18 November 2017

News Flash

मूत्रपिंडाच्या चाचणीमागील शास्त्र

चहा बनवताना आपण पाण्यात साखर, चहाची पूड टाकून ते पाणी उकळतो आणि मग

रेखा वर्तक | Updated: September 7, 2017 1:42 AM

आधुनिक धकाधकीच्या जीवनपद्धतीत बदललेले राहणीमान, मानसिक ताणांचा शरीरावर होणारा परिणाम, वाढत्या वयामुळे शरीरात होणारे बदल किंवा जंतूमुळे होणारे आजार यांपैकी काही ना काही कारणाने आपल्याला दवाखान्याची पायरी चढावी लागते. डॉक्टरही कित्येकदा निदान अचूक व्हावे म्हणून काही तपासण्या करायला सांगतात. अशाच एका चाचणीची थोडी अधिक ओळख करून घेऊ या.

मूत्रपिंडे योग्य पद्धतीने काम करताहेत की नाही हे पाहण्यासाठी ईजीएफआर ही चाचणी केली जाते. त्यामुळे मूत्रपिंडाची गाळणक्षमता लक्षात येते. मात्र या पद्धतीत नेमकी चाचणी कशाची केली जाते आणि त्याचा मूत्रपिंडाशी कसा संबध येतो, ते पाहणे औत्सुक्यपूर्ण आहे. ईजीएफआर (एस्टिमेट ऑफ ग्लोमीरुलर फिल्टरेशन रेट) किंवा मूत्रपिंडाची गाळणक्षमता/वेग- या चाचणीला एस्टिमेट म्हणण्याचे कारण म्हणजे ही चाचणी प्रत्यक्ष वेग मोजत नाही तर रक्तातील क्रिएटिनाइन या घटकाच्या प्रमाणावरून या वेगाचा अंदाज व्यक्त करते. अर्थातच हा अंदाज मूळ क्षमतेच्या खूपच जवळ जाणारा असतो.

ही चाचणी समजण्यासाठी प्रथम आपण मूत्रपिंडाच्या गाळण प्रक्रियेचा विचार करू या. चहा बनवताना आपण पाण्यात साखर, चहाची पूड टाकून ते पाणी उकळतो आणि मग गाळण्यावर गाळतो. गाळणीतून जे द्रावण भांडय़ात पडते त्यात विरघळलेली साखर असते. गाळण्यावर काय राहते तर चहापावडर. त्याचप्रमाणे जेव्हा रक्तवाहिनीतून वाहणारे रक्त मूत्रपिंडात येते, तेव्हा तिथे अनेक छोटय़ा छोटय़ा गाळण्या असतात. त्यातून साखर नि अन्य विरघळलेले पदार्थ गाळून रक्ताबाहेर पडतात नि रक्तातल्या पेशी, अन्य आकाराने मोठे घटक उदा. प्रथिने गाळली जात नाहीत. आपल्या मूत्रपिंडातील ही गाळणी मोठी कामसू असते. ही नुसते गाळण्याचे काम करीत नाही तर रक्ताबाहेर पडलेले शरीरासाठीचे आवश्यक घडक ताबडतोबीने परत करत असते. उदा. रक्तातील साखर. शिवाय या गाळणीला जोडून असणारी यू या आकाराची नलिकासुद्धी महत्त्वाची. ही तर ‘पाणी वाचवा’ मोहीम राबवत असते. या नलिकेची लांबी जितकी जास्त, तितकेच शरीराला पाणी पुन्हा मिळण्याचे प्रमाण जास्त.

आता आपण क्रिएटिनाइन या पदार्थाविषयी थोडी अधिक माहिती घेऊ. याची रचना पाहिली तर तो एक नत्रयुक्त कार्बनी रेणू (नायट्रोजिनिअस ऑरगॅनिक मोलेक्युल) आहे हे लक्षात येते. तो आपल्या शरीरात कसा तयार होतो? मुळात क्रिएटाइन नावाचा पदार्थ यकृतात तयार होतो. तो स्नायूंकडे पाठवला जातो नि तिथे तो क्रिएटाइन फॉस्फेट संयुगाच्या स्वरूपात साठवला जातो. या संयुगाच्या साहाय्याने विविध हालचालींसाठी लागणारी ऊर्जा निर्माण होते. या साठय़ाच्या सुमारे १-२ टक्के इतका साठा रोज क्रिएटीनाइन नावाच्या निरुपयोगी पदार्थात रूपांतरित होत असतो व तो रक्तात मिसळून मूत्रावाटे बाहेर टाकला जातो.

साहजिकच याचा अर्थ असा होतो की, ज्याच्या शरीरात स्नायूंचे प्रमाण अधिक, त्याच्या रक्तात क्रिएटिनाइनचे प्रमाण ही अधिक. हा फरक सहजा पुरुष व स्त्रियांमध्ये लक्षात येतो.

पुरुष : रक्तातील प्रमाण : ०.८-१.४ एमजी टक्के

स्त्रिया : रक्तातील प्रमाण : ०.६-१.१ एमजी टक्के

क्रिएटिनाइनची रक्तातली पातळी एखाद्या व्यक्तीसाठी सहसा स्थिर राहते याचे मुख्य कारण म्हणजे त्याच्या निर्मितीचा वेग व टाकून दिला जाण्याचा वेग एकमेकांना संतुलित करतात. म्हणजेच ज्या व्यक्तीची मूत्रपिंडे व्यवस्थित काम करत असतील त्यांच्यात मूत्रपिंडाच्या गाळणक्षमतेचा अंदाज या घटकाच्या रक्तातल्या प्रमाणावरून काढता येईल. जेव्हा आपण आपल्या रक्ताचा नमुना तपासणीसाठी देतो, तेव्हा प्रथम रक्तातील क्रिएटिनाइनचे प्रमाण तपासले जाते. याला सिरम क्रिएटिनाइन तपासणी असे म्हणतात. (सीरम म्हणजे रक्तातील प्रथिने व रक्तपेशी वजा केल्यास जो द्राव उरतो तो.) या प्रमाणावरून एक समीकरण वापरून स्त्री व पुरुष यांच्या मूत्रपिंडाच्या गाळणक्षमतेचा अंदाज सांगितला जातो. हे समीकरण तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी मोठय़ा प्रमाणावर स्त्री व पुरुषांच्या सीरम क्रिएटिनाइनच्या चाचण्या केल्या. तसेच या सर्व व्यक्तींच्या मूत्रपिंड गाळणाचा प्रत्यक्ष वेग तपासला. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे २४ तासांचे मूत्र गोळ्या करून त्यातील क्रिएटिनाइनचे प्रमाण तपासले. तसेच प्रत्येक व्यक्तीत दर तासाला किती मिलिलिटर लघवी तयार होते तेही प्रमाण तपासले. या साध्या माहितीचा वापर करून अनेक समीकरणे तयार झाली. संगणकाच्या साहाय्याने ती सोडवून अंतिम समीकरण मिळाले. हे समीकरण पौढांसाठी म्हणजेच वय वर्षे १८ पासून पुढील व्यक्तींसाठी लागू पडते. जसजसे वय वाढत जाते तसतसा ईडीएफआर हा कमी होत जातो. जर या समीकरणाचे उत्तर ९० किंवा अधिक आले तर याचा अर्थ मूत्रपिंडाचे गाळणकाम नीट चालू आहे. त्यापेक्षा कमी हे मूत्रपिंडाच्या गाळणदोषाकडे बोट दाखवते.

पण काही प्रसंगी मात्र हे निष्कर्ष जसेच्या तसे वापरता येत नाहीत. समजा एखादी व्यक्ती खूप अधिक प्रमाणात मांसाहार करीत असेल तर अशा व्यक्तीच्या आहारातून मोठय़ा प्रमाणावर क्रिएटाइनचा पुरवठा शरीराला होतो. त्यामुळे रक्तातील क्रिएटिनाइनचे प्रमाण खूप वाढते. म्हणजे जरी मूत्रपिंड नीट काम करत असेल तरीही समीकरणाचे उत्तर ९० पेक्षा खूप कमी येते. अशा वेळी मूत्रपिंडाच्या गाळणदोषाचा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरू शकेल. समजा एखादी व्यक्ती अत्यंत अशक्त झाली आहे किंवा तिला मांसपेशींचा रोग झाला आहे, अशा व्यक्तीसाठीही हा अंदाज चुकीचा ठरेल. जठरात स्रवणारे आम्ल नियंत्रित करणारी काही औषधे ही क्रिएटिनाइनच्या गाळणप्रक्रियेला विरोध करतात. अशा औषधांचं नियमित सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या रक्तात क्रिएटिनाइनचे प्रमाण जास्त आढळते. मूत्रपिंडे ठिकठाक असली तरीही. पण या झाल्या क्वचित आढळणाऱ्या घटना. एवढे मात्र नक्की की या चाचणीतून मूत्रपिंडाच्या सुदृढतेबद्दल प्राथमिक अंदाज बांधता येतो. म्हणून ही चाचणी करणं आवश्यक.

जर मूत्रपिंडातील गाळणीमुळे मूत्रात गाळली गेलेली साखर पुन्हा शरीराला दिली जाते, तर मग काही मधुमेही रोग्यांत, मूत्रात साखर का आढळते? यांचे कारण म्हणजे, या रोग्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण इतके वाढते की त्यामुळे गाळून मूत्रात ही साखर मोठय़ा प्रमाणावर आल्यावर ती उलट शोषून घेण्याची ताकदही कमी पडते व त्यामुळे लघवीत साखर आढळते.

१९९२ साली बार्सीलोना इथे झालेल्या ऑलम्पिक स्पर्धेत क्रिस्टियान नावाच्या ब्रिटिश खेळाडूने १०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले, पण त्याच्यावर स्पर्धेआधी क्रिएटिनाइनयुक्त पेय प्यायल्याचा आरोप झाला. हा आरोप खरा असला तरी क्रिस्टियानला शिक्षा झाली नाही, कारण अद्याप तरी क्रिएटिनाइन एक नैसर्गिक घटक मानले जाते नि डोपिंगच्या यादीत त्याचा समावेश नाही.

(शैक्षणिक समन्वयक, होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र )

First Published on September 7, 2017 1:42 am

Web Title: science behind the kidney test