13 December 2017

News Flash

पंचकर्म : नोकरीच्या दगदगीत आराम!

जीवनशैलीच्या अशा आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पंचकर्म फायदेशीर ठरू शकते.

संपदा सोवनी | Updated: April 20, 2017 12:29 AM

नोकरीच्या दगदगीत आराम

 

 

डॉ. आरती कुलकर्णी

सतत कामात असलेल्या आणि कामाच्या वेळा निश्चित नसलेल्या व्यक्तींची जीवनशैली बदलून जाते. वेळेवर खाणेपिणे नाही, सतत बाहेरचे खाणे, चहावर चहा पिणे, बराच वेळ उपाशी राहणे या गोष्टी नेहमीच्या होतात. अनेकांची नोकरी सतत बैठे काम करण्याची किंवा सतत उभे राहावे लागण्याची असते, तर काहींना खूप प्रवास करावा लागतो. खुर्चीवर बसून काम करताना बसण्याची पद्धत (पोश्चर) चुकीची असणे, पाठीवरचे लॅपटॉपचे ओझे याचा त्रास असतोच. धावपळीच्या दिनक्रमात अनेकांकडून व्यायामाची टाळाटाळ होते, मनावर विविध टार्गेटचा ताणही असतो. शरीरात विविध आजारांना आमंत्रण मिळण्याची प्रक्रिया कशी सुरू होते हे लक्षात आले असेलच. अशा व्यक्तींना आजारांपासून दूर राहण्यासाठी पंचकर्माचा फायदा होऊ शकतो.

चुकीची जीवनशैली आणि वाढलेले शारीरिक ताण शारीरिक आजारांना बरोबर घेऊन येतात, तसेच मानसिक ताणतणावांमुळेही शारीरिक तक्रारी उद्भवू शकतात. हृदयावर ताण आल्यामुळे उच्च रक्तदाबासारखे विकार किंवा आणखी काही गुंतागुंती निर्माण होऊ शकतात. पचनसंस्थेवर परिणाम झाल्यामुळे आम्लपित्त (अ‍ॅसिडिटी), ‘इरिटेबल बॉवेल सिंड्रोम’ अशा आजारांना चालना मिळते. चयापचय क्रियेवर परिणाम झाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्टेरॉलदेखील वाढू शकते. आरोग्याकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्यास अनारोग्याची एक प्रकारची साखळीच सुरू होते. जीवनशैलीच्या अशा आजारांना प्रतिबंध करण्यासाठी पंचकर्म फायदेशीर ठरू शकते.

दिनचर्येमध्ये दंतधावनानंतर ‘नस्य’ म्हणजे नाकात औषधी तेलाचे थेंब टाकण्यास सांगण्यात आले आहे. हे वैद्यकीय सल्ल्यानुसार शिकून घेऊन करता येते. मानेच्या वरच्या भागाच्या व्याधींसाठी (उदा. सर्दी, अ‍ॅलर्जी) त्याची मदत होते. तसेच ऋतुचर्येनुसार वसंत (मार्च-एप्रिल-मे) ऋतूत वमन, शरद (ऑक्टोबर) ऋतूत विरेचन व वर्षां (जुलै-ऑगस्ट) ऋतूत बस्ती हे पंचकर्म उपचार सुचवण्यात आले आहेत.

मानसिक ताणतणावांच्या व्यवस्थापनासाठी आयुर्वेदिक औषधे व समुपदेशनाशिवाय पंचकर्म करता येते. यातील नेहमी करावीत अशी काही कर्मे खालीलप्रमाणे-

  • शिरोधारा- दोन्ही भुवयांच्या मध्ये काही काळ सातत्याने तेलाची किंवा औषधी काढय़ाची धार सोडणे.
  • शिरोअभ्यंग- डोक्याचा मसाज.
  • पादाभ्यंग- पायाला मसाज करणे.
  • कर्णपुरण- कानात तेल घालणे.

जीवनशैलीच्या आजारांसाठी उपयुक्त ठरू शकतील अशी आणखी काही कर्मे-

  • शिरोबस्ती- यात डोक्यावर तेल धारण करायचे असते. विशिष्ट प्रकारची टोपी डोक्यावर घालून काही काळासाठी त्यात तेल सोडतात.
  • नेत्रतर्पण- सतत ‘स्क्रीन’कडे पाहिल्यामुळे डोळय़ांतून पाणी येणे, डोळे दुखणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे दिसतात. यातही डोळय़ांवर काही काळ औषधी तूप धारण केले जाते.
  • पत्रपिंडस्वेद- औषधी पानांची भाजी करून त्याची पोटली बांधतात आणि ती गरम तेलात बुडवून त्याने शेक देतात. (याच प्रकारे औषधी भाताच्या पोटलीनेही शेक दिला जातो.)
  • सर्वाग अभ्यंग व वाफ घेण्यानेही ताणतणाव कमी होतात.

हृदयावर ताण येणे व उच्च रक्तदाब यासाठीही शिरोधारा उपयुक्त ठरते. अर्थात, रुग्णाच्या प्रकृतीनुसार त्यातील द्रव्ये बदलतात. आम्लपित्तासाठी वमन कर्म करता येते. धावपळीत मलमूत्रवेगांचे धारण करण्याची प्रवृत्ती अनेकांमध्ये दिसते. त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा उलट स्थितीत जुलाब असा त्रास खूप जणांना होतो. बद्धकोष्ठासाठी बस्ती उपचारांचा फायदा होतो. सतत चुकीच्या पद्धतीने बसल्यामुळे मान दुखते. त्यात ‘मन्याबस्ती’ केली जाते. म्हणजेच मानेला मसाज व वाफ देऊन मग मानेवर तेल धारण केले जाते. याच प्रकारे कमरेच्या दुखण्यावर ‘कटीबस्ती’ करतात. त्यात कमरेवर तेल धारण केले जाते. पंचकर्म उपचारांबरोबरच आहारविहार आणि दिनचर्येतही सकारात्मक बदल करणे गरजेचे ठरते. शिवाय व्यायामही करायला हवा. त्यासाठी वैद्यकीय सल्ल्याची मदत होते.

joshi.rt@gmail.com

First Published on April 20, 2017 12:29 am

Web Title: relax after hectic job