डॉ. शशिकांत म्हशळ, कान, नाक, घसा तज्ज्ञ

जगातील सर्व लोकांकडे एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे दिवसाचे २४ तास. या २४ तासांचा जास्तीत जास्त उपयोग करण्याच्या प्रयत्नांमध्ये सर्वात पहिली गदा येते ती झोपेच्या वेळेवर. त्यातही शहरात रात्री झोप आणि दिवसा काम हे गणितही पुरते मोडकळले आहे. रात्री झोप मिळत नसल्याने दिवसा झोपू पाहणाऱ्यांना ती झोप पुरेशी वाटत नाही. अपुरी झोप आणि जेवणाच्या वेळाही चुकवल्या जात असल्याने मग आम्लपित्त व डोकेदुखीचे त्रास सातत्याने पाठीशी लागतात. कामाला अधिकाधिक वेळ मिळावा यासाठी झोपेवर संक्रांत येत असली तरी त्याचा उलट परिणामच होतो, कारण अपुऱ्या आणि अशांत झोपेमुळे कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. त्यामुळे मानसिक त्रासही सुरू होऊ शकतो. रक्तदाब, मधुमेह अशा आजारांसाठीही अपुरी झोप हे एक कारण ठरते. आरोग्य व उत्तम कामासाठी रात्री पुरेशा प्रमाणात व शांत झोप आवश्यक आहे. झोपेत अडथळे येण्यासाठी अनेक बाबी कारणीभूत ठरतात. त्यातील काही बाबी आपल्या हातातही नसतात. मात्र श्वास घेण्यात अडथळे येत असल्यानेही अनेकांना शांत झोपेवर पाणी सोडावे लागते. हा निद्राविकार नेमका का होतो, त्याची लक्षणे व त्यावरील उपाय यांची ही माहिती.

स्लीप अ‍ॅप्निया म्हणजे काय?

झोपेदरम्यान श्वासोच्छ्वासात अडथळा निर्माण होण्याच्या आजाराला वैद्यकीय भाषेत स्लीप अ‍ॅप्निया किंवा निद्राविकार म्हणतात. स्लीप अ‍ॅप्निया आणि निद्रानाश हे दोन्ही आजार एकच असल्याचा गैरसमज आहे. मात्र हे दोन्ही आजार वेगवेगळे असून निद्रानाश हा आजार मानसिक आजाराशी संबंधित आहे, तर स्लीप अ‍ॅप्निया हा आजार झोपेदरम्यान श्वसनक्रियेतील अडथळ्यासंदर्भात आहे. झोपेत श्वास घेण्यास अडथळा निर्माण होण्याबरोबरच श्वसनाची गती मंदावणे हेदेखील स्लीप अ‍ॅप्नियाचे लक्षण आहे.

स्लीप अ‍ॅप्नियाची इतर लक्षणे

रात्री झोपेत अनेकदा उठावे लागल्याने त्याचे परिणाम दिवसाच्या कामावर जाणवतात. कामात लक्ष न लागणे, दिवसा झोप येणे, एकाग्रता नसणे, अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे अशी लक्षणे दिसू लागल्यावर झोपेकडे वेळीच लक्ष द्या.

झोपेदरम्यान श्वसनप्रक्रियेत अडथळा येण्याची कारणे

लठ्ठपणा हे या आजारामागील महत्त्वाचे कारण आहे. झोपल्यानंतर शरीरारातील सर्व स्नायू सैल पडतात. मात्र लठ्ठपणात शरीरातील अवयवांवर चरबीचे थर जमा होत असल्याने अवयवांकडून, त्यातही लठ्ठपणातून अवयवांवर जमा झालेल्या चरबीमुळे श्वसनाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. श्वसनक्रिया योग्य प्रकारे होत नसल्यामुळे शरीराला आवश्यक असलेला ऑक्सिजनचा साठा मिळत नाही. ऑक्सिजन मिळत नसल्याचा आणीबाणीचा संदेश मेंदूला पाठवला जातो आणि तत्क्षणी झोपलेली व्यक्ती जागी होते. तसे पाहता सुदृढ व्यक्तीलाही अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. मात्र ही क्रिया वारंवार होत राहिली म्हणजे रात्रभरात १५ ते २० पेक्षा अधिक वेळा जाग येत असेल तर तपासणी करणे आवश्यक आहे.

बदलत्या जीवनशैलीतून निर्माण

  • होणाऱ्या आजारामुळे श्वसनात अडथळा निर्माण होतो.
  • दारू पिणे व धूम्रपानासारख्या व्यसनामुळेही झोपेदरम्यान श्वसनात अडथळा निर्माण होऊ शकतो. या व्यसनामुळे श्वसननलिका अरुंद होते. हे हृदयविकाराच्या झटक्याचेही महत्त्वाचे कारण मानले जाते.
  • शरीरात थायरॉइडचे प्रमाण जास्त असल्यास आणि उंचीच्या तुलनेत वजन जास्त असल्यास स्लीप अ‍ॅप्निया आजार होऊ शकतो.
  • नाकाचे हाड वाढल्यानेही योग्य प्रकारे श्वासोच्छ्वास करता येत नाहीत.
  • श्वसनप्रक्रियेत काही कारणाने अडथळा आल्यामुळे श्वसनाची गती मंदावते.

निद्राविकार पाहणी

मुंबईतील महापालिकेच्या कूपर रुग्णालयात गेल्या महिनाभरापासून निद्राविकाराच्या तपासणीसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात रात्रभर रुग्णाला झोपवले जाते आणि त्याची तपासणी केली जाते. झोपेदरम्यान रुग्णाला किती वेळा श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाला हे त्याच्या नाकाला यंत्र लावून मोजले जाते. याच वेळी रुग्णाच्या हाताच्या नाडीचे ठोकेही तपासले जातात. रात्री १५-२० वेळेपेक्षा जास्त वेळा जाग येत असेल तर रुग्णाला उपचार देण्याची गरज भासते. अनेकदा शस्त्रक्रियाही केली जाते.

स्लीप अ‍ॅप्नियाची शस्त्रक्रिया

झोपेदरम्यान श्वसनात होणारा अडथळा किती गंभीर आहे यावर पुढील उपचार ठरवले जातात. प्राथमिक पातळीवर रुग्णाला वजन कमी करण्याचा व जंक फूड न खाण्याचा सल्ला दिला जातो. श्वसन प्रक्रियेत अडथळा जास्त असेल आणि केवळ वजन नियंत्रणात आणून श्वसनातील अडथळे दूर करता येत नसतील तर स्लीप एंडोस्कोपीद्वारे (नाकावाटे यंत्र घालून करायची शस्त्रक्रिया) श्वसननलिकेतील अडथळा दूर केला जातो.