News Flash

समुद्रातील निळा रंग दुर्मिळ होणार?

समुद्रातील अन्नसाखळीचा पाया असलेल्या या प्लॅक्टॉनचा परिणाम समुद्रातील जीवांवर तर होत आहेच.

फायटोप्लॅक्टॉनमुळे निळ्या प्रकाशात उजळून निघालेला किनारा हा समुद्रअभ्यासकांसाठी सर्वसामान्य घटना असली तरी समुद्राच्या वाढत्या तापमानामुळे जगभरात कमी होत जाणारी प्लॅक्टॉनची संख्या हा चिंतेचा विषय आहे. समुद्रातील अन्नसाखळीचा पाया असलेल्या या प्लॅक्टॉनचा परिणाम समुद्रातील जीवांवर तर होत आहेच, पण गेल्या दशकांमध्ये माशांच्या घटलेल्या संख्येद्वारे आपल्यापर्यंतही पोहोचत आहे.

निसर्गात अनेक गोष्टी घडत असतात. आपण मात्र आपल्या चौकटीपलीकडे फारसे पाहत नाही. त्यामुळे मधूनच एखादी घटना समोर आली तर ती आपल्याला अद्भुत वाटते. थोडी चौकशी केल्यावर कळते, की ही तर सर्वसामान्य घटना आहे. मुंबईच्या जुहू-वर्सोवा किनाऱ्यावरील पाण्याचा रंग निळ्या प्रकाशाने चमकत असल्याचे छायाचित्र झळकले तेव्हाही अशीच काहींची प्रतिक्रिया होती. मुंबईच्या किनाऱ्यावर असे काही घडले आहे, हे पाहण्यासाठीही अनेकांनी गर्दी केली होती. मात्र या प्रकारचे पाणी अनेकदा दिसते हे कोळीबांधवच अनेकदा सांगतात. एक दोन किलोमीटरच्या क्षेत्रात काही दिवसांपुरती दिसणारी ही निळ्या प्रकाशाची छटा आजपर्यंत फारशी प्रकाशात आली नव्हती. मात्र या निळ्या प्रकाशकिरणांचा जरा खोलात शोध घेतला तर पृथ्वीची दोनतृतीयांश जागा व्यापणाऱ्या महासागरात नेमक्या काय काय घडामोडी घडत असतात त्याचा छोटासा अंश आपल्याला समजतो.

जुहू किनाऱ्यावर पाण्यात दिसत असलेल्या निळ्या प्रकाशाला कारण ठरलेत ते नॉक्टिल्युका फायटोप्लॅक्टॉन. त्यांच्या प्रकाशामुळे त्यांना ‘सी स्पार्कल’ म्हणूनही ओळखले जाते. वनस्पतीसदृश्य एकपेशीय असलेल्या या जीवांना खरेतर प्राणी, वनस्पती किंवा बुरशीच्या गटामध्येही बसवता येत नाही. मात्र हे जीव समुद्रातील अब्जावधी जीवांचा मूलभूत स्रोत आहेत. सूर्याच्या प्रकाशाचे प्राण्यांना वापरता येईल अशा ऊर्जेत रूपांतर करण्याच्या त्यांच्या वनस्पतीसारख्या क्षमतेमुळे त्यांना महासागराच्या अन्नसाखळीत पायाभूत स्थान मिळाले आहे. एकपेशी असलेले हे जीव डोळ्यांना दिसणे अवघडच. एक सेंटीमीटर लांबी, रुंदी, उंची असलेल्या जागेत करोडो फायटोप्लॅक्टॉन सामावले जातात. सूर्यप्रकाश पोहोचू शकेल आणि जमिनीतील नायट्रेट्स, फॉस्फरस, सिलीकेट्ंसचाही उपयोग करता येईल अशा ठिकाणी प्लॅक्टॉन वाढण्यास सुरुवात होते. त्यामुळे किनाऱ्याजवळच्या उथळ भागात प्लॅक्टॉन वाढतातच; पण सूर्यप्रकाश किरणे पोहोचत असतील तर समुद्रात १२० मीटर खोलपर्यंतही हे जीव सहज आढळतात. आपल्याकडे जुहूच्या किनाऱ्यावर ते दिसण्याचे कारण म्हणजे समुद्रात सोडले जाणारे सांडपाणी. या सांडपाण्यात साबणातील फॉस्पेट मोठय़ा प्रमाणावर असते. नायट्रेट्स आणि फॉस्फेट व जोडीला सूर्यप्रकाश यामुळे तेथे फायटोप्लॅक्टॉन वाढले असल्याची शक्यता सागरी जीवांचे अभ्यासक डॉ. विनय देशमुख यांनी व्यक्त केली. मात्र हे फायटोप्लॅक्टॉन अरबी समुद्रात भरपूर प्रमाणात दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. किनाऱ्यावर लहान परिसरात ते अनेकदा नजरेस पडतात. मात्र त्यांची फारशी दखल घेतली जात नाही. या एकपेशी जीवांमध्ये असलेल्या क्लोरोफिलमुळे ते पाण्याच्या पृष्ठभागावर चमकतात.

अर्थात ही नवलाई आपल्याला वाटत असली तरी जगभरात या प्लॅक्टॉनवर भरपूर संशोधन झाले आहे. यावर संशोधन करण्याचे कारण म्हणजे समुद्रातील अन्नसाखळीचा पाया या प्लॅक्टॉननी तयार झाला आहे. लहान मासे या प्लक्टॉनवर जगतात. मोठे मासे अन्नासाठी लहान माशांवर किंवा थेट या प्लॅक्टॉनवर अवलंबून असतात. अन्न आणि लपण्यासाठी जागा पुरवणारे हे एकपेशीय जीव मोठय़ा प्रमाणावर कमी होता आहेत. त्यामागे  समुद्राच्या पृष्ठभागाच्या वाढत्या तापमानाचा प्रामुख्याने हात असल्याचे संशोधक सांगत आहेत. समुद्रातील वाढते तापमान हेच यामागचे कारण असल्याची हाकाटी जगभर होत आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढले की तेथील पाण्याची घनता कमी होते. या पाण्यात सूर्यप्रकाश येत असला तरी जमिनीतील नायट्रेट्स, फॉस्पेट्स तसेच सिलिकेट या आवश्यक असलेल्या घटकांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे साहजिकच फायटोप्लॅक्टॉनची वाढ खुंटते.

नेचर या आंतरराष्ट्रीय मासिकात २०१० मध्ये छापून आलेल्या संशोधनानुसार १९५० पासूनच्या साठ वर्षांत प्लॅक्टॉनचे प्रमाण तब्बल ४० टक्क्यांनी कमी झाले आहे. या लेखाने प्रचंड गहजब उडाला होता. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर हे वनस्पतीसदृश्य जीव कमी होणे हा पर्यावरण अभ्यासकांसाठी हादराच होता. त्यानंतर वेगळ्या पद्धतीने पुन्हा एकदा अभ्यास करण्यात आला. २०१४ मध्ये तो प्रसिद्ध झाला. त्यातही प्लॅक्टॉन दरवर्षी साधारण एक टक्का या गतीने कमी होत असल्याचेच निदर्शनास आले. इकडे भारतातही समुद्रामधील प्लॅक्टॉनचा अभ्यास करण्यात आला. पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मिटिओरोलॉजीच्या डॉ. रॉक्सी कोल यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या अभ्यासात गोव्याच्या राष्ट्रीय सागरी अभ्यास संस्थेसह अमेरिका, दक्षिण आफ्रिका तसेच फ्रान्स येथील संशोधकही सहभागी झाले होते. जिओफिजिकल रिव्हू लेटर्समध्ये प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार प्लॅक्टॉनची संख्या गेल्या साठ वर्षांत २० टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले. खरे तर हिंदी महासागराच्या पश्चिम भागात फायटोप्लॅक्टॉनची संख्या वाढत असल्याचे त्यापूर्वीच्या काही पाहण्यांमध्ये दिसले होते.  पण ती वाढ तात्कालिक होती व एकंदर प्लॅक्टॉनची संख्या कमी होत असल्याचेच निष्पन्न झाले. अन्नसाखळीतील पायाच ढासळत असल्याने सागरातील जलचरांवर संक्रांत आली आहे. समुद्रातील माशांची कमी होत जाणारी संख्या ही त्याचेच निदर्शक आहे. जागतिक तापमानवाढ हे वास्तव आता साऱ्यांनीच स्वीकारले आहे. जमिनीवर होत असलेल्या बदलांसोबतच समुद्रातील बदलही आपल्यापर्यंत पोहोचता आहेत.

जुहू किनाऱ्यावरील निळा रंग हा समुद्राशी नेहमीच संबंध येत असलेले कोळी, अभ्यासक, जहाज व्यापारी यांच्यासाठी अगदीच सामान्य असेल, पण कदाचित काही दशकांनी हा निळा रंग खरंच दुर्मीळ होण्याची शक्यता आहे.

prajakta.kasale@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 2:48 am

Web Title: reducing number of plankton in sea due to low temperature
Next Stories
1 व्यायामात हवे सातत्य!
2 दमवणारा सर्दी-खोकला!
3 मोजमाप आरोग्याचे : थंडीतले दुखणे!
Just Now!
X