पूर्वी लहान मुलांमध्ये टाइप-१ मधुमेह आढळत असला तरी हल्ली बदलल्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे लहान मुलांमध्येही टाइप-२ मधुमेह आढळत आहे. पूर्वी विकसित देशांसह भारतात प्रामुख्याने शहरी भागात हे रुग्ण दिसायचे. आता मात्र ग्रामीण भागातही रुग्णसंख्या वाढत असल्याचे आढळते.
आपण जे खातो त्यातील स्निग्ध पदार्थ आणि पिष्टमय पदार्थाचे पचन होऊन शरीरात साखर तयार होते. जठराच्या मागे असलेली ‘पॅनक्रिया’ नावाची ग्रंथी इन्शुलिन नावाचे संप्रेरक तयार करते. हे इन्शुलिन रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवते. पण काही कारणांमुळे इन्शुलिनच तयार होत नसेल तर रक्तात साखरेचे प्रमाण वाढते. यालाच टाइप-१ मधुमेह म्हणतात. पण इन्शुलिन तयार होण्याचे प्रमाण कमी झाले असेल किंवा या इन्शुलिनला पेशी काही कारणाने प्रतिसाद देत नसतील आणि त्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढत असेल तर याला टाइप- २ मधुमेह म्हणतात.

लक्षणे
वारंवार तहान-भूक लागणे, लघवी लागणे, वजन कमी होणे, थकवा जाणवणे, अंधूक दिसणे, चिडचिड होणे व स्वभावात बदल होणे, शरीरात घाम येण्याच्या ठिकाणी खाज येणे, श्वासोच्छ्वासाला गोड वास येणे, उलटीची भावना होणे व पोट दुखणे, हाता-पायाला मार लागल्यानंतर जखम चिघळणे.
मधुमेह होण्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरू शकतात. त्यातील काही पुढीलप्रमाणे –
* मधुमेह हा आनुवंशिक असू शकतो.
* काही विशिष्ट विषाणूंच्या प्रादुर्भावानेही मधुमेह होऊ शकतो.
* ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण शरीरात कमी झाल्यास.
* बाळाला वेळेनुरूप पूरक आहार सुरू करण्याची पद्धत वा वेळ चुकल्यास.
* पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्यास.
कोणत्या बालकांमध्ये मधुमेहाची शक्यता अधिक?
* वजन जास्त असेल (बॉडी मास्क इंडेक्स २६ हून जास्त असल्यास.)
* घरात आईवडील, बहीणभावापैकी कुणाला मधुमेह असल्यास.
* रक्तदाब, कोलेस्टेरॉल जास्त असल्यास.
* मुलींमध्ये पॉलिस्ट्रॉल हे संप्रेरक जास्त असल्यास.
* मुलींमध्ये ‘पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम’ असेल तर मधुमेहाच्या दृष्टीने लक्ष ठेवणे गरजेचे.

Clean Intestine In 20 Minutes In Morning With These Simple Five Asanas How Much Luke Warm Water To Drink First After Waking Up
Video: सकाळी उठताच १५ मिनिटांत पोट स्वच्छ होण्यासाठी करा ‘या’ पाच कृती; कोमट पाणी पिण्याचं प्रमाणही पाहा
origin of vangyache bharit history of brinjal bharta information you need to know
‘वांग्याचं भरीत’ हा पदार्थ नेमका आला कुठून? कसा तयार झाला हा शब्द? जाणून घ्या रंजक गोष्ट
People with diabetes Can Eat roasted or baked snacks Is this safe for blood sugar patients Need To Know What To Eat
मधुमेही रुग्णांनी ‘या’ पदार्थाचे सेवन केल्यास नियंत्रित राहील रक्तातील साखर; वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Jugaad Video: एक्सपायर औषध गोळ्यांचा स्वयंपाकघरातील ‘या’ कामासाठी वापर करुन पाहा; २ मिनिटांतच चकीत करणारा परिणाम

तपासण्या कोणत्या?
* उपाशीपोटी रक्तातील साखर तपासणी, आठ तास उपाशीपोटी राहिल्यानंतर ही तपासणी केली जाते.
* ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट- यात विशिष्ट प्रमाणात साखर खायला देऊन २ तासांनी रक्तातील साखर तपासण्यात येते.
* ‘हिमोग्लोबिन ए-१ सी’ चाचणी- ही महत्त्वाची व आधुनिक तपासणी असून त्यात मागील ३-४ महिन्यांतील रुग्णाच्या रक्तातील साखरेची माहिती कळते.

उपचार
* टाइप-१ मधुमेहात इन्शुलिनचे इंजेक्शन द्यावे लागते.
* टाइप-२ मधुमेहात औषध द्यावे लागते, पण कधी कधी इन्शुलिनची गरज पडू शकते.
* औषधोपचारांबरोबर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे गरजेचे.
* खाण्याच्या सवयी आरोग्यदायी हव्यात. मुलांच्या खाण्यात वेगवेगळ्या प्रकारची फळे, ताज्या हिरव्या भाज्या, कडधान्ये असायला हवीत, भरपूर स्निग्ध पदार्थ असलेल्या तेल, तूप, मिठाई अशा गोष्टी टाळलेल्या बऱ्या.
* शारीरिक व्यायाम गरजेचा. अर्थात नव्याने व्यायाम करताना रक्तातील साखरेवर नियंत्रण राहण्याच्या दृष्टीने वैद्यकीय सल्ल्यानेच व्यायाम सुरू करावा.
* मूल आजारी असेल तेव्हा किंवा ज्या वयात मुलामुलींची वाढ झपाटय़ाने होते अशा काळात रक्तातील साखरेचे नियमन तंतोतंत पाळणे आवश्यक आहे.

मधुमेहात योग्य काळजी व औषधोपचार न घेतल्यास संभावणाऱ्या गुंतागुंती –
* मधुमेहामुळे छातीत दुखणे, हृदयविकाराचा झटका, पक्षाघाताचा झटका, रक्तदाब, रक्तवाहिन्यांच्या आवरणाची जाडी वाढणे अशा गुंतागुंती संभवू शकतात.
* मधुमेहामुळे मूत्रपिंड निकामी झाल्यास डायलिसिस किंवा मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज पडू शकते.
* रुग्णाला मधुमेहामुळे आंधळेपणा, मोतिबिंदू, काचबिंदू होऊ शकतो.
* मधुमेहग्रस्ताच्या पायाला इजा झाल्यास ती जखम चिघळू शकते. बऱ्याचदा रुग्णांकडून उपचाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पायही गमवावा लागू शकतो.
* त्वचेवर खाज येणे, बुरशीचे आजार, जिवाणू वा जंतुसंसर्ग होऊ शकतो.
* हाडे ठिसूळ होऊ शकतात.

आजारावर नियंत्रणाकरिता –
* मुलांच्या वजनासह आहार व व्यायामाकडे लक्ष देणे.
* वेळीच निदान करून उपचार केल्यास संभाव्य धोके टाळता येतात.

महत्त्वाचे
मधुमेहात साखरेचे प्रमाण कमी किंवा जास्त होणे अशा दोन्ही वेळी त्रास होऊ शकतो आणि दुर्लक्ष झाल्यास तो घातक ठरण्याचीही शक्यता असते. त्यामुळे अशा वेळी वेळीच वैद्यकीय मदत घेणे आणि विशेष काळजी घेणे गरजेचे.
साखरेचे प्रमाण कमी झाल्यास दिसणारी लक्षणे –
* घाम येणे, थरथरणे, गुंगीत राहणे, चक्कर येणे, चिडचिड होणे, डोके दुखणे, स्वभावात बदल, संभ्रमात राहणे, शुद्ध हरपणे (रुग्ण कोमात जाणे)
साखरेचे प्रमाण जास्त आढळल्यास –
* वारंवार लघवीला जाणे, तहान जास्त लागणे, तोंड सुजणे, अंधूक दिसणे, थकवा व उलटीसारखे वाटणे, शरीराच्या घाम येणाऱ्या ठिकाणी खाज येणे.
(शब्दांकन- महेश बोकडे)
डॉ. अविनाश गावंडे