26 March 2019

News Flash

रक्ताची व्याधी सिकलसेल

सिकलसेल हा एका पिढीतून पुढच्या पिढीत जाणारा रक्ताशी संबंधित आजार आहे.

सिकलसेल हा एका पिढीतून पुढच्या पिढीत जाणारा रक्ताशी संबंधित आजार आहे.

सिकलसेल हा एका पिढीतून पुढच्या पिढीत जाणारा रक्ताशी संबंधित आजार आहे. या आजाराचे सिकलसेल वाहक (एएस) आणि सिकलसेलग्रस्त (एसएस) असे दोन प्रकार आहेत. एसएस संवर्ग हा त्रासदायक आहे. सिकलसेलग्रस्तांमध्ये हिमोग्लोबिनचा बदल दिसून येतो. हिमोग्लोबिनमुळे प्राणवायू रक्ताद्वारे शरीरभर पोहोचतो. बदल होणाऱ्या हिमोग्लोबिनला ‘हिमोग्लोबिन एस’ असे म्हणतात. मानवात दिसणाऱ्या ६०० प्रकारच्या असामान्य हिमोग्लोबिन पेशींपैकी ‘हिमोग्लोबिन एस’ एक आहे. सिकलसेल आई आणि वडिलांतून प्रत्येकी एक अथवा दोघांतून आलेल्या १/१ ‘हिमोग्लोबिन एस’ जनुकाच्या संक्रमणाने मुलामध्ये दिसून येते. आई-वडील दोघे सिकलसेलचे वाहक असल्यास मुलांना सिकलसेल एसएस होऊ शकतो. या संवर्गातील रुग्णांना जास्त त्रास होतो. तर दोघांपैकी एकच सिकलसेल वाहक असल्यास मुलाला एसएस या संवर्गातील आजार होत नाही.

सिकलसेल टाळण्यासाठी प्रत्येकाने तपासणी करायला हवी. लग्न करताना दोघेही सीकलसेल वाहक असल्यास लग्न टाळावे. लग्न झाल्यास गरोदर महिलेची तिसऱ्या महिन्यात गर्भजल परीक्षण करावे. जन्माला येणाऱ्या बाळाला सिकलसेल आढळल्यास त्याला जास्त पाणी देण्यासह आजारापासून वाचण्यासाठी काळजी घेत डॉक्टरांच्या सल्याने योग्य उपाय करावे.

लक्षणे

बहुतांश रुग्णांना कुठलाही त्रास होत नाही, परंतु काही वेळा केव्हातरी अचानक शरीरात कुठेही वेदना होऊ  लागते. याचे कारण तांबडय़ा रक्तपेशी ज्या मऊशार चकतीसारख्या असतात, त्या विळ्यासारख्या अर्धवक्राकार आणि ठिसूळ होतात. त्यांच्या आकारामुळे आणि ठिसूळपणाने या पेशींचे धारदार तुकडे होतात. त्यामुळे या पेशी रक्तवाहिन्यांतून सहज प्रवाहित होत नाहीत. परिणामी शरीराला व्यवस्थित रक्तपुरवठा न झाल्याने अंग दुखण्याचा त्रास होऊ  लागतो. या वेदना सौम्य, मध्यम, तीव्र किंवा अतितीव्र असू शकतात. मात्र अंग गारठणे, शरीरात पाण्याचे प्रमाण खूप कमी होणे, शरीराच्या तापमानात अचानक बदल होणे, प्राणवायूचा अभाव, जंतुसंसर्ग, अपुरे व अवेळी जेवण, शारीरिक श्रम, मानसिक तणाव यातून अंगदुखीचा त्रास जाणवतो. याच कारणांनी दोन सिकलसेलच्या रुग्णांमध्ये वेगवेगळे परिणामही पाहायला मिळतात.

उपचार

या आजारावर कोणताही विशिष्ट उपचार नाही, परंतु आजाराच्या लक्षणानुसार डॉक्टर उपचार करतात. रुग्णाला जंतुसंसर्ग होऊ  नये म्हणून वयाच्या तिसऱ्या वर्षांपासून प्रतिजैविके रोज एकदा किंवा दोनदा गरजेनुसार देतात. यात फॉलिक अ‍ॅसिड आणि खनिजयुक्त जीवनसत्त्वांच्या गोळ्यांचा समावेश असतो. सिकलसेलग्रस्त बालकांना डॉक्टरांनी आखून दिलेल्या पूर्ण लसी द्याव्यात. हल्लीच्या संशोधनानुसार अस्थिमज्जारोपण म्हणजे बोन मॅरो ट्रान्सप्रांटद्वारे हा आजार बऱ्याच अंशी घालवता येतो.

रक्ताक्षय

सर्वसाधारण व्यक्तीत तांबडय़ा पेशी १२० दिवस शरीरात जिवंत असतात. सिकलसेल रुग्णांमध्ये हे प्रमाण सुमारे ५ ते ३० दिवस इतके असते. रुग्णात तांबडय़ा पेशींचे आयुर्मान घटल्याने यांचे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण खूप कमी होऊन त्याला रक्ताक्षयाचा त्रास वाढतो. रोगप्रतिकारक्षमता कमी झाल्याने यांच्या जंतुसंसर्गाचे प्रमाण अधिक असते.

– डॉ. अविनाश गावंडे

(शब्दांकन- महेश बोकडे)

First Published on March 6, 2018 2:14 am

Web Title: sickle cell anemia symptoms and causes