20 October 2019

News Flash

मीठ जरा जपूनच..

रोजच्या जेवणामधील चिमूटभर मिठाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही.

|| डॉ. स्नेहा राजे, आहारतज्ज्ञ

रोजच्या जेवणामधील चिमूटभर मिठाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेक लोककथांमधून मिठाचे स्वयंपाकघरातील स्थान अधोरेखित करण्यात आले आहे. अर्थात मिठाचा वापर केवळ चवीपुरता होत नाही तर शरीराच्या क्रिया योग्य प्रकारे होण्यासाठीही मीठ आवश्यक आहे. निरोगी व्यक्तीला दिवसातून साधारण दोन ग्रॅम मीठ पुरेसे ठरते. मात्र चवीला चांगले लागते म्हणून मिठाचा अतिरेक केला किंवा साठवणीच्या पदार्थाचे आहारातील प्रमाण वाढले की त्याचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो.

मीठ हा क्षार घटक आहे आणि आपल्या दैनंदिन आहारातील त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मिठाचा उपयोग  जसा अन्नामध्ये रुची निर्माण करण्यासाठी होतो तसा शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठीदेखील मीठ महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळेच उलटय़ा, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असता रुग्णाला मीठ-साखरेचे पाणी प्यायला दिले जाते. मिठामुळे शरीरातील ओलाव्याचे प्रमाण कायम राखण्यास मदत होते. दात आणि हाडांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आहारात मिठाचे प्रमाण योग्य असणे अत्यावश्यक आहे. ते कमी झाले असता दात किडतात. हाडेदेखील ठिसूळ होतात. त्यामुळेच अनेक दंतमंजनांत मीठ असल्याचा उल्लेख जाहिरातींमध्ये आवर्जून केला जातो.

घरगुती औषधोपचारांमध्ये मिठाचे महत्त्व भरपूर आहे. सर्दी-खोकला, पडसे, कान दुखणे, कफ आणि श्वसनाचे विकार यावर उपाय करण्यासाठी मीठ अत्यंत गुणकारी आहे. हळद आणि मीठ टाकून पाण्याच्या गुळण्या केल्यास बसलेला घसा मोकळा होण्यासाठी उपयोग होतो. हळद, मिठाचे पाणी नाकपुडय़ांना बोटाने लावल्यास चोंदलेले नाक मोकळे होते. पित्ताचा त्रास होत असेल मात्र उलटी होत नसेल तर अशा वेळी मिठाचे पाणी प्यायल्याने लगेच उलटी होऊन पित्त बाहेर पडून जाते. मिठाचे पाणी प्यायल्यास पोट साफ होण्यासही मदत होते. तोंडात मिठाचा खडा धरून ठेवल्यास त्याचा उपयोग खोकल्याची उबळ कमी होण्यास होतो. कोमट तेलात मीठ मिसळून छातीला लावले असता कफ आणि श्वसनाच्या विकारांचा त्रास कमी होतो. मिठाचे असे अनेक उपयोग असले तरी आहारातील मिठाचा अतिरेक शरीरासाठी हानीकारक ठरतो.

रक्तदाबाचा त्रास असल्यास आहारातील मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. विशेषत: प्रत्येक गोष्टीत वरून अधिकचे मीठ घालून खाण्याची सवय असल्यास ती बंद करण्याला सल्ला तज्ज्ञ देतात. सर्वसाधारण निरोगी व्यक्तीच्या शरीरासाठी दिवसाला दोन ग्रॅम मीठ खाणे पुरेसे उपयुक्त असल्याचे डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांकडून सांगण्यात येते. कावीळ, मधुमेह या आजारांमध्ये मिठाचे सेवन शक्यतो कमी प्रमाणात करणे फायदेशीर असते. विशेषत: बाजारात चकचकीत पाकिटात मिळणाऱ्या प्रक्रिया करून विक्रीसाठी ठेवलेल्या मिठापेक्षा खडे मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट आहारात घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. सर्वसाधारणपणे रॉक सॉल्ट म्हणजे खडे मीठ, रिफाइण्ड मीठ, सैंधव अशा अनेक प्रकारांतील मीठ बाजारात उपलब्ध असते. आपल्या आरोग्यविषयक गरजा विचारात घेऊन तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या प्रकारच्या मिठाचा आहारात समावेश करणे योग्य ठरेल.

(शब्दांकन – भक्ती बिसुरे)

First Published on September 11, 2018 1:30 am

Web Title: salt not good for health