News Flash

दातांच्या मुळापर्यंत उपचार रूट कॅनल!

‘रूट कॅनल’ म्हणजे नेमके काय हे कळण्यासाठी दाताची रचना समजण्याचा फायदा होईल.

दात कितपत किडला आहे त्यावरून त्यावरील उपचार ठरतात. त्यामुळे दात किडला की प्रत्येक वेळी ‘रूट कॅनल’च करावे लागते असे नाही; पण दाताची कीड त्याच्या आतल्या संवेदनाक्षम भागापर्यंत पोहोचून असहय़ ठणका लागतो तेव्हा मात्र रूट कॅनल उपचाराने दात वाचवणे शक्य आहे.

प्रत्येक दाताचे तसेच दाढेचे दोन भाग असतात. एक जो तोंडात दिसतो तो भाग (त्याला ‘क्राऊन’ म्हणतात), तर दुसरा हिरडीच्या आत हाडाच्या खोबणीत दडलेला भाग (त्यालाच मूळ किंवा ‘रूट’ म्हणतात). दाताच्या ‘क्राऊन’वर एकावर एक असे तीन थर असतात. यातला सर्वात बाहेरील अत्यंत कठीण आवरण म्हणजे ‘इनॅमल’. इनॅमलच्या आतील थर म्हणजे ‘डेंटिन’ आणि त्याच्याही आत दाताचा गाभा किंवा ‘पल्प’. या पल्पच्या भागात नसा, रक्तवाहिन्या आणि पेशी असतात आणि हाच भाग दाताच्या क्राऊनपासून मुळाच्या टोकापर्यंत पसरलेला असतो. हा पल्पचा भाग दाताला संवेदना देतो आणि अन्नपुरवठाही करतो.

‘रूट कॅनल’ म्हणजे नेमके काय हे कळण्यासाठी दाताची रचना समजण्याचा फायदा होईल. दाताच्या मुळामध्ये असलेली ‘कॅनल’सदृश पोकळी- ज्याच्यात वर सांगितलेला ‘पल्प’चा भागही हजर असतो, ते म्हणजे ‘रूट कॅनल’.

दात कितपत किडला आहे त्यावरून त्यावरील उपचार ठरतात. त्यामुळे दात किडला की प्रत्येक वेळी रूट कॅनलच करावे लागते असे मुळीच नाही. आपण दात किडण्याच्या या अवस्था पाहू या-

’ दाताला लागलेली कीड जेव्हा दाताच्या सर्वात बाहेरच्या थरापुरती- म्हणजे ‘इनॅमल’पुरती मर्यादित असते तेव्हा किडण्यामुळे पडलेला खड्डाही (कॅव्हिटी) छोटा असतो. अशा किडलेल्या दातात अन्न अडकत राहते, पण वेदना होत नाहीत. अशा वेळी लगेच दात भरण्याचा (फिलिंग) उपचार केल्यास दात शंभर टक्के वाचू शकतो.

’ दाताची कीड जेव्हा इनॅमलच्या थरातून त्याच्या आतल्या डेंटिनच्या थरापर्यंत पोहोचते तेव्हा दाताला पडलेल्या खड्डय़ाचा आकार वाढतो. गार वा गरम खाताना वेदनाही होऊ लागतात. या अवस्थेतदेखील ‘फिलिंग’ करून दाढ वा दात वाचवता येतो.

’ दुसऱ्या अवस्थेतल्या किडलेल्या दातावर वेळीच उपचार न केल्यास ती कीड दाताच्या आणखी आतल्या संवेदनाक्षम ‘पल्प’च्या भागापर्यंत पोहोचते. या वेळी वेदना वाढतात आणि नुसत्या ‘फिलिंग’ने दात वाचत नाही. त्याला ‘रूट कॅनाल’ इलाज करावा लागतो.

’ किडण्याच्या तिसऱ्याही अवस्थेत इलाज न केल्यास दाताची कीड दाताच्या मुळामध्ये असलेल्या ‘रूट कॅनाल’मधल्या पल्पपर्यंत पोहोचते आणि दाताच्या मुळाच्या टोकाशी गळू होते. प्रचंड ठणका लागतो. दाताच्या पल्पमध्ये जंतुसंसर्ग होऊन चेहऱ्याला सूज येते. क्वचितप्रसंगी ताप येतो. असहय़ ठणक्यामुळे रुग्णाला डॉक्टर गाठणे भाग पडते. अशा वेळी पूर्वी दाढ वा दात काढावा लागे. आता मात्र गेल्या २५-३० वर्षांपासून किडण्याच्या तिसऱ्या व चौथ्या अवस्थेतील दातही ‘रूट कॅनल’ उपचाराने वाचवता येतो.

उपचार कसा करतात?

या उपचारात दात वा दाढेच्या किडलेल्या भागातून मुळामध्ये असलेल्या रूट कॅनलपर्यंत जाऊन जंतुसंसर्ग झालेला पल्पचा भाग साफ केला जातो आणि तिथली पोकळी र्निजतुक केली जाते. जंतुसंसर्ग झालेला पल्पचा भाग काढून टाकताना मधूनमधून दातात जंतुनाशक औषधांचा फवारा केला जातो. रूट कॅनलच्या र्निजतुक झालेल्या पोकळीत ‘गटा पर्चा’ नावाचे औषधी कोन भरले जातात व त्या पोकळीचे फिलिंग केले जाते. या संपूर्ण प्रक्रियेला ‘रूट कॅनल फिलिंग’ असे म्हणतात.

लहान मुलांना दुधाच्या दातांना ‘रूट कॅनल’ करतात का?

लहान मुलांनाही दुधाच्या दातांना रूट कॅनल उपचार करता येतो. मात्र लहान मुले दवाखान्यात आल्यावर खूप दंगामस्ती करतात, आरडाओरडा करतात, विनाकारण घाबरतातही. त्यामुळे त्यांना रूट कॅनल उपचार करणे कित्येकदा खूप अवघड जाते. अशा वेळी मुलांशी हसून-खेळून त्यांचे सहकार्य मिळवावे लागते. खूपच दंगा करणाऱ्या व दंततज्ज्ञाला सहकार्य न करणाऱ्या मुलांना अनेकदा संपूर्ण शरीराला भूल देऊनही काम करावे लागते. दुधाचे दात वाचवणे आवश्यक असते, कारण दुधाच्या दाताच्या मुळातूनच कायम टिकणारे दात येत असतात. कायमचे दात येण्याआधी अवेळी दुधाचे दात काढून टाकल्यास नंतर उगवणारे दात वा दाढा वेडय़ावाकडय़ा उगवतात वा न उगवता हाडात अडकूनही राहू शकतात.

‘रूट कॅनल’ कधी करता येत नाही

’ किडलेला दात खूपच तुटला असेल तेव्हा

’ दात खूपच हलत असेल तेव्हा

’ दाताची वा दाढेची रूट कॅनलमधील पोकळी कडक झाली असेल तर. विशेषत: वृद्धांच्या बाबतीत असे झालेले असू शकते.

’ दाताची- विशेषत: दाढांची मुळे खूपच वेडीवाकडी असल्यास. मात्र या अवस्थेत आधुनिक हत्यारांच्या साहाय्याने प्रयत्न जरूर करता येतो.

‘रूट कॅनल’ इलाज करताना फार त्रास होतो का?

नाही. रूट कॅनल इलाजाविषयी असलेला हा गैरसमज आहे. हा उपचार सुरू करताना त्या ठिकाणी बधिर करण्याचे इंजेक्शन दिलेले असते आणि एकदा का जंतुसंसर्ग असलेला दाताचा पल्प निघून गेला, की वेदना होत नाहीत.

‘रूट कॅनल’ इलाजाचे धोके/तोटे काय?

’ रूट कॅनल इलाजाचा तोटा तर काहीच नसतो, कारण या उपचाराने खूप किडलेली, मुळापर्यंत जंतुसंसर्ग झालेली दाढ वा दात वाचवला जातो. त्यामुळे झालाच तर नैसर्गिक दात वा दाढ टिकण्याचा फायदाच होतो.

’ रूट कॅनल उपचारात कुठला धोकाही नसतो. अगदी गर्भवती रुग्णांमध्येही योग्य ती काळजी घेऊन व रुग्णाचे पूर्ण सहकार्य लाभल्यास रूट कॅनल इलाज करून दात वा दाढ वाचवता येते.

‘रूट कॅनल’साठी वेळ किती लागतो?

आजकाल उपलब्ध असलेल्या हत्यारांच्या साहाय्याने रूट कॅनल इलाज एका व्हिजिटमध्येही करता येतो; परंतु खूप ठणकणाऱ्या आणि सुजलेल्या दातांना दोन वा प्रसंगी तीन व्हिजिटदेखील लागू शकतात.

‘रूट कॅनल’नंतर काय काळजी घ्यावी?

रूट कॅनल इलाजानंतर दाताचा वा दाढेचा जंतुसंसर्ग नाहीसा होऊन वेदना थांबत असल्या तरी इथवर इलाज करून पुढे त्या किडलेल्या दाताच्या पोकळीत ‘काम्पोझिट रेझिन मटेरियल’चे फिलिंग करून दातावर कॅप बसवावी लागते. हे न केल्यास काही दिवसांनी दात वा दाढ तुटून जाते. कॅपपर्यंतचा उपचार पूर्ण झाल्यावर मात्र दात वा दाढेला पूर्ववत ताकद प्राप्त होऊन ती तोंडात दीर्घकाळ टिकून राहू शकते.

 – डॉ. दीपक मांडे, दंततज्ज्ञ – mandedeepak@yahoo.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2016 5:23 am

Web Title: root canal treatment
Next Stories
1 उदरभरण नोहे.! : चणे-शेंगदाणे!
2 प्रकृ‘ती’ ; लसीकरण
3 आयुर्मात्रा ; नारळ
Just Now!
X