डॉ. प्रसन्न गद्रे त्वचारोगतज्ज्ञ

पावसाळ्यात दमटपणामुळे त्वचेच्या तक्रारी वाढतात. चिखल्या, तसेच नायटा व गजकर्णासारख्या तक्रारी या ऋतूत अनेकांना होतात. त्या टाळण्यासाठी काय करता येईल ते पाहू या.

चिखल्यांचा त्रास

पावसाळ्यात रेनकोट किंवा छत्री वापरल्यानंतरही पाण्यात थोडे तरी भिजायला झाले नाही, असे होतच नाही. वातावरणात सतत ओलावा आणि दमटपणा असतो. अशा वातावरणात विशेषत: पायांच्या बोटांच्या बेचक्यात ओलावा राहून चिखल्या होण्याची शक्यता असते. या चिखल्या होऊ नयेत म्हणून काही साध्या गोष्टींची काळजी घेता येईल.

  • पावसाच्या पाण्यात पाय भिजणार असतील तर गमबूट वापरावेत, किंवा पाय पूर्ण झाकले जातील असे पाण्याला अवरोध करणारे बूट चांगले.
  • बुटांचा चवडय़ाकडील भाग निमुळता नव्हे तर चौकोनी असावा. जेणे करून पायांच्या बोटांमध्ये हवा खेळती राहावी.
  • बुटांमध्ये नायलॉनचे मोजे वापरणे टाळा. सुती मोजे चांगले. मोज्यांचे जास्तीचे जोड ठेवा. मोजे ओले झाल्यास बदलण्यासाठी जवळ मोज्यांचा एक जोड बाळगा.
  • इतरांचे बूट वापरणे टाळा.
  • शक्य झाल्यास कार्यालयात दर दोन ते चार तासांनी पाच मिनिटांसाठी बूट मोजे काढून बसावे.
  • चिखलाच्या पाण्यात जाऊन आल्यावर पाय व पावले स्वच्छ धुवा. स्वच्छ कोरडय़ा फडक्याने बोटांच्या बेचक्यातील जागा पुसून कोरडी करावी. ‘हेअर ड्रायर’ असल्यास तो बोटांच्या बेचक्यांवरून फिरवावा म्हणजे सूक्ष्म स्वरूपातही तिथे पाणी राहणार नाही.
  • पावसाळ्याच्या दिवसांत प्रतिबंधात्मक म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने पायांच्या बोटांच्या मध्ये औषधी पावडर टाकता येईल.
  • पायांच्या दोन बोटांच्या मध्ये अंतर राहील अशी विशिष्ट रचना असलेल्या चपला चिखल्या होणे टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. अर्थात अशा चपला कार्यालयात किंवा बाहेर वापरता येणार नाहीत. पण घरी असताना वापरणे शक्य आहे.
  • चिखल्यांचा त्रास असलेल्या मधुमेही व्यक्तींनी विशेष काळजी घ्यायला हवी. पावसाळ्याच्या दिवसांत अनेक सण येतात आणि गोडधोडही खाण्यात येते. अशा वेळी साखर नियंत्रणात राहिली नाही तर चिखली वाढू शकते.

सर्वसाधारणपणे चिखल्या या पायांच्या करंगळीच्या शेजारच्या दोन बोटांच्या मध्ये होतात. पण दमट वातावरणात शरीरावर इतर ठिकाणीही चिखल्या होण्याची शक्यता असते. कानाच्या मागे, नाकपुडय़ांच्या बाजूला, ओठांच्या बाजूला, काखेत, जांघेत, नितंबांच्या मध्ये, तसेच स्त्रियांमध्ये स्तनांच्या खालच्या भागातदेखील चिखल्या होऊ शकतात. या प्रकारच्या चिखल्यांना वैद्यकीय भाषेत ‘कँडिडिअल इंटरट्रिगो’ असे म्हटले जाते. त्यामुळे पायांची बोटे जपण्याबरोबरच इतर अवयवांमध्येही दमटपणा राहू देणे टाळावे.

बुरशीचा संसर्ग

  • नायटा किंवा गजकर्णासारखे आजार बुरशीच्या संसर्गामुळे होतात. हा संसर्ग अंगावर कुठेही होऊ शकतो. त्याचा त्रास टाळण्यासाठी काही ‘टिप्स’-
  • भिजलेले कपडे लगेच बदलावेत. बाहेर जाताना किंवा कार्यालयात शर्टाचा किंवा कपडय़ांचा एक जोड बाळगावा. अंतर्वस्त्रांचेही अधिक जोड असावेत.

गुप्तभागावर बुरशीचा संसर्ग झाला

  • असेल तर कार्यालयातून घरी आल्यावर त्या जागी हवा खेळती राहील असा सैलसर पोशाख केलेला चांगला.
  • नायटा वा गजकर्णावर स्वत:च्या मनाने मलमे लावू नयेत. यातील अनेक मलमांमध्ये ‘स्टिरॉईड’ असते. त्यामुळे तात्कालिक स्वरूपात खाज थांबते, चट्टाही गेल्यासारखा दिसतो. नंतर मात्र बुरशीचा संसर्ग अधिक वाढू शकतो. त्यामुळे अशा वेळी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
  • औषधी मलमांनी ७ ते १४ दिवसांत त्रास बरा होत नसेल, तर तो सोसिआसिस किंवा जळवातासारखा इतरही काही आजार असू शकतो. त्यामुळे त्या दृष्टीनेही डॉक्टरांकडून खात्री करून घेणे चांगले.

पावसाळ्यात वातावरणात

  • फुलांचे परागकण व त्याबरोबर कीटकांचेही प्रमाण वाढते. त्यामुळे अनेकदा किडे चावल्यामुळे त्वचेवर फोड आलेले किंवा परागकणांची त्वचेवर ‘अ‍ॅलर्जी’ आलेले रुग्ण बघायला मिळतात. कीटकांचा त्रास अधिक असेल तर वेळीच ‘पेस्ट कंट्रोल’ करून घेणे चांगले.
  • संध्याकाळी बाहेर जाताना विशेषत: १२ वर्षांखालील मुलामुलींना हात- पाय पूर्ण झाकणारे, सैलसर कपडे घातलेले चांगले.
  • पर्यटनाला जाण्यापूर्वीही त्या ठिकाणी कीटकांचा त्रास कितपत आहे याचा विचार करून दक्षता घ्या.