13 December 2018

News Flash

स्वीकार – उपचारांची पहिली पायरी

डॉक्टरांनी मानसोपचारतज्ज्ञांकडे जायला सांगितले आहे

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

‘अरे मोहन, बघ ना माझ्या मनीषला आमच्या डॉक्टरांनी मानसोपचारतज्ज्ञांकडे जायला सांगितले आहे. तो अरे स्वत:शीच बडबडत असतो, हसत असतो, झोपत नाही, कॉलेजला जात नाही, चिडतो, तोडफोड करतो, कधीतरी तर ते म्हणतात की त्याला मानसिक आजार ‘सायकोसिस’ का काय तो झालाय.’

‘हे बघ, पटतंय का, हे बघ ती औषधे एकदा सुरू झाली ना की आयुष्यभर चिकटतात असं मी ऐकलंय. त्याऐवजी मला काय वाटतं की अरे एखादवेळेस बाहेरची बाधा असेल, किंवा ग्रहदशा वाईट असेल तर त्याला भगताकडे घेऊन जा किंवा ज्योतिषाचा सल्ला घे.’

तर अशा प्रकारे अनेक वडील, नातेवाईक आपल्या रुग्णाला बाबा, भगत, मंदिर, दर्गे, ज्योतिषी यांच्याकडे घेऊन जातात. नारायण नागबळी, कालसर्पदोष घालवण्यासाठी लाखावर खर्च करतात आणि मग औषधोपचारांसाठी त्यांच्याकडे पैसेच शिल्लक राहिलेले नसतात. मध्यंतरी माझ्या एका रुग्णाचे (जी बरी झाली, नोकरी करू लागली) वडील मला सांगत होते, ‘डॉक्टर खरंच आता असं वाटतंय, उगीच आम्ही सहा महिने आणि दोन लाख नको त्या गोष्टीत (भगत, पूजा वगैरे) वाया घालवले, आधीच आलो असतो तुमच्याकडे तर आधीच, लवकर बरी झाली असती माझी पोर!’

तर काही वेळा, ‘डॉक्टर मला कळत होतं की मला डिप्रेशन आलंय, पण वाटलं की होईल बरं, आणि मी काय वेडा आहे का? कोणी मला तिथे बघितलं तर काय म्हणेल, या भीतीने किंवा लाजेखातर मी येण्याचे टाळले, त्यामुळे माझाच आजार वाढला.’ असे काही जण असतात की या भीती किंवा लाजेपोटी ते उपचार टाळतात किंवा आजार अंगावर काढत राहतात.

माझ्याकडे एक रुग्ण नियमित यायची, पण अचानक येईनाशी झाली. नंतर मला ती वाटतं कुठे भेटली तेव्हा कावरीबावरी होत (कदाचित मानसोपचारतज्ज्ञ भेटल्याने पण असेल) म्हणाली की, ‘डॉक्टर, आमच्या ओळखीचे एक जण तिथे यायला लागले, मग मी उपचार थांबवले. तशी बरी आहे मी आता, तुमचीच औषधं मधूनमधून घेते, त्रास झाला की!’  काय बोलणार मी यावर? म्हणजे लाजेपोटी तिने उपचारमध्येच थांबवले, पूर्ण बरं वाटायच्या आतच.

काही रुग्ण तर उपचार सुरू करतात आणि मध्येच गायब होतात. आजार वाढवून परत येतात, कारण विचारले तर सांगतात, ‘आम्ही त्याला गावाला नेऊन ठेवले, म्हटले की तिकडे नेले की त्या हवेत चार माणसात तो बरा होईल. चार दिवस होता बरा, पण वाढतच गेला हो त्याचा विकार. मग आता आणलंय तुमच्याकडे! घ्या पदरात आणि बरं करा.’ गावाला नेणं, हवापालटामुळे मानसिक आजार बरे होतात, असा एक गोड गैरसमज किंवा वरील अंधश्रद्धा, लाज, भीतीपोटी काढलेला मध्यम मार्ग हा आडमार्ग असतो. त्यामुळे आजार बरा होण्याऐवजी बळावतो. तर असे अनेक प्रकारचे अडथळे येत असतात. कित्येक वेळा रुग्ण सांगतात, ‘डॉक्टर, अहो मला छातीत धडधडतं, घाम येतो, चक्कर येते, झोप येत नाही, भीती वाटत राहते, किती वेळा ईसीजी काढला, टेस्ट केल्या, डॉक्टरांनी दिलेली झोपेची गोळी इतके दिवस घेत होतो, पण त्याचा आता काहीच उपयोग होत नाही म्हणून तुमच्याकडे येणार होतो, पण म्हटले येते झोप मग कशाला, नाही तरी तुम्ही झोपेचीच औषध देणार ना!’

अशा अनेक गैरसमजुतींनी मानसिक आजारावरचे उपचार लांबणीवर पडतात किंवा नीट घेतले जात नाहीत. पण वेळेवर उपचार घेतले व नियमित घेतले, विश्वासाने घेतले तर कितीतरी चिंता, नैराश्यासारखे विकार, ब्रीफ सायकोसिससारखे विकार हे पूर्ण बरेदेखील होऊ  शकतात.

स्वीकार या पातळीवरच गाडी कितीतरी काळ खोळंबते किंवा अगदी अडखळत जाते. त्यामुळे विकार बळावतो, उपचारांचा काळ लांबतो व पुन्हा म्हणायला सर्व मोकळे असतात, बघा म्हटलं नव्हतं खूप काळ उपचार घ्यावे लागतात. त्यामुळे स्वीकाराचं स्टेशन लवकर ओलांडलं तर गाडी विश्वासाच्या स्थानकावर लगेच पोचते व पुढचा प्रवास लवकर व छान आटोपू शकतो.

आजाराची लक्षणं नाहीशी झाली तरी ताप, सर्दीसारखी ही औषधं, उपचार लगेच बंद करायचे नसतात. तर काही काळ तोच डोस चालू ठेवून मग कमीकमी करून औषधं व उपचार बंद करायचे असतात. काही वेळा आजार सुरू झाल्यानंतर किती काळाने उपचार सुरू झाले यावर ते गणित अवलंबून असते. त्यामुळे गैरसमज बाजूला ठेवून आजाराचा स्वीकार लवकर केला व विश्वासाने उपचार घेतले तर नक्कीच फरक पडू शकतो. हा मंत्र लक्षात ठेवू या.

-डॉ. अद्वैत पाध्ये

Adwaitpadhye1972@gmail.com

First Published on January 2, 2018 1:38 am

Web Title: psychological treatment for depression