08 December 2019

News Flash

खाज येतेय.. चट्टे उठलेत?

नको त्या ठिकाणी चट्टे उठलेत, खाज येतेय, ओशाळवाणे वाटतेय.. मग अमुक-तमुक मलम लावा..

नको त्या ठिकाणी चट्टे उठलेत, खाज येतेय, ओशाळवाणे वाटतेय.. मग अमुक-तमुक मलम लावा.. या आणि अशा प्रकारच्या जाहिराती सर्रास दिसतात. त्यांना प्रतिसादही खूप मिळतो. मात्र घाम किंवा ओलसरपणामुळे कंबर, जांघेत, स्तनांच्या खाली निर्माण होणाऱ्या बुरशीजन्य संसर्गासाठी (फंगल इन्फेक्शन) जाहिरातीत दाखवणारी मलम लावूनही संसर्ग बरा होत नाही, असा अनुभव हल्ली अनेक जणांना आला असेल. हा संसर्ग बरा का होत नाही आणि औषधे घेऊन बरा झालेला संसर्ग पुन्हा का उद्भवतो याबाबत तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन.

बुरशीचे जिवाणू आजूबाजूच्या वातावरणामध्ये, प्राण्यांच्या त्वचेवर, मातीमध्ये असे सर्वत्र असतात. त्वचेच्या ज्या भागामध्ये ओलसरपणा किंवा तापमान वाढते तिथे या जिवाणूंची वाढ होऊन संसर्ग निर्माण होतो. नायटा किंवा गजकर्ण या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या संसर्गामध्ये कंकणाकृती चकत्यांपासून ते मोठय़ा आकाराचे लाल, काळसर रंगाचे चट्टे त्वचेवर दिसून येतात. या चट्टय़ाच्या आजूबाजूंना बारीक फोड येत असतात आणि त्यांना प्रचंड खाज येते. विशेषत: घाम किंवा ओलसरपणा असणारा मांडीचा आतला भाग, जांघेत, महिलांमध्ये छातीच्या खालच्या बाजूस असा संसर्ग आढळून येतो. परंतु हल्ली अगदी चेहऱ्यापासून पायाच्या बोटापर्यंत शरीराच्या कोणत्याही भागावर हा संसर्ग दिसून येत आहे.

शरीराच्या कंबर किंवा जांघेसारख्या भागामध्ये अशा प्रकारचे चट्टे येऊन खाज आल्यास बऱ्याचदा डॉक्टरांना दाखवण्यासाठी लाज वाटत असल्याने घरातील व्यक्तीच्या किंवा मित्राच्या सल्ल्याने औषधे घेतली जातात. काही वेळेस नेहमीच्या औषध विक्रेत्याकडून मलम घेऊन लावले जाते. परंतु अशा रीतीने बुरशीजन्य संसर्गाची शहानिशा न करताच औषधांच्या दुकानांमध्ये उपलब्ध असलेले किंवा जाहिरातींमध्ये दिसणारे मलम लावणे शरीराच्या त्वचेसाठी घातक आहे.

अ‍ॅण्टिफंगलसाठी म्हणून दिल्या जाणाऱ्या अशा मलममध्ये अनेकदा स्टिरॉइडचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर असते. त्यामुळे अ‍ॅण्टिफंगल आणि स्टिरॉइड यांच्या एकत्रित मारा त्वचेवर केल्याने त्वचेला इजा पोहचते आणि ती नाजूक बनते, तसेच अशा स्टिरॉइडयुक्त मलममुळे तात्पुरत्या स्वरूपामध्ये खाज थांबत असली तरी प्रत्यक्षात मात्र संसर्ग कमी होण्याऐवजी वाढतच असतो. फॅमिली डॉक्टरलाही काही वेळेस याचे निदान करता येईलच आणि योग्य औषधे देता येतीलच असे नाही. त्यामुळे एकदा फॅमिली डॉक्टरांकडून औषध घेऊनही संसर्ग बरा न झाल्यास तात्काळ त्वचारोगतज्ज्ञांना दाखवणे कधीही चांगले. खासगी त्वचारोगतज्ज्ञांकडे जाणे परवडणारे नसले तरी सरकारी आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध असणाऱ्या त्वचारोगतज्ज्ञांची मदत नक्कीच घेता येईल, असे नायर रुग्णालयाच्या त्वचारोग विभागाच्या प्रमुख डॉ. चित्रा नायक यांनी सांगितले.

पूर्वी पावसाळ्यात अधिक प्रमाणात आढळणाऱ्या या संसर्गाचे प्रमाण वाढले असून संसर्ग झाल्यास योग्य औषध घेणे जसे गरजेचे आहे, तसे औषधांचा कोर्स पूर्ण करणेही गरजेचे आहे. बऱ्याचदा औषधे घेतल्यानंतर आठवडय़ाभरात खाज कमी येऊन चट्टा जात आल्याची लक्षणे दिसल्यास रुग्ण औषधे बंद करतात. खाज कमी येऊन चट्टे कमी झाले असले तरी त्वचेच्या त्या भागावरील बुरशी संपूर्णपणे नष्ट झालेली नसते. स्टिरॉइडयुक्त मलमचा अतिवापर आणि अर्धवट उपचार यांमुळेच आता औषधांना दाद न देणारा बुरशीचा संसर्ग निर्माण होत आहे. त्यामुळे जेथे रुग्णांना पूर्वी तीन-चार आठवडय़ांमध्ये उपचार घेऊन संसर्ग बरा होत होता, तिथे आता तीन महिन्यांपर्यंत उपचार घ्यावे लागत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून संसर्ग बरा होत नाही म्हणूनही अनेक रुग्ण येत असतात, असे केईएम रुग्णालयातील त्वचारोग विभागाचे प्रमुख डॉ. उदय खोपकर म्हणाले.

बुरशीच्या संसर्गाचे विविध प्रकार असून याचे कोणतेही निदान न करता सर्रासपणे या मलमचा वापर केला जात आहे. या औषधांनी काही दिवसांतच संसर्ग बरा होत असल्याचे सुरुवातीला आढळून आले असले तरी नंतर मात्र त्वचेवर गंभीर इजा पोहचत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये त्वचेवर पांढरे चट्टे येणे, पुरळ येणे, त्वचा लालसर होणे इथपासून ते त्वचा पातळ होऊन आतील पेशी दिसणे इथपर्यंतचे गंभीर परिणाम रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. आले आहेत. हा संसर्ग अगदी जन्मजात बाळे, लहान मुलांमध्येही हल्ली आढळून येत आहे, असे त्वचारोगतज्ज्ञ डॉ. मुकादम यांनी सांगितले.

बुरशीचा संसर्ग हा मुख्यत: शरीरामध्ये ओलसरपणा असलेल्या ठिकाणी होत होता. मात्र आता हा संसर्ग शरीरात कोरडय़ा भागांवर म्हणजे चेहरा, मान आदी ठिकाणीही होत असल्याचे मोठय़ा प्रमाणावर आढळून येत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे उजळ त्वचेसाठी वापरल्या जाणारे स्टिराइडयुक्त मलम किंवा क्रीम या मलमच्या सततच्या वापरामुळे त्वचेची प्रतिकारशक्ती कमी होऊन त्या भागामध्ये लगेचच बुरशीचा संसर्ग पसरतो. यामध्ये रुग्णांच्या चेहऱ्यावर केस येणे, पुरळ येणे, त्वचा पांढरी पडणे, लाल चट्टे येणे असे गंभीर परिणाम दिसून आले आहेत.    – शैलजा तिवले

काय काळजी घ्याल?

  • औषध विक्रेते किंवा अशा प्रकारचा आजार झालेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने औषधे घेऊ नका.
  • त्वचारोगतज्ज्ञांच्या मदतीने संसर्गाचे योग्य निदान करून घ्या.
  • संसर्ग बरा झाल्याचे दिसून आले तरीही पूर्ण उपचार पद्धतीचा अवलंब करा.
  • संसर्ग झालेल्या व्यक्तीचे कपडे किंवा वैयक्तिक वस्तू कुटुंबातल्या इतर व्यक्तींनी वापरू नये, अन्यथा त्यांनाही या संसर्गाची लागण होण्याची शक्यता आहे.
  • शक्य तितके सुती कापडे वापरा.

प्रतिबंधात्मक उपाय

  • घाम शोषून घेतला जाईल, असे सुती कपडे घालावेत. तसेच त्वचेचे घर्षण होऊ नये म्हणून सैल कपडे वापरावेत.
  • कामानिमित्त दिवसभर उन्हात फिरणाऱ्या किंवा घराबाहेर असणाऱ्या व्यक्तीने दिवसातून दोनदा आंघोळ करावी.
  • केसांमध्येही या संसर्गाची लागण होत असल्याने महिलांनी आठवडय़ातून किमान दोनदा केस धुवावेत.
  • पायाच्या नखांमध्ये हा संसर्ग मोठय़ा प्रमाणावर होण्याची शक्यता असल्याने नखे स्वच्छ ठेवावीत.

शौचालयाचा वापर करताना..

सार्वजनिक ठिकाणी शौचालयाचा वापर करताना शक्यतो भारतीय पद्धतीच्या शौचालयाचा वापर करावा. कमोड पद्धतीच्या शौचालयांमध्ये थेट त्वचेचा संपर्क येत असल्याने अशा प्रकारचा संसर्ग झालेल्या व्यक्तीने ते वापरले असल्यास दुसऱ्या व्यक्तीलाही संसर्ग होण्याची शक्यता असते. नाइलाजाने शौचालय वापरण्याची गरज भासल्यास वापरण्याआधी स्वच्छ करून घ्यावेत किंवा त्वचेचा संपर्क येणार नाही अशा रीतीने त्याचा वापर करावा. कार्यालयातील शौचालयांचा वापर करताना महिलांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

First Published on September 11, 2018 2:00 am

Web Title: skin diseases
Just Now!
X