातृत्वानंतरच्या नैराश्याचे प्रसूतीपूर्व नैराश्य (पेरीपार्टम डिप्रेशन), प्रसूतीनंतर येणारे नैराश्य (पोस्टपार्टम डिप्रेशन) आणि पोस्टपार्टम सायकॉसिस असे हे तीन प्रमुख टप्पे आहेत.

प्रसूतीपूर्व नैराश्य (पेरीपार्टम डिप्रेशन)

पेरीपार्टम डिप्रेशनमध्ये महिलेला गर्भधारणा होताच नैराश्य येण्यास सुरुवात होते. विशेष करून बाळाची काळजी घेणे, त्याला सांभाळणे आपल्याला जमेल की नाही, या विचारातून ही चिंता सतावते. योग्य वेळी औषधोपचार केल्याने ही भीती आणि चिंता दूर करणे शक्य असते.

प्रसूतीनंतर येणारे नैराश्य (पोस्टपार्टम डिप्रेशन)

पोस्टपार्टम डिप्रेशनची लक्षणे बाळाच्या जन्मानंतर दिसण्यास सुरुवात होते. बाळाच्या जन्मानंतर सुरू झालेला नवीन दिनक्रम, खाण्यापिण्याचे, झोपेचे बदललेले वेळापत्रक, पुरेशी विश्रांती न होणे अशा प्रकारांतून ही लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. त्याला बेबी ब्लूज असेही म्हणतात. हा या आजाराचा सौम्य भाग आहे. ३० ते ५० टक्के नवजात मातांमध्ये हा प्रकार दिसतो. काळाबरोबर तो कमीसुद्धा होतो. पोस्टपार्टम डिप्रेशन भारतात १५ ते ३० टक्के, काही अभ्यासांप्रमाणे हे प्रमाण २३ ते २७ टक्के असल्याचे सांगण्यात येते.

लक्षणे

सतत उदास वाटणे, पूर्वी आवडणाऱ्या गोष्टी अजिबात न आवडणे, रडायला येणे, सतत मूड खराब होणे, लहान लहान गोष्टींचे वाईट वाटणे ही मातृत्वानंतर येणाऱ्या नैराश्याची लक्षणे आहेत. हार्मोन्समध्ये अचानक होणारे बदल हे यामागचे प्रमुख कारण आहे. इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्ट्रॉन ही हार्मोन्स महत्त्वाची. मानसिकदृष्टय़ा संवेदनशील असलेल्या महिलेला भावनिक आधार नसणे, सामाजिक- आर्थिक प्रश्न, नवऱ्याचे पुरेसे पाठबळ नसणे, नवरा व्यसनी असणे, मुलगा किंवा मुलगी यांबाबत असलेली ठाम इच्छा पूर्ण न होणे आदी कारणांस्तव नैराश्य येते. भांडण, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू यामुळे हा आजार बळावण्याची शक्यता असते. प्रसूतीनंतर कोणताही इतर आजार उद्भवल्यास नैराश्य येणे स्वाभाविक असते. काही वेळा बाळाच्या जन्मानंतर त्याला अतिदक्षता विभागात ठेवले जाते.

अशा परिस्थितीमध्ये बाळाच्या काळजीने किंवा पुरेसे दूध पाजता येत नाही, याचे दडपण आईला येते. कधीकधी बाळासाठी पुरेसे दूध येत नसल्यासही आईमध्ये नैराश्याचा आजार बळावतो.

उपचार

पोस्टपार्टम मानसिक आजारांवर उपचार करणे अत्यावश्यक आहे, कारण योग्य वेळी उपचार न झाल्याने त्या बाळाच्या वाटय़ाला दुर्लक्ष, अवहेलना येण्याची शक्यता असते. अशी लहान मुले पुढे मोठी झाल्यानंतर एकलकोंडी, बुजरी होणे, अभ्यास आणि इतर स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता असते. यावर उपाय म्हणजे नवजात मातांकडे कुटुंबातील नवरा, आई-वडील, सासू-सासरे यांनी पुरेसे लक्ष देणे, त्यांना समजून घेणे आणि पाठिंबा देणे गरजेचे असते. पुरुषांमध्ये आर्थिक ओढाताण, करिअरमधील आव्हाने आणि पत्नीचा पुरेसा वेळ वाटय़ाला न येणे यातून पोस्टपार्टम आजारांची लक्षणे दिसतात. मात्र त्यांचे प्रमाण कमी आहे किंवा ते समोर येत नाही, असे म्हणता येईल. – डॉ. निकेत कासार, मानसोपचारतज्ज्ञ

पोस्टपार्टम सायकॉसिस

पोस्टपार्टम सायकॉसिसमध्ये आईला आलेले नैराश्य हे टोकाचे असते. त्यामुळे ती स्वत:ला किंवा बाळाला इजा पोहोचवण्याचे, काही प्रमाणात आत्महत्या करण्याचे, बाळाला मारण्याचे प्रयत्न करते. बाळ नकोसे वाटणे, त्याला जवळ न घेणे, त्याला स्तनपान करण्याची इच्छा न होणे किंवा काही टोकाच्या प्रसंगी बाळाला फेकून द्यावेसे वाटणे अशी लक्षणे आईमध्ये दिसतात. आपण चांगली आई होऊ  शकत नाही, ही भावना ही त्याचाच एक भाग असते. अशी लक्षणे दिसून येणाऱ्या महिलांनी त्वरित मानसोपचारतज्ज्ञांना भेटून उपचार सुरू करणे गरजेचे आहे. या आजारामध्ये काही विशिष्ट औषधांचे उपचार देत असल्यास बाळाला स्तनपान करणे बंद करावे लागते, पण या औषधोपचारांचे कोणतेही गंभीर परिणाम होत नाहीत. तेव्हा प्रसूतीच्या काळात किंवा बाळाचे संगोपन करताना येणाऱ्या मानसिक तणावाकडे दुर्लक्ष केले जाते. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये खचून न जाता तात्काळ उपचार घेऊन पूर्ववत आयुष्य जगणे शक्य आहे हे प्रत्येक महिलेने लक्षात घ्यायला हवे.

(शब्दांकन: भक्ती बिसुरे)

First Published on October 23, 2018 12:34 am

Web Title: postpartum depression