27 October 2020

News Flash

ताण आणि नैराश्य

ताणाचा सामना करण्यासाठी शरीरात तात्काळ एपीनेफ्रीन आणि नॉरएपीनेफ्रीन नावाचे द्रव्य तयार होतात.

मानसिक आरोग्य हा गहन आणि व्यापक विषय आहे. मात्र ताण आणि नैराश्य हे मानसिक आरोग्याचे सर्वाधिक चर्चेत असणारे मुद्दे. ताण ही सर्वाधिक जणांना भेडसावणारी समस्या आहे तर नैराश्य हा सर्वात जास्त आढळणारा मानसिक आजार आहे. अनेकदा ताण हे नैराश्य येण्याचे कारण असते. मात्र ताणाचे परिणाम व नैराश्याची कारणे इतरही असू शकतात. या दोन्ही मानसिक स्थिती..

तणावामुळे होणारे आजार

रोजच्या आयुष्यातील दगदग, अपयश, नकार, विरह, पैशांचे व्यवस्थापन हे ताण वाढवणारे असते. काही वेळा यापेक्षाही अधिक तणावपूर्ण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. अपघात, जिवावर बेतलेला प्रसंग, सामाजिक बहिष्कार-बलात्कार-सार्वजनिक ठिकाणी अपमान यापैकी एखाद्या कारणाने आत्मसन्मानावर झालेला आघात, पूर-भूकंप-दरड कोसळण्यासारखी नैसर्गिक संकटे यामुळे तणाव वाढतो.

तणाव आल्यावर शरीरात काय बदल होतो?

ताणाचा सामना करण्यासाठी शरीरात तात्काळ एपीनेफ्रीन आणि नॉरएपीनेफ्रीन नावाचे द्रव्य तयार होतात. जर तणाव जास्त वेळ टिकला तर कॉरटिसोल नावाचे द्रव्य दीर्घकाळासाठी निर्माण होते. अति, विचित्र आणि विशिष्ट प्रसंगानंतर या द्रव्यामुळे शरीर व मेंदूमध्ये झपाटय़ाने आणि अतिरेकापर्यंत बदल घडतात. मेंदूतील हिपोकंपस आक्रसतो व ठरावीक मानसिक आजार होतात.

लगेच घडणारे आजार

तणावपूर्ण प्रसंग झाल्यावर व्यक्तीच्या वागणुकीत बदल होतात. एकदम उत्तेजित किंवा मलूल होणे, हसणे-रडणे, गोंधळल्यासारखे वागणे, इकडे-तिकडे फिरणे, विसरणे किंवा एकटक पाहत राहणे. ही स्थिती साधारण दोन दिवस राहते. सुरक्षित, शांत ठिकाणी ओळखीच्या माणसांसोबत ठेवून या व्यक्तीची काळजी घेतली की या ताणातून पूर्ण बरे होता येते.

दीर्घकालीन आजार

काही व्यक्ती ताणातून बाहेरच येत नाहीत. सतत तोच विचार करतात. काहींना त्या प्रसंगाचे चित्र डोळ्यासमोर दिसते, त्या वेळचा त्रास पुन्हा अनुभवणे, दचकणे असे वारंवार घडते. प्रसंगाशी निगडित जागा, वास, रंग, प्रहर, आवाज- म्हणजे त्या प्रसंगाचे संकेत देणाऱ्या बाबींचाही त्यांना त्रास होतो. भित्रेपणा, उदासीनता, चिडचिड वाढते. भविष्याचे किंवा अगदी घराबाहेर फिरायला जाण्याचेही नियोजन करणे जमेनासे होते. जग, इतर व्यक्ती आणि घटनांशी ते अलिप्त होतात. त्यामुळे नात्यांमध्ये अंतर येऊ लागते. या व्यक्तींना योग्य औषध, समुपदेशन तर दिलेच जाते. त्याशिवाय जीवनामध्ये सकारात्मक राहण्यासाठी नवीन अर्थ शोधणे, नवीन नाती जुळवणे, नवीन व्यवसाय शिकवणे असे मार्गदर्शनही गरजेचे असते.

नैराश्याची लक्षणे

सतत आणि तीव्र स्वरूपाच्या मानसिक वेदना होतात. मन बधिर, अस्वस्थ आणि असमाधानी होते. सतत रडू येते, काही करावेसे वाटत नाही. यातून बाहेर पडण्यासाठी व्यक्ती नवीन काही शिकण्याचा प्रयत्न करतात, धार्मिक होतात किंवा वारंवार फिरायला जातात. काही काळ थोडे बरे वाटते. भूक आणि झोप कमी झाल्याचे लक्षात आल्यावर ते व्यायाम करतात, पथ्य पाळतात. वेगवेगळ्या तपासण्या, थेरपी, पथीची औषधे घेऊन बरे होण्याचा प्रयत्न करतात. काही व्यक्ती दारू किंवा झोपेच्या गोळ्या घेतात. शरीर आणि मन थकून जाते. ही व्यक्ती निराश होते. मनात आत्महत्येचे विचार येतात.

नैराश्यात लक्षणे कमी-जास्त होतात. नैराश्याचा वेग आणि प्रमाण जास्त असले तर व्यक्तीमध्ये एकदम बदल होतात. पण ते कमी असेल तर व्यक्तीमधले बदल एवढे हळू होतात की तो आजारी आहे हे लक्षात येत नाही. मुळात क्षमता जास्त असेल तर तो आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत राहतो. अशा लोकांच्या वागण्याला स्वभावदोष समजले जाते. मानसिक तीव्र वेदना हे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

नैराश्याची कारणे

१५ ते ३० टक्के व्यक्तींना कधी न् कधी हा आजार होतोच. पौगंडावस्थेनंतर पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये हा आजार होण्याचे प्रमाण दुप्पट आहे. लहानपणी झालेल्या त्रासामुळे मेंदूच्या ‘हिपोकॅम्पस’ नावाच्या भागाचा विकास खुंटतो. काही कुटुंबांमध्ये आनुवंशिकता असते. वेगवेगळ्या आजारांमुळेही मेंदूचे आरोग्य बिघडून नैराश्य येते. मेंदूतील द्रव्यांचे संतुलन बिघडल्यामुळे मनात उदासीन होते. व्यक्तीचे लक्ष नकारात्मक विचारांकडे केंद्रित होऊ लागते. त्यामुळे नैराश्य आणखीनच लागते. आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींच्या मेंदूमध्ये ‘५ एच आय ए ए’ द्रव्याची कमतरता असते.

नैराश्यावरचे उपाय

एखाद्या भळभळत्या जखमेएवढीच तीव्र यातना देणारा पण कुणाला न दिसणारा हा आजार आहे. दु:ख विसरावे, सहन करावे असा त्रासदायी गरसमज आहे. नैराश्यासाठी विशिष्ट औषधे असतात, ती परिणामकारी आणि सुरक्षित आहेत. नैराश्य हा दीर्घकाळाचा आजार असल्याने ही औषधे आयुष्यभरही घ्यावी लागू शकतात. शरीरासाठी मधुमेह/ रक्तदाबाची औषधे मरेपर्यंत घेणे योग्य पण मेंदूसाठी नैराश्याची औषधे घेणे अयोग्य असा गैरसमज करू नये.

नैराश्यात समुपदेशनाचा खास उपयोग होतो. पण समुपदेशकांशी नुसत्या गप्पा मारून निराशा कमी होते हा खूप मोठा गरसमज आहे. समुपदेशन म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच असते, त्यात रुग्णाला मेहनत घ्यावी लागते. नैराश्याचे प्रमाण कमी असेल, योग्य प्रशिक्षित समुपदेशक असेल आणि सांगितलेले बदल करण्याची रुग्णात क्षमता असेल तर समुपदेशनाचा चांगला उपयोग होतो. समुपदेशन डोळसपणे घ्यावे. नाही तर त्याचेही दुष्परिणाम होऊ शकतात. औषध आणि समुपदेशन, दोन्ही एकत्र घेणे योग्य.

– डॉ. वाणी कुल्हळी,  

vbkulhalli@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2016 5:21 am

Web Title: stress and depression
टॅग Depression
Next Stories
1 आबालवृद्ध : पोटात गडबड
2 राहा फिट! : ‘फिटनेस’ची कसोटी ‘पुल अप’
3 आयुर्मात्रा : ओवा
Just Now!
X