News Flash

पिंपळपान : कोहळा

आपण केव्हा न केव्हा कोहळ्याच्या ताज्या वडय़ांचा आस्वाद नक्कीच घेतला असेल.

आपण केव्हा न केव्हा कोहळ्याच्या ताज्या वडय़ांचा आस्वाद नक्कीच घेतला असेल.

‘‘मूत्राघातहरं प्रमेहशमनं कृच्छ्राश्मरीच्छेदनं विण्मूत्रग्लपनं तृषार्तिशमनं

जीर्णाङ्गपुष्टिप्रदम्। वृष्यं स्वादुतरं त्वरोचकहरं बल्यंच पित्तावहं

कुष्माण्डं प्रवरं वदान्ति भिषजो

वल्लीफलानां पुन:’’ (रा. नि.)

आपण केव्हा न केव्हा कोहळ्याच्या ताज्या वडय़ांचा आस्वाद नक्कीच घेतला असेल. असा कोहळा भारतात सर्वत्र होतो. तो भाजीपेक्षा त्याच्या ‘पेठा’ या नावासाठी खूप प्रसिद्ध आहे. कोणी पर्यटक मथुरेला जर कधी गेलो तर हटकून तेथून पेठा घेऊन येणारच. साधा पेठा, गुलाबजलयुक्त पेठा, सोने-चांदी वर्ख लावलेला पेठा असे विविध प्रकार मथुरेच्या बाजारात खवय्यांची वाट पाहत असतात.

कुष्माण्ड, वल्लीफल (संस्कृत), पेठा (पंजाबी), कुम्हडा, पेठा (हिंदी), कुमडा (बंगाली), पेठो सावो (सिंधी), दुब (फारसी व पर्शियन) अशी कोहळ्याची विविध नावे आहेत. भाजी म्हणून कोहळा कोवळा जरी चालत असला, तरी उत्तम औषधी गुणधर्म हवे असल्यास एक वर्षांचा जुना, भरपूर जाड साल असलेला आणि खूप बियांचाच कोहळा वापरावा. जी मंडळी शरीराने खूप कृश व बारीक आहेत आणि ज्यांना प्रकृती सुधारण्यासाठी विविध औषधे नकोशी वाटतात, त्यांनी कुष्मांडपाक या सायरपचा अवश्य ‘सहारा’ घ्यावा. कोहळा बल्य, पौष्टिक, शीतल, मूत्रजनन, रक्तसंग्राहक, शमन आणि रक्तपित्तप्रशमन आहे. याने रक्तवाहिन्यांचे संकोचन होते आणि रक्तभिसरणात शांतता येते. मोठय़ा मात्रेत घेतल्याने शौचास साफ होते व झोप येते. बिया कृमिघ्न आहेत.

उन्मादरोगांत रोग्याचे डोळे लाल झालेले असताना, नाडी फार चालते आणि रोगी बेफाम असतो, तेव्हा कोहळ्याचा रस देतात. त्याने शौचास साफ होऊन झोप लागते. कोहळ्याच्या रसाबरोबर कोरफडीचा रस, वेखंड व ब्राह्मी मिसळल्यास चालते. राजयक्ष्म्यांत केव्हा फुप्फुसावाटे रक्तस्राव होतो, तेव्हा कोहळ्याचा रस देतात. या रोगाच्या प्रथमावस्थेत मौक्तिक भस्माबरोबर ताजा रस देतात आणि त्याने फार फायदा होतो. मधुमेहात याचा रस देतात. शरीरातील कोणत्याही इंद्रियापासून रक्तस्राव होत असेल तर तो बंद करण्यास याच्या रसाचा उपयोग होतो. अर्शरोगांत कोहळ्याचा पाक देतात.

आपल्या शरीरातील सात धातूंपैकी आद्यधातू, रसधातू जेव्हा क्षीण होतो, तेव्हा संबंधित व्यक्तीला अनेकानेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शरीराच्या वजनात वाढ होत नाही, त्वचेवर सुरकुत्या येतात. थोर ग्रंथकारांनी ‘रसे रौक्षं श्रम शोषो ग्लानिशब्दासहिष्णुता’ असे रसक्षयाचे परिणाम सांगितले आहेत. एखाद्या कृश व्यक्तीला दुसऱ्या माणसाचा एखादा शब्दही सहन होत नाही, अशी व्यथा आपण नित्य अनुभवतो. दिवसेंदिवस शहरी भागात पुरुषांमध्ये नपुंसकतेचे वाढते प्रमाण आहे. त्याच्या निवारणासाठी सुवर्ण रौप्य शिलाजीत अशी महागडी औषधे घेण्यापेक्षा कृष्मांडपाक नेटाने घ्यावा आणि ‘कुटुंबाचे’ समाधान करावे. हरी परशुराम औषधालयाच्या विविध औषधांपैकी कृष्मांडपाक, धात्री रसायन व हिम्मतवटी या औषधांमध्ये जून कोहळ्याचा आवर्जून वापर केलेला आहे.

वैद्य प. य. वैद्य खडीवाले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 3:32 am

Web Title: pumpkin use in medicine
Next Stories
1 जंक फूड बाहेरचे अन् घरातले!
2 पिंपळपान : एरंड
3 बाल आरोग्य : गॅस्ट्रोचा संसर्ग
Just Now!
X