18 February 2019

News Flash

आघातानंतरचा ताण

घटनेवेळच्या लक्षणांच्या वारंवारतेमुळे व्यक्तीचे नियमित आयुष्य बिघडते.

संग्रहित प्रतिनिधिक छायाचित्र

धक्कादायक, धडकी भरवणारी किंवा धोकादायक घटनेचा ठसा मनावर उमटतो आणि घटना घडून गेल्यावरही काही काळ मानसिक ताण जाणवतो. काहींच्या बाबतीत हा कालावधी काही दिवसांचा तर काहींच्या बाबतीत अनंत काळापर्यंत असतो. याला मानसोपचाराच्या भाषेत पीटीएसडी (पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर- आघातानंतरच्या ताणाचा आजार) म्हणतात. ज्याच्या बाबतीत घटना घडली फक्त त्या व्यक्तीलाच नाही तर त्या व्यक्तीच्या निकटवर्तीयांना किंवा ही घटना पाहणाऱ्यांचाही मानसिक धक्क्यातून हा आजार होऊ  शकतो.

एखादी धक्कादायक किंवा अतीव दु:खद घटना घडल्यावर त्याबद्दल भीती वाटणे नैसर्गिक आहे. प्रत्येकालाच अशा घटनांनंतर मनात उमटणाऱ्या विविध प्रतिक्रियांचा अनुभव येतो, बहुतेक जण सुरुवातीच्या लक्षणानंतर त्यातून स्थिरावतात आणि पुढे जातात. मात्र काहींना त्या घटनेच्या सावलीतून बाहेर पडणे कठीण जाते आणि त्यांना पीटीएसडीसाठी उपचारांची गरज भासू शकते. या आजाराचा महत्त्वाचा भाग म्हणजे या व्यक्ती धोका टळल्यावर किंवा भविष्यात तशी कोणतीही घटना न घडताही भेदरलेल्या अवस्थेत आणि मानसिक ताणाखाली राहतात.

ज्या प्रकारे धक्कादायक घटना अनुभवलेली प्रत्येक व्यक्ती ही त्यानंतर मानसिक ताणात राहत नाही त्याचप्रमाणे पीटीएसडी असलेल्या व्यक्तींनी धक्कादायक घटना अनुभवलेली असेलच असे नाही. काही आकस्मिक घटना उदा. जवळच्या व्यक्तीचा मृत्यूमुळे आघातानंतरचा न निवळणारा ताण उत्पन्न होऊ  शकतो. साधारण घटना घडल्यावर तीन महिन्यांच्या आत लक्षणे दिसू लागतात मात्र काही वेळा वर्षभरानंतरही लक्षणे दिसण्याची शक्यता असते. प्रत्येकाच्या आजाराची पातळीही वेगळी असते. काहींना सहा महिन्यांत उपचारांनी बरे वाटते तर काहींसाठी बराच काळ औषधोपचार सुरू ठेवावे लागतात.

* आघातानंतरच्या ताणाची काही लक्षणे नेहमी दिसतात आणि ती महिन्यापेक्षा जास्त काळ सुरू राहतात.

* घटना वारंवार आठवते आणि त्यावेळची लक्षणे- हृदयाचे वाढलेले ठोके किंवा घाम – पुन्हा पुन्हा अनुभवाला येतात.

* रात्री भयंकर स्वप्न पडतात. यामुळे कित्येकदा रात्रीची झोपही उडते.

* पुन्हा पुन्हा भीतीदायक विचार येतात आणि घटनेवेळचा ताण निर्माण करतात.

घटनेवेळच्या लक्षणांच्या वारंवारतेमुळे व्यक्तीचे नियमित आयुष्य बिघडते. या लक्षणांची सुरुवात व्यक्तीच्या स्वत:च्या विचार व भावनांमधून होते. शब्द, वस्तू किंवा परिस्थितीमुळे वारंवार त्या दु:खद, भीतीदायक घटनेवेळची लक्षणे उमटू लागतात. हे घडू लागल्यावर विशिष्ट ठिकाणे, घटना किंवा वस्तू टाळण्याचा कल वाढतो. त्यामुळे अर्थातच रोजच्या जगण्यावर मर्यादा पडू लागतात. त्याचप्रमाणे या व्यक्तींना कायम धोका जवळ असल्याची जाणीव होत राहते. त्यामुळे ताण वाढतो व काही वेळा व्यक्ती रागीट होतात. काही वेळा आवश्यकता नसतानाही दोष असल्याचे वाटते. कुटुंबातील व्यक्ती, मित्र-मैत्रिणी यांच्यापासून दूर झाल्याची भावना होते.

आकस्मिक घटनाच नाहीत तर कर्करोगासारख्या गंभीर आजारातून बरे झालेल्यांना किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींना या तणावाचा सामना करावा लागतो.

व्यक्ती सतत चिंता करत राहते, भविष्याची काळजी करत, मृत्यूबाबत विचार करून ताण वाढतो. त्यामुळे झोपेच्या समस्या सुरू होतात. प्रचंड काळजी आणि नैराश्य येते आणि माणूस निराशावादी बनतो. आजाराऐवजी विचारांचा गुंता सोडवता न आल्याने व्यक्तीचा मृत्यू होतो, असे म्हटले जाते.

याच्यावर उपाय काय?

यासाठी समुपदेशन आणि औषधे या दोहोंची गरज आहे. काळजी, चिंता दूर करून झोप येण्यासाठी, दु:खद आठवणी कमी करण्यासाठी या औषधांचा चांगला उपयोग होत असल्याचे अनुभवायला येते. आठवणींचा गुंता किंवा भीती दूर करण्यासाठी तसेच लक्षणे कमी करण्यासाठी समुपदेशनाचा फायदा होतो. या दोन्हीमुळे नियमित आयुष्य पुन्हा मार्गावर आणण्यास मदत होते.

– डॉ. केरसी चावडा, मानसोपचारतज्ज्ञ

First Published on February 13, 2018 1:46 am

Web Title: stress after trauma