05 July 2020

News Flash

जीवघेणा स्क्रब टायफस

ट्रॉम्बिक्युलीड माइटचे लारव्हे, ज्याला पिसवा (चिगर किंवा सूक्ष्म कीटक) म्हणतात.

विदर्भाच्या विविध भागांसह मध्य भारतात स्क्रब टायफसचे रुग्ण प्रथमच येथे मोठय़ा संख्येने आढळत असून सर्वाधिक मृत्यूही याच भागात नोंदवले गेले आहेत. ‘ओरिएन्टा सुसुगामुशी’ नामक जिवाणूमुळे हा आजार होत असून तो प्रथम १८९९ मध्ये जपानमध्ये आढळल्याची नोंद आहे.

ट्रॉम्बिक्युलीड माइटचे लारव्हे, ज्याला पिसवा (चिगर किंवा सूक्ष्म कीटक) म्हणतात ते चावल्यामुळे ‘ओरिएन्टा सुसुगामुशी’ हे जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात. जेथे झुडूप किंवा गवत असते त्यावर हे पिसवे आढळतात. गवत कापताना किंवा या भागातून कुणी जात असल्यास त्याला हे पिसवे चावण्याची शक्यता असते. हे पिसवे उंदरांवर मोठय़ा संख्येने आढळतात. चिगर लारव्हे अतिशय सूक्ष्म आकाराचे (०.२ ते ०.४ मिलिमीटर) असतात. ते डोळ्यांनाही दिसत नाहीत. ते चावण्याच्या ठिकाणी दुखतसुद्धा नाही. त्यामुळे ते चावल्याचे कळत नाही.

चिगर चावल्यानंतर पाच ते वीस दिवसांनी रोगाची लक्षणे दिसायला लागतात. सुरुवातीला ताप, डोकेदुखी, हातपाय दुखणे, मळमळ, ओकाऱ्या आणि इतर तापाच्या रोगांसारखी लक्षणे असतात. त्यामुळे बऱ्याच रुग्णांमध्ये मलेरिया, विषमज्वर किंवा डेंग्यू असण्याची शक्यता वर्तवली जाते. ज्या ठिकाणी चिगर चावतो, त्या ठिकाणी एक व्रण असतो, ज्याला इशर म्हणतात. व्रण दिसल्यास रोगनिदान नक्की झाले, असे समजण्यात येते. परंतु ४० टक्के रुग्णांमध्ये असे आढळून येत नाही. या आजारासाठी प्रतिबंधक लस नाही. लवकर निदान, लोकांचे जनजागरण, उंदरांवर नियंत्रण मिळवले तर स्क्रब टायफस आटोक्यात येऊ  शकतो. भारत, पाकिस्तान युद्धाच्यावेळी १९६५ मध्ये या रोगाचे रुग्ण देशात आढळले होते. परंतु त्यानंतर हा आपल्या देशातून तो कमी झाला होता. १९९० मध्ये हा आजार परत आला आणि डेहराडून येथे काही सैनिकांना या रोगाची लागण झाली. तमिळनाडू, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम या राज्यात या आजाराचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळतात. हल्ली विदर्भासह मध्य प्रदेशातही हे रुग्ण मोठय़ा संख्येने नोंदवले जात आहेत. साधारण या आजाराचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात पावसाळ्यात आढळतात.

रुग्णाची वेळीच रक्त तपासणी करून आणि श्वसनाच्या लक्षणांवरून स्क्रब टायफसचे निदान करता येते. रुग्णांच्या प्लेटलेट आणि पांढऱ्या पेशीचे प्रमाण कमी होते. कोणत्याही तापाच्या रुग्णामध्ये स्क्रब टायफस तर नाही ना असा विचार करून योग्य त्या चाचण्या संबंधित डॉक्टरांनी करण्याची गरज आहे. या आजारावर औषध उपलब्ध असून तज्ज्ञ डॉक्टरांकडून वेळीच योग्य उपचार झाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होतो.    – डॉ. चंद्रशेखर मेश्राम, मेंदूरोगतज्ज्ञ

लक्षणे

  • ताप ल्ल डोकेदुखी ल्ल हातपाय दुखणे
  • मळमळ ल्ल ओकारी होणे

वेळीच उपचार न झाल्यास धोका

स्क्रब टायफसचे वेळीच निदान व उपचार न झाल्यास तो उग्र रूप धारण करतो. त्यामुळे रुग्णाची शुद्ध हरपणे, चालताना तोल जाणे, डिस्टोबिया आदी लक्षणे दिसतात. अक्युट एन्सेफेलाइटिसच्या रुग्णाचे साधारण २० टक्के रुग्ण हे स्क्रब टायफसचे असतात, असे आसाममधील एका संशोधनाचा निष्कर्ष आहे. एकूण रुग्णांतील निम्म्या जणांना यकृताचा त्रास आणि न्यूमोनिया होतो. त्यामुळे कावीळ आणि श्वासाचा त्रास होतो. ३५ टक्के रुग्णांना एआरडीएस होतो. काही लोकांना किडनीचा त्रास होतो. ३० टक्के लोकांमध्ये शरीरातील अनेक अवयव निकामी होतात. वेळेवर योग्य उपचार झाला नाही तर ५० टक्के रुग्ण दगावतात. २५ टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो.

(शब्दांकन- महेश बोकडे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2018 12:39 am

Web Title: scrub typhus
Next Stories
1 टाचदुखी
2 मधुमेहींच्या डोळ्यांची काळजी
3 कुष्ठरोग निर्मूलनासाठी..
Just Now!
X