21 January 2019

News Flash

पिंपळपान : बांबू

बांबूच्या बियांना संस्कृतमध्ये वेणुयव, वंशतण्डुल आणि वेणुज नावाने संबोधले जाते.

बांबू

‘वंशस्तु शीतल: स्वादु: कषायो बस्तिशोधन:। छेदन: कफपित्तास्त्र कुष्ठ शोथव्रणायह:

तछ्याावास्तु सरारूक्षा: कषाया: कटुपाकिन:। उष्णा पित्तानिलकराबद्धमूत्रा: कफापहाश’

गोकुळातील खटय़ाळ कृष्णाच्या सोळा हजार गोपिकांबरोबरच्या रासक्रीडा आणि त्या रासक्रीडेतील श्रीकृष्णाच्या बासरीवादनाच्या खूप कथा भक्तिभावाने सांगितल्या जातात आणि ऐकल्या जातात. भारतीय संगीत परंपरेतील थोर गायक, आपल्या गायिकेच्या तपश्चर्येसारख्या अभ्यासाला सुरुवात करताना बांबूच्याच बासरीची निवड करतात. वंश (संस्कृत), बांस (हिंदी, बंगाली), कळक (कोंकणी), बँबू (इंग्रजी), मगर (पंजाबी) अशा नावांनी ओळखली जाणारी बांबूची वने एकेकाळ लहानमोठय़ा गावांच्या सीमेवर खूप मोठी शोभा देत असत. आपल्या भारतात आता अशी वने जवळपास नष्टप्राय होत आलेली आहेत. पण समस्त मानववंशाच्या आरोग्यहितार्थ अजूनही पूर्व दक्षिण आशियात, जावा, सुमात्रा, इंडोनिशिया, इंडोचायना-व्हिएतनाम या देशात मोठय़ा प्रमाणावर बांबूची वने आहेत. ही वने जवळपास ५० वर्षे जुनी आहेत, असे आमचे मित्र इमारत लाकूड तज्ज्ञ राकृष्ण सोमय्या सांगतात. सहसा बांबूच्या वृक्षांना फुले येत नसतात. पण क्वचित बांबूच्या झाडांना जर फुले आली तर तिथे दुष्काळाची अवकळा लवकरच येणार आहे, अशी ग्रामीण भागात समजूत आहे.

बांबूच्या बियांना संस्कृतमध्ये वेणुयव, वंशतण्डुल आणि वेणुज नावाने संबोधले जाते. बांबूचे कोवळ अंकुर, बिया आणि मुळाकडच्या पेरात जमलेली एक विशिष्ट प्रकारची माती औषधांत वापरली जाते. पण या सर्वापेक्षा स्त्री जातीच्या बांबूत एक प्रकारचा ‘मद’ जमत असतो. त्याला ‘वंशलोचन’ असे म्हणतात. भारतातील विविध बांबूंना असे वंशलोचन अजिबात नसते. कारण असा बांबूचा माज-वंशलोचन बांबूच्या झाडात जमायला किमान २५ ते ३० वर्षे तरी लागतात. बाजारात वंशलोचन या नावाने मिळणारा पदार्थ जवळपास ९९ टक्के बनावट असतो. भारतीय औषधी बाजारातील एक विलक्षण गमतीची गोष्ट अशी की नकली वंशलोचनाचेही क्रमांक १, २, ३ असे प्रकार उघडपण विकले जातात.

खऱ्या वंशलोचनात चुन्याचे खडे मिसळतात. दगडी पाटीवर असे वंशलोचन घासल्यास पांढरी रेघ उमटते. ज्यावर निळी झाक असते आणि लाकडावर घासले असता काही खुणा उमटत नाही, तो खरा वंशलोचन. बनावट वंशलोचन बोटाने दाबल्यास त्याचे सहज पीठ होते. खऱ्या वंशलोचनाने प्राणवहस्रोतसाच्या फुप्फुसाच्या त्वचेस बळ येते. त्यामुळे फाजील कफ होण्याची क्रिया थांबते. सितोपलादिचूर्ण या औषधात अस्सल वंशलोचन चतुर्थाश प्रमाणात असते. ह. प. औषधालयाच्या सितोपलादि चूर्ण, सुवर्णमाक्षिकादि वटी, अभ्रकमिश्रण वटी, चंद्रप्रभा, च्यवनप्राश, धात्री रसायन, अश्वगंधापाक अशा विविध औषधांत अस्सल वंशलोचन चूर्णाचा मोठा सहभाग आहे.

– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

First Published on March 27, 2018 1:43 am

Web Title: qualities and benefits of bamboo according to ayurveda