|| वैद्य विजय कुलकर्णी

लहान मुला-मुलींनी विद्यार्थिदशेत व्यायाम का करावा, असा प्रश्न अनेक पालकांना भेडसावत असतो. आपल्या पाल्याने गुटगटीत व्हावे असे प्रत्येक पालकाला वाटणे स्वाभाविक आहे. त्यादृष्टीने काही पालक मुलांकडून भरपूर व्यायाम करवून घेतात. पण वैद्यकीयदृष्टय़ा परिश्रम होतील, अशा प्रकारचे व्यायाम विद्यार्थिदशेतच करणे हिताचे नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

काही वेळा स्नायू बळकट व्हावे, यासाठी अनेक मुले जोर बैठकांच्या नादात रंगतात. व्यायामशाळेतील कोणातरी पहिलवानाला त्यांनी पाहिलेले असते आणि त्यांच्यासारखी आपली शरीरयष्टी व्हावी, असे त्यांना वाटत असते. परंतु बालपणीच त्या पहिलवानासारखे व्यायाम करणे शरीराला परवडण्यासारखे नाही हे ध्यानात घ्यावे. काही लहान मुलांना तर ‘सिंगल बार’, ‘डबल बार’ या व्यायाम प्रकारांचे खूप आकर्षण असते. हेदेखील वयाला अनुसरून योग्य नाही. चौथीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांने जर ‘डबल बार’ मारायला सुरुवात केली तर कसे चालेल?

कोणते व्यायाम कराल ?

मग विद्यार्थ्यांनी व्यायामच करू नये का? तर असे नाही. व्यायाम जरूर करावा पण तो सोसणारा असावा. त्या दृष्टीने शाळेमध्ये होणारे ‘पी. टी.’चे व्यायाम चांगले आहेत. शाळांमध्ये त्याच दृष्टिकोनातून या व्यायामांचे आयोजन केले जाते. पण विद्यार्थी मात्र त्याकडे शाळेचा एक तास एवढय़ाच दृष्टीने पाहतात. आपल्याला आपल्या शरीरासाठी याचा चांगला उपयोग करून घ्यायचा आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून हा पी. टी.चा व्यायाम प्रत्येक विद्यार्थ्यांने रोज करावा. यामुळे शरीर लवचीक बनते. शरीराची कार्यक्षमता वाढते. स्नायूंना बल मिळते.

‘सूर्यनमस्कार’ हादेखील एक उत्तम व्यायाम प्रकार होय. यामध्ये एकूण दहा प्रकारची आसने आहेत. या व्यायाम प्रकारामुळे शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित होते. उंची वाढण्यासाठी मदत होते. शक्यतो आठवी इयत्तेच्या पुढील विद्यार्थ्यांनी या सूर्यनमस्काराचा व्यायाम करावा. मुलींनी काही आसन प्रकार अभ्यासावेत. तज्ज्ञांच्या साहाय्याने ती आसने शिकून घ्यावीत. रोज कबड्डीसारखे मैदानी खेळ खेळणे हादेखील शरीराला एक प्रकारचा व्यायामच आहे. फक्त तो नियमित करायला हवा. मैदानावर पळणे हाही एक चांगला व्यायामप्रकार आहे. मुलांना आणि मुलींकडून वेगवेगळे व्यायाम प्रकार करून घेतले जावेत.

रोज संध्याकाळी अशा प्रकारचे खेळ खेळणे हा एक चांगला व्यायाम होय. हल्ली दूरचित्रवाणी, भ्रमणध्वनीच्या प्रभावामुळे मुले क्रीडांगणावर फार कमी दिसतात. काही विद्यार्थी निरनिराळ्या शिकवणी वर्गामध्ये संध्याकाळच्या वेळेत गुंतलेले असतात. त्यामुळे विटी दांडू, सूर पारंब्या, पकडापकडी असे खेळ खेळण्याला प्राधान्य दिले जात नाही. विद्यार्थ्यांसह पालकांनी याबाबत योग्य तऱ्हेने जागरूकपणे विचार करणे आवश्यक आहे.

आरोग्यासाठी फायदे

नियमित व्यायाम केले तर शरीरासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर असते. साधारणपणे वयाच्या दहाव्या-बाराव्या वर्षांनंतर व्यायाम करायला हरकत नाही. सूर्यनमस्कारासारखा व्यायाम हा आदर्श व्यायाम आहे. अशा प्रकारच्या व्यायामाने शरीर हलके होते. तसेच शरीरात ऊर्जा येते आणि काम करण्याची क्षमता वाढते. शरीरातील अग्नी प्रज्ज्वलित होतो, म्हणजेच पचनशक्ती वाढते. भूक वेळेवर लागते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचेही नीट पचन होऊन प्रकृती चांगली राहण्यास मदत होते. व्यायाम केल्यामुळे शरीरात वाजवीपेक्षा जास्त चरबी साठत नाही. त्यामुळे शरीर सुडौल राहण्यास मदत होते. बांधा उत्तम राहतो. मध्यम बांध्याचे आणि योग्य प्रकृतीसाठी व्यायाम करणे उत्तम. व्यायामाचा आणखी एक फायदा म्हणजे स्नायू बळकट होतात. अवयव शिथील होत नाहीत आणि एक प्रकारचा घट्टपणा स्नायू पेशींमध्ये येतो. हल्ली ‘जिम’मध्ये म्हणजेच व्यायामशाळेमध्ये जाऊन व्यायाम करण्याची प्रवृत्ती वाढते आहे. लहान मुलांनी ‘जिम’मध्ये जाऊन व्यायाम करण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी घरीच सूर्यनमस्कारासारखा व्यायाम करावा. त्यासाठी खूप कमी जागा लागते. बाहेरच्या वातावरणात असे व्यायाम केल्यास चांगलाच उपयोग होतो. व्यायाम हा अर्धशक्ती करावा, असे आयुर्वेदशास्त्रात नमूद केले आहे. म्हणजे कपाळाला घाम आला की व्यायाम थांबवावा अशा प्रकारे व्यायामाबद्दल नियम पाळले तर त्यामुळे आपले आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.

दक्षता

व्यायाम करण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी काहीही खाऊ नये. खाल्ल्यावर लगेच व्यायाम केल्यास शरीराला अतिशय त्रासदायक ठरू शकते. योग्य त्या प्रमाणात आणि नियमित व्यायाम करावा. प्रत्येक विद्यार्थ्यांने त्याच्या वयानुसार व्यायामाचा प्रकार ठरवावा. सकाळच्या वेळी केलेला व्यायाम हा अधिक फायदेशीर ठरतो. हिवाळा हा ऋतू व्यायामाला अतिशय पोषक आहे. अर्थात आसने ही तिन्ही ऋतूंमध्ये करावीत. खूप घाम निघेल अशा प्रकारचा व्यायाम विद्यार्थ्यांनी करणे टाळावे.

ayurvijay7@gmail.com